गोष्ट छत्तिसावी
ऐक्याची शक्ती न्यारी, मुंग्यांचा समूह सर्पास मारी !
'एका वारुळात 'अतिदर्प' नावाचा एक काळाकुट्ट महासर्प राहात होता. त्याला आपल्या सामर्थ्याचा अतिशय दर्प म्हणजे गर्व होता. एकदा वारुळाच्या नेहमीच्या रुंद बिळातून प्रवेश करण्याऐवजी त्याने अत्यंत अरुंद अशा बिळातून वारुळात शिरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अंग खरचटून तो रक्तबंबाळ झाला. त्या रक्ताचा वास येताच हजारो मुंग्या एकत्रितपणे त्या सर्पावर तुटून पडल्या, आणि त्यांच्यापुढे काही एक न चालून, तो महासर्प अखेर त्यांच्या भक्ष्यस्थानी पडला' ही गोष्ट सांगून सचीव स्थिरजीवी राजा मेघवर्णाला म्हणाला, 'महाराज, शत्रूचा निःपात करण्यासाठी आपल्या इतर मंत्र्यांनीच नव्हे, तर सुरुवातीला मीही जे उपाय सुचविले त्यापेक्षा एक वेगळाच उपाय आता माझ्या डोक्यात आला आहे.'
'तो कोणता ?' अशी विचारणा राजा मेघवर्णाने केली असता स्थिरजीवी सांगू लागला, 'महाराज, ''हा शत्रूला फितूर झाला आहे.' अशी खोटीच अफवा माझ्याबद्दल आपल्या राज्यात उठवा. त्यानंतर मी मरणार नाही अशा बेताने मला चोची मारून व भरीला बाहेरचे रक्त आणून ते माझ्या अंगाला फासून मला रक्तबंबाळ करा. एवढे झाल्यावर तुम्ही सर्व प्रजाजनांसह ऋष्यमूक पर्वतावर निघून जा. रात्री आपला शत्रू अरिमर्दन आला की, मी त्याच्यासमोर तुमची निंदा करीन, तुमच्याविरुद्ध मदत करण्याचे त्याला आमिष दाखवीन आणि मला त्याच्यासंगे घेऊन जाण्याबद्दल मी त्याला विनंती करीन. माझी खात्री आहे की, तो मला मोठ्या आनंदाने त्याच्यासंगे घेऊन जाईल. त्याच्याकडे गेल्यावर, घुबडांना दिवसा दिसत नसल्यामुळे, संधी साधून त्या अरिमर्दनासह त्याच्याकडील महत्त्वाच्या व्यक्तींचे मी प्राण घेईन आणि चोरवाटेने इकडे पळून येईन. हे करीत असताना एखाद् वेळ मलाही प्राणांना मुकावे लागेल. पण या जगात मायभूमी हीच सर्वांत श्रेष्ठ आहे आणि तिच्या रक्षणासाठी - प्रसंग आल्यास - आत्मबलिदान करणे, हे तिच्या प्रत्येक सुजाण सुपुत्राचे पवित्र कर्तव्य आहे.'
स्थिरजीवीचे हे म्हणणे पटून, राजा मेघवर्णाने तो शत्रूला फितूर झाल्याची अफवा सर्वत्र पसरविली. सर्व कावळे त्याला 'फितूर' म्हणून शिव्या देऊ लागले. मग राजा मेघवर्णाने त्याला चोची मारून त्याच्या अंगातून रक्त काढले व काही रक्त चूपचाप बाहेरून आणून त्याच्या अंगाला फासले. मग त्याला त्याच वडाच्या झाडाखाली टाकून देऊन मेघवर्ण आणि त्याचे अनुयायी ऋष्यमूक पर्वताकडे निघून गेले.
'सचीव स्थिरजीवीवर शत्रूला फितूर झाल्याचा आरोप घेऊन राजा मेघवर्णाने त्याला रक्तबंबाळ केले आणि राजा व त्याचे अनुयायी कुठेतरी निघून गेले, 'ही बातमी अरिमर्दनाचा हेर म्हणून मेघवर्णाच्या राज्यात गुप्तपणे वावरणार्या होला पक्ष्याने आपल्या धन्याला दिली. रात्री स्वतः अरिमर्दनाने त्या वटवृक्षाकडे येऊन त्याची ती दीन स्थिती पाहिली.
'अरिमर्दनाकडून आता आपली चौकशी होणार व मग आपल्याला आपले काम सहज तडीस नेता येणार, या विचाराने स्थिरजीवी स्वतःशीच म्हणाला -
अनारम्भो हि कार्याणां प्रथमं बुद्धिलक्षणम् ।
प्रारभ्यस्त्यान्तगमनं द्वितीयं बुद्धिलक्षणम् ॥
(एखाद्या कामाला ते आवाक्याबाहेरचे वाटल्यास प्रारंभ न करणे हे बुद्धीचे पहिले लक्षण आहे, पण एकदा का एखाद्या कामाला हात घातला, की ते तडीस नेणे हे बुद्धीचे दुसरे लक्षण आहे.)
तो अशा तर्हेचा विचार करीत असतानाच अरिमर्दनाने त्याच्यापाशी जाऊन त्याला मुद्दामच त्याच्या त्या स्थितीचे कारण विचारता, स्थिरजीवी त्याला वंदन करून म्हणाला, 'महाराज, राजा मेघवर्णाने आपल्यासारख्या वीरश्रेष्ठाशी युद्ध करण्याचा विचार चालविला होता. पण मी त्याला म्हणालो, महाराज असा अविचार करू नका. अरिमर्दनमहाराजांशी लढणे, म्हणजे पतंगाने दिव्यावर झेप घेण्यासारखे आहे. तेव्हा त्यांच्याशी नमून वागा. मी त्याला असे त्याच्या हिताचे सांगितले, म्हणून त्याने मला फितूर ठरवून असे मारमार मारले आणि तो व त्याचे प्रजाजन कुठेतरी निघून गेले. महाराज, आपण मला आश्रय दिलात, तर मी त्या मूर्ख मेघवर्णाच्या नव्या मुक्कामाच्या ठिकाणाचा ठावठिकाणा मिळवीन आणि त्याचा निःपात करण्यात आपल्याला मदत करीन.'
'शत्रूचा एक जाणकार सचीव आपल्याला येऊन मिळत आहे,' हे पाहून मनी आनंदून गेलेल्या अरिमर्दनाने 'याला आश्रय द्यावा का ?' असा प्रश्न रक्ताक्ष, क्रूराक्ष, दीप्ताक्ष, वक्रनास व प्राकारकर्ण या आपल्या पाच मंत्र्यांपैकी रक्ताक्षाला केला असता तो म्हणाला, 'महाराज, राजा मेघवर्णाच्या विश्वासातल्या या सचिवाची, तो नुसत्या संशयापोटी अशी दुर्दशा करील, हे मनाला पटत नाही. तेव्हा यात काही कपट असावे असे मानून आपण ताबडतोब याला जीवे मारावे. आपण म्हणाल की, याला आश्रय दिला तरी हा दुबळा म्हातारा आपले काय वाईट करू शकेल ? पण एक शास्त्रवचन लक्षात घ्या. -
हीनः शत्रुर्निहन्तव्यो यावन्न बलवान् भवेत् ।
प्राप्तस्वपौरुषबलः पश्चाद्भवति दुर्जयः ॥
(शत्रू मामुली जरी असला, तरी तो बलवान होण्यापूर्वीच त्याला ठार मारावे. नाहीतर - कुणाची मदत मिळाल्यास - तो पुढे जिंकण्यास कठीण होतो.)
रक्ताक्ष पुढे म्हणाला, 'महाराज, या स्थिरजीवीला आश्रय देणे अविचाराचे ठरेल. अविचारामुळे त्या ब्राह्मणाच्या मुलाला प्राणांना कसे मुकावे लागेल, ती गोष्ट आपल्याला ठाऊक आहे ना ?' अरिमर्दनाने ती गोष्ट मला माहीत नाही,' असे म्हणताच रक्ताक्ष म्हणाला, 'महाराज, ती गोष्ट काय आहे -