गोष्ट साठावी

संस्कृत नीतिकथांमध्ये पंचतंत्र कथांचे प्रथम स्थान मानले जाते.

The fascinating stories told by Vishnu Sharma, called Panchatantra.


अपरीक्षितकारक

आपल्या आश्रमातील त्या डेरेदार वृक्षाच्या तळी अंथरण्यात आलेल्या आसनावर बसण्याकरिता विष्णुशर्मा येताच, त्या तीन राजकुमारांनी मोठ्या नम्रपणे नमस्कार करून विचारले, 'गुरुदेव, आज आपण पाचव्या व शेवटच्या तंत्राला सुरुवात करणार आहात ना?' विष्णुशर्मा म्हणाला, 'होय. या तंत्राचे नाव 'अपरीक्षित-कारक' म्हणजे 'न जाणता करण्यात येणार्‍या गोष्टींसंबंधीचे प्रकरण' असा आहे. जे आपण प्रत्यक्ष पाहिले नाही, ऐकले नाही, आपल्याला समजले नाही, किंवा मुळाशी जाऊन ज्याची स्वतः परीक्षा केली नाही, असे आपण कधीही करू नये. तसे केल्यास जैन यतींच्या डोक्यात काठीचे प्रहार करून त्यांचे प्राण घेणार्‍या एक अविचारी न्हाव्यावर जसा सुळी जाण्याचा प्रसंग ओढवला, तसा प्रसंग ओढवतो.' यावर त्या राजकुमारांनी 'तो कसा काय?' अशी पृच्छा केली असता, विष्णुशर्मा म्हणाला, 'ऐका अणि त्यापासून योग्य तो बोध घ्या-

गोष्ट साठावी

कुठल्याही गोष्टीच्या मुळाशी जावे, आणि मगच योग्य ते करावे.

दक्षिणेकडील 'पाटलीपुत्र' नगरात 'मणिभद्र' नावाचा एक व्यापारी राहात होता. धंद्यात कमालीची खोट खावी लागल्याने, दोन वेळच्या अन्नालाही महाग होण्याची वेळ त्याच्यावर आली आणि भोवतालच्या जगात त्याची किंमत एकदम कमी झाली. तो स्वतःशीच म्हणाला, 'अरेरे ! दारिद्र्य किती वाईट ! ते सर्व गुणांना मातीमोल करून टाकते ! म्हटलंच आहे ना ?-

शीलं शौचं क्षान्तिर्दाक्षिण्यं मधुरता कुले जन्म ।

न विराजन्ति हि सर्वे वित्तविहीनस्य पुरुषस्य ॥

(शील, शुद्धता, क्षमा, नम्रता, स्वभावातील गोडवा, कुलीनता या सर्व गोष्टी धन नसलेल्या पुरुषापाशी असल्या, तरी त्या कुणाच्या डोळ्यांत भरत नाहीत.)

'असले अपमानकारक जिणे जगण्यापेक्षा आयुष्याचा शेवट करून घेतलेला काय वाईट ?' अशा तर्‍हेचा विचार मणिभद्र एका रात्री अंथरुणात पडल्या पडल्या करीत असता तो झोपी गेला आणि त्याच्या स्वप्नात एक जैन यती येऊन त्याला म्हणाला, 'हे मणिभद्रा ! तू आपल्या मनात असे आत्महत्येचे विचार आणू नकोस. तुझ्या वाडवडिलांनी धर्मासाठी जे विपुल धन खर्च केले, तेच धन माझ्या रूपाने आता तुला दर्शन देत आहे. उद्या सकाळी याच रूपात मी तुझ्याकडे ' पद्मनिधी' हे नाव धारण करून येईन. तेव्हा तू माझ्या मस्तकावर काठीने एक जोरदार प्रहार कर, म्हणजे माझे रूपांतर एका सुवर्णपुतळ्यात होईल. त्या पुतळ्यातील आवश्यक तेवढे सोने गरजेनुसार खर्च करुन, तू पुन्हा व्यापारात जम बसव.' एवढे बोलून तो जैन यती अंतर्धान पावला.

दुसर्‍या दिवशी सकाळी स्नान वगैरे उरकून व हाती काठी घेऊन मणिभद्र त्या यतीची वाट पाहात घराच्या पुढल्या ओसरीवर बसला. नेमका त्याच वेळी दुसर्‍या काही कामानिमित्त एक न्हावी त्याच्याकडे आला. तेवढ्यात पहाटे स्वप्नात आलेला तो जैन यतीच पुढल्या अंगणात येऊन थडकला. मणिभद्राने त्याला नाव विचारताच त्याने आपले नाव 'पद्मनिधी' आहे, असे सांगताच, मणिभद्रने आपल्या हातातल्या काठीचा प्रहार त्याच्या मस्तकावर केला. त्याच क्षणी तो यती सोन्याचा पुतळा होऊन जमिनीवर कोसळला मणिभद्राने त्या पुतळ्याला उचलून घरात नेले व न्हाव्याने हा प्रकार इतर कुणाला सांगू नये म्हणून त्याला मौल्यवान कापड व धन दिले.

'याच रीतीने आपण मणिभद्रापेक्षाही श्रीमंत होऊ या,' असा विचार मनात आणून व जैन यतींना वस्त्रे दान करण्याचे आमिष दाकवून, त्याने त्यांना आपल्या घरी येण्याचे आमंत्रण दिले. त्याप्रमाणे गावातल्या मठातून पाचपंचवीस जैन यती घरी येताच, त्या मूर्ख व अविचारी न्हाव्याने खैराच्या सोट्याने त्यांची टाळकी फोडायला सुरूवात केली. त्या अनपेक्षित हल्ल्यात सापडलेले काही यती तिथल्या तिथे मेले, तर काही पळून गेले.

पुढे जेव्हा न्यायाधीशासमोर खटला सुरू झाला आणि त्या न्हाव्याने 'आपण श्रीमंत होण्यासाठी मणिभद्राचा मार्ग अवलंबिला,' असे सांगितले, तेव्हा मणिभद्राला बोलावून न्यायमूर्तींनी त्याच्याकडे घडलेल्या प्रकाराचा खुलासा करून घेतला. तो ऐकून न्यायमूर्ती म्हणाले, 'कुठल्याही गोष्टीच्या मुळाशी न जाता जो अविचाराने कृती करतो त्याच्यावर त्या निरपराध मुंगसाला जिवे मारणार्‍या अविचारी बाईवर जसा पश्चात्ताप करण्याचा प्रसंग आला तसा येतो. या अविचारी न्हाव्याला मी अपराधाबद्दल सुळावर चढविण्याची शिक्षा फर्मावितो.'

'पण महाराज, त्या अविचारी बाईची व मुंगसाची गोष्ट काय आहे?' असे मणिभद्राने विचारले असता न्यायमूर्ती म्हणाले, 'ऐका-

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP