गोष्ट सहासष्ठावी

संस्कृत नीतिकथांमध्ये पंचतंत्र कथांचे प्रथम स्थान मानले जाते.

The fascinating stories told by Vishnu Sharma, called Panchatantra.


गोष्ट सहासष्ठावी

जो मोठेपणाच्या भ्रमात राही, त्याच्यावर रडण्याची पाळी येई.

एक धोबी आपल्या 'उद्धत' नावाच्या गाढवाकडून दिवसभर ओझी वाहण्याचे काम करून घेई आणि रात्री तो त्याला गावाबाहेर चरायला सोडून देई. रात्रभर गवत, नाहीतर कुणा ना कुणाच्या शेतातली धान्याची रोपे पोटभर खाऊन झाल्यावर, पहाटे पहाटे ते गाढव आपल्या घरी जाई. या रात्रीच्या भ्रमंतीत त्याची एका कोल्ह्याशी ओळख झाली.

एके रात्री पुनवेचे पिठूर चांदणे पडले असताना ते गाढव म्हणाले, 'कोल्होबा, या चांदण्यामुळे मन कसे प्रफुल्लीत झाले आहे. मी थोडा वेळ गाऊ का?'

कोल्हा म्हणाला, 'मामा, तुम्ही आणि गाणार ? म्हणजे प्रलयच थडकला म्हणायचा !'

'का रे ! मला गाण्याची माहिती नाही, असे का तुला वाटते ?' असा प्रश्न विचारून ते गाढव स्वर किती, सप्तके किती व राग किती वगैरे महिती देऊन, त्या कोल्ह्याला म्हणाले, 'आता तरी माझ्या रागदारीच्या ज्ञानाबद्दल तुझ्या मनात संशय उरला नाही ना ?'

कोल्हा म्हणाला, 'नुसते ज्ञान असणे वेगळे आणि गाण्याचा आवाज वेगळा. त्यातून कुणी, कुठे व कसे वागायचे याबद्दल मार्गदर्शक असे काही नियम आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर -

कासयुक्तस्त्यजेत् चौर्यं निद्रालुश्चैव चौरिकाम् ।

जिव्हालौल्यं रुजाक्रान्तो जीवितं योऽत्र वाञ्छति ॥

(या जगात सुरळीतपणे जगण्याची इच्छा असेल तर, खोकला झालेल्याने व जो झोपाळू आहे त्याने चोरी करण्याच्या फंदात पडू नये व रोगग्रस्ताने जिभेचे चोचले पुरवू नयेत.)'

तो कोल्हा पुढे म्हणाला, 'खोकला झालेला जर कोणी चोरी करायला गेला आणि चोरी करता करता, जर का त्याला खोकला आला, तर ज्याप्रमाणे घरमालकाकडून मार खाण्याचा प्रसंग येईल, त्याचप्रमाणे तुम्ही जर या रात्रीच्या वेळी गाऊ लागलात, तर ज्याच्या शेतातली कोवळी कणसे आपण चोरून खात आहोत, तो शेतकरी जागा होईल, आणि आपणा दोघांनाही चोप देईल.'

गाढव म्हणाले, 'कोल्होबा, तू अगदीच अरसिक कसा रे ? तो स्मशानात राहणारा रुक्ष मनोवृत्तीचा शंकर, जर त्या रावणाने सुकवलेल्या स्नायूंपासून तयार केलेल्या तंतुवाद्यातून रागदारीचे मधुर स्वर काढताच त्याच्यावर प्रसन्न झाला, तर माझे गोड गाणे ऐकून, त्या शेताची रखवाली करणारा माणूस मला मारणे शक्य आहे का ? उलट तो माझा सन्मानच करील.'

हा आपले ऐकण्याचे लक्षण दिसत नाहीसे पाहुन तो कोल्होबा त्या शेताच्या कुंपणाबाहेर पडून दूर उभा राहिला आणि त्या गाढवाने टिपेत गायला प्रारंभ केला. त्याबरोबर त्या शेताच्या जाग्या झालेल्या राखणदाराने त्याला बेदम मार दिला. त्या माराने ते गाढव मूर्च्छा येऊन जमिनीवर कोसळताच, त्या राखणदाराने त्याच्या गळ्यात दोरखंडाने एक उखळ बांधले.

एवढे करून तो पहारेकरी आपल्या झोपडीत जाताच, शुद्धीवर आलेले ते गाढव, व गळ्यात बांधण्यात आलेल्या उखळासह कसेबसे घराकडे जाऊ लागले. तेव्हा दूर उभा राहिलेला कोल्हा त्याला म्हणाला, 'गाढवमामा, तुमच्या दिव्य गायनावर बेहद्द खूष होऊन त्या पहारेकर्‍याने तुमच्या सन्मानार्थ हा 'भव्य मणी' तुमच्या गळ्यात बांधला का?' पण लाजेने चूर झालेले ते गाढव एकही शब्द न बोलता निघून गेले.

ही गोष्ट सांगून सुवर्णसिद्धी म्हणाला, 'चक्रधरा, तो कोल्हा हिताचे सांगत असतानाही ते न ऐकल्यामुळे जसे त्या गाढवाच्या गळ्यात उखळाचे लोढणे पडले, तसेच तूही माझे न ऐकल्यामुळेच हे चक्र तुझ्या पाठीशी कायमचे लागले.'

चक्रधर म्हणाला, 'मित्रा, तुझे म्हणणे मला आता पटले. ज्याला सारासार विचार नसतो, तो त्या मंथरक कोष्ट्यासारखा स्वतःच स्वतःच्या नाशाला कारणीभूत ठरतो.'

'तो कसा काय?' असा प्रश्न सुवर्णसिद्धीने केला असता चक्रधर म्हणाला, 'ऐक-

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP