गोष्ट सदुसष्ठावी
स्वतःचे ज्याला 'डोके' नाही, तो मृत नसला तरी जिवंतही नाही.
एका गावात मंथरक नावाचा कोष्टी राहात होता. ज्या हातमागावर साड्यालुगडी बनवून त्या बाजारात विकून तो आपला व आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवी, तो मागच एकदा मोडल्याने, नवा माग बनविण्यासाठी लागणार्या लाकडाकरिता त्याने समुद्रकाठचा एक शिसवी वृक्ष तोडण्याचे ठरविले. त्याप्रमाणे कुर्हाड घेऊन त्या वृक्षाकडे तो गेला असता, त्या वृक्षावर राहणारी एक अप्सरा त्याला म्हणाली, 'हे मानवा, तू जे मागशील ते मी तुला देईन, पण हा वृक्ष तू तोडू नकोस.' यावर तो तिला म्हणाला, 'हे अप्सरे, मी माझ्या बायकोच्या सांगण्यानुसारच वागत असल्याने, तुझ्याकडे काय मागायचे, ते मी तिला विचारतो व ते तुझ्याकडे येऊन मागतो.'
याप्रमाणे बोलून तो कोष्टी घराकडे जाऊ लागला. वाटेत त्याला त्याचा एक न्हावी मित्र भेटला व त्याने नुकताच घडलेला प्रकार त्याच्या कानी घातला. तेव्हा तो म्हणाला, 'अरे, त्या अप्सरेकडे तू राज्य माग. म्हणजे तू राजा व मी तुझा प्रधान. आपण दोघेही प्रजेचे जास्तीतजास्त कल्याण करू व कीर्ती मिळवू. त्या अप्सरेकडे मागायची गोष्ट एवढी सोपी असताना, तू या बाबतीत तुझ्या मूर्ख बायकोचा कशाला सल्ला घेतोस ? तुला स्वतःच वाटोळं करून घ्यायचं आहे काय ? कारण म्हटलंच आहे-
यत्र स्त्री यत्रं कितवो बालो यत्र प्रशासकः ।
तद् गृहं क्षयमायाति भार्गवो इदमब्रवीत् ॥
(जिथे स्त्री, जुगारी वा बालक यांच्या मतानुसार कारभार चालतो, ते घर नाश पावते, असे भार्गवमुनी सांगून गेले.)
'ते काहीही जरी असले, तरी माझ्या घरात बायकोचा शब्दच शेवटचा.' असे उत्तर त्या न्हाव्याला देऊन तो कोष्टी घरी गेला आणि त्याने अप्सरेने देऊ केलेला वर व त्या बाबतीत न्हाव्याने दिलेला सल्ला तिच्या कानी घातला. यावर ती भडकून म्हणाली, 'त्या न्हाव्याला काय कळतंय ? म्हटलंच आहे ना, 'न्हावी, तोंडपुजे आणि भिक्षुक यांचे म्हणणे ज्याने मनावर घेतले, त्याचे वाटोळे झाले.'
म्हणून त्या अप्सरेकडे तुम्ही राज्य मागू नका. एका राज्याचे राजे झालात की नुसते बाहेरचे नव्हे तर जवळ्च्या नातेवाईकांमधेही तुम्हाला शत्रू निर्माण होतील आणि राज्यलोभाने ते तुमचा घात करतील. राज्यलोभामुळेच कौरवांनी त्या सज्जन पांडवांना वनात पाठविले ना? तेव्हा राज्य वगैरे काही मागू नका. तुम्हाला एकच वेळी दोन हातमाग चालवता यावे, म्हणून तुम्ही त्या अप्सरेकडे तुमच्या पाठीच्या बाजूला आणखी एक मस्तक व आणखी दोन हात मागून घ्या, म्हणजे मागे पुढे असे दोन माग तुम्हाला एकाच वेळी चालवता येतील आणि त्यामुळे आपले उत्पन्न दुप्पट होऊन आपल्याला मजेत दिवस घालवता येतील.' त्या कोष्ट्याने तिच्या म्हणण्याप्रमाणे त्या अप्सरेकडे ते मागणे मागितले आणि तिने 'तथाऽस्तु ' म्हटले ! पण त्या वरामुळे आणखी एक पाठमोरे मस्तक व दोन हात फुटताच, तो कोष्टी घरी जाऊ लागला असता गावकर्यांना 'हा कुणीतरी राक्षस आहे' असे वाटले आणि काठ्यांच्या प्रहारांनी त्यांनी त्याला ठार केले.'
ही गोष्ट सांगून चक्रधर सुवर्णसिद्धीला म्हणाला, 'मित्रा, हितचिंतकाचे न ऐकल्यामुळेच त्या कोष्ट्याने स्वतःचा नाश करून घेतला. जो मनुष्य लोभाच्या आधीन होऊन नको त्याचे ऐकतो किंवा अशक्य गोष्टींच्या स्वप्नात रंगून जातो तो त्या सोमशर्माच्या पित्याप्रमाणे थट्टेचा विषय बनतो.' यावर 'तो कसा काय ?' असा प्रश्न सुवर्णसिद्धीने विचारला असता चक्रधर म्हणाला, 'एकदा असं झालं-