ऐशी प्रेमाची ती जाती, लाभाविणे करी प्रीती - तुकाराम
सृष्टीचा लडिवाळ बाळ वेल्हाळ कवी धाकटा
अफाट जगहाटात पाहिला हिरमुसला एकटा.
कळवळली कनवाळु मनी असमाय मायमावली
बाजारातुन काढून मायापाखर वर घातली.
चंद्रसूर्य खेळनी दिली खेळाया तेजागळी,
कुरवाळी हळुवारपणे पण फुले कविमनकळी.
नक्षत्रांची, चटक फुलांची, माळ टपोरी नवी
जरतारी तारात गुंफुनी लेकरास लेववी.
आकाशाचे अंगण झाडुनि अवीट रंगे वरी
विचित्र रेखा लिही लिही ती कळाचतुर सुंदरी.
'बाळ उदासी वणवण भटकुन अपार निष्टुर जगी.
असेल थकला, -विचारात या क्षणभर झाली उगी.
प्रेमासम निज अमर्याद, अक्षय्य, विनिर्मित करी
शुद्ध दुधाची नदी; पाहती अझुनी जन अंबरी.
एकाहुनि आगळी एक, रुचिरत्वे निस्तुळ खरी,
दृश्याची ती असंख्य लेणी पुढे मुलाच्या करी.
शिशुमन रमावायास करी आयास माय ती असे,
अगाध माया मोठ्यांनाही नाचवितसे भलतसे !
अळुमाळ परंतु न तो रिझला, काळोख दाट दाटला,
अजाणपण-जाणिव उपजता दृश्यलोभ आटला.
दृश्याचा अवडंबर अंबर पदर दूर सारुन
विशाळ वक्षी घट्ट धरी मग कवीस कवटाळुन.
सान्त अनन्ताची मिळनी ती, अगम्य अद्भुत स्वारी !
मायलेकरे अभिन्न झाली निजानंदसागरी.
सृष्टीशी कवि समरस झाला, प्राण तिचा आतला;
ह्रत्कमळाची तिच्या कळाली फुलती-मिटती कळा.
बोजड बाह्यालंकाराची झण्काराची रति
नुरली, अर्थाकार तयाची झाली प्रेमळ मति.
कवीच झाला सृष्टी, सारी सृष्टी झाली कवि,
दिसण्याचे-लपण्याचे गारुड अपूर्ण हा भासवी.
आकाशाचा अणू घेउनी त्यात विश्व दाखवी,
फुंकर घालुनि अजस्त्र विश्वा क्षणार्धात लोपवी,
हा हासता हसते ती, अथवा हा रडता ती रडे.
पहाट फुटते हा उठता हा निजता झापड पडे.
पूर्णापासुनि ढळलेले जग जाते पूर्णाकडे,
लांबण मोठी, वाट बिकट ती उतार चढ वाकडे.
सृष्टीचक्र हे तोल जाउनी कलते भलतीकडे,
खडतर मार्गी दीर्घकाळ ते केव्हा केव्हा अडे.
चक्र सचेतन, सतेज, पण कीटाच्या काळ्या पुढे
चक्र काळ, हा काळवंडुनी करी कधी हिंपुटे
उंचवट्यावर केव्हा जाता प्रकाशकण पाहते
पूर्णत्वाच्या भ्रांतीने तेथेच स्वैर नाचते.
पाणथळीचा खोता तेजोभास पाहता कधी
सैराटपणे भडकुनि तिकडे फसते चिखलामधी.
स्नेहाभावे एक्या जागी फिरूनि घरघर करी
तेव्हा वाटे मार्ग कंठिला आपण हा किति तरी !
जाणिव आणि नेणीव मिळोनी स्वभाव याचा घडे;
तेजोन्मुखता परी न मोडे सदा ते पडे;
सुखाभिलाषे अंग चोरणे, थंडपणे थांबणे,
लाभालाभा तोलुनि मोजुनि रूढीने चिकटणे,
या अधमेहुनि त्या अविचारी बुद्धीचे थोरले,
पात निपात अनन्त बरे तेजोभिमुखत्वामुळे.
आनंदाला म्लानपणा नच सौंदर्याला क्षय
स्थलाकडे त्या जाताहे हे विश्वचक्र निर्भय.
मार्गाची रुक्षता न याला यत्किंचित जाणवो,
परिश्रमाची प्रचंडता नच अनुत्साह उपजवो.
काव्यरसामृत यास्तव कारुण्याने निर्मुनि कवि
मृदुमधुरोज्ज्वल गीते गाउनि तेजोबल वाढवी.
भूतकाळचे वैभव किंवा सांप्रतची हीनता
प्रकर्ष भावी समोर दावी कवी समय जाणता.
हित केव्हा कटु बोल बोलुनी, हातभार लावुनी
सृष्टिचक्र हे नीट चालवी वाट उजू दाउनी.
भुताधारे समजुनि चालू काळ नीट, निर्मितो
सोज्ज्वल भविष्यकाळाला, कवि धन्य नव्हे काय तो ?
काव्य अगोदर झाले, नंतर झाले जग सुंदर,
रामायण आधी, मग झाला राम जानकीवर.
झाले कवि होतील पुढे, ह्या विशाल कालोदरी
अघटित घटना घडुन राहिली, कोण कल्पना करी ?
भारतराष्ट्रनभोमुकुरावर, सार्या पूर्वेभर,
चिन्हे दिसती महाकवीच्या आगमनोत्सवपर.
'राजनिष्ठ' कवि सांप्रतचे ते सर्व चला या मिळा,
या रायाचा मार्ग झाडुनी रचा चारुतर फुला.
तुमच्या परंपरेतचि याचा व्हायाचा संभव
जनकत्वाचे पद ते तुमचे, तुमचे ते वैभव !
सृष्टीचे लाडके तुम्ही संलाप तुम्हांशी करी
प्रलाप किंवा विलाप त्याला म्हणोत कोणी तरी.
"अद्वितीय उत्तम न सर्व ते अधम" म्हणुनि लेखिती
दूषक तुमचे अपूर्व त्यांची तर्काची पद्धति !
विजय असो तुमचा, तुमचे जे दूषक त्यांचा तसा
रानफुले ही तुम्हा वाहिली, नंदनवनसारसा !