ज्यांनी भारतपुण्यभूमिवरती फोडोनिया डोंगर
लेणी निर्मुनि दाविले निज कलानैपुण्य लोकोत्तर;
वज्रप्राय कठोर भेदुनि महायत्ने शिलाप्रस्तर
तो कैलास अगम्य आणुनि दिला आम्हास पृथ्वीवर !
ज्यांनी मूर्ति अनेक निर्मुनि नव्या रंगावली रेखिल्या,
ज्यांच्या पाहुनि त्या कलाकृति जगे सोत्कंठ वाखाणिल्या;
हा नेत्रोत्सव पाहण्यास जमले ते तृप्त झाले जन
धीरोदात विभुत्व, ते परतले, तेथील संपादुन.
त्यांनी मूर्ति अनेक यत्न करूनी होत्या श्रमे निर्मिल्या
गर्वोन्माद भरात नीच यवने येवोनि त्या भंगिल्या !
हा विध्वंस समोर एक, दुसरे अद्यापिही चालता -
राष्ट्रात्मा खवळोनि जाय न कसा विच्छेद हे साहता !
प्रज्ञावंत विचारशील असती आम्हात जे संस्थित
साक्षेपे म्हणती समस्त विसरा ही दुष्टता सांप्रत.
सारे यद्यपि शान्तिपाठ पढतो सप्रेम येथे सदा
आहो मानव हे कसे विसरता आम्हास येते, वदा ?
ज्या सन्मूर्तिवरी मनोविहग हा फेरे असे घालित
ते अत्यंत सखोल वाच्य करिता येते कसे ह्रद्गत ?
कोणी निष्ठुर येउनी जरि तिला भंगोनि टाकीतसे
या निर्माल्य जगात, राहुनि अशा, त्याने जगावे कसे ?