त्वद्गुणकीर्तन करितां स्तंभादिक अष्टभाव उपजावे, ।
जावे अनात्मधर्म क्रोधादि मनोविकार वरजावे ॥६१॥
हा काम रामराया ! पुरवावा, कल्पवृक्ष तू साचा; ।
ज्ञाता सर्वगत प्रभु आत्मा प्रिय निर्निमित्त दासाचा ॥६२॥
मन हेचि फार इच्छी की आता सेवणे तुजे पाय, ।
तुजवाचुनि इतरांच्या भजनी मजलागि होय फळ काय ? ॥६३॥
केले म्या मनुजांचे आर्जव बहु चाटुकारही जालो, ।
परि तेथ ताप पावुनि पुनरपि तुजलागि शरण मी आलो ॥६४॥
प्रमदांत पावुनीया श्रम दात क्षुद्र विचकती की जे ।
त्यांची तशाच लोकी सेवा तुजला न जाणता कीजे ॥६५॥
दुर्व्यसनी धर्मरहित निरक्षर क्षुद्र त्यासि मी नमने ।
करुनि श्रमीच जालो, आलो तुज शरण आज दीनमने ॥६६॥
रामा ! शत्रुभ्राता आला तुज शरण त्यासि राज्यपद ।
लंकेचे अर्पियेले, कोण न वंदील ते तुजेचि पद ? ॥६७॥
शरण तरी तुज यावे, नमन करावे तुलाचि सुज्ञाने, ।
गावे तुजेचि गुण, बा ! सेवावे तुजचि मादृअगज्ञाने ॥६८॥
म्हणवुनि तुमचे नामचि राम असे हे मुखी सदा राहो; ।
हा ज्ञानहीन, दीन प्रसन्न होवूनि शीघ्र तारा हो ! ॥६९॥
प्रभुजी ! तुमचे सज्जन उदारपण वर्णितात बहुसाल, ।
सालसता मत्राणी धरिता, शब्दांत सर्व गवसाल ॥७०॥
आळचि घेवुनि मी शिशु आळवितो, निष्ठुरत्व दुर वाळी; ।
आळ निवारुनि माते, आळस टाकूनि धांव, कुरवाळी ॥७१॥
पाळक तू विश्वाचा, बाळ कसा तोंड पसरितो बा ! मी ।
व्याळकराळकठिनतर काळ कसा वारिसी न हा स्वामी ? ॥७२॥
तू करुणाघन रामा ! मी चातक पसरिले असे आस्य; ।
नामामृत कण न मिळे, तरि लोकी फार होतसे हास्य ॥७३॥
विश्वैकमान्य दशरथ, कौसल्या वीरसू सती धन्या ।
तत्पुत्र तू रघुपते ! उपमा तुजला तुजी; नसे अन्या ॥७४॥
ज्ञाता तू, दाता तू, त्राता तू, वीर धीर भर्ता तू; ।
जनपीडाहर्ता तू श्रीरामा ! मुख्य विश्वकर्ता तु ॥७५॥
ब्राह्मणरक्षणसक्षण दक्षिण क्षीणसद्यशोधाम ।
जलदश्यामल कोमल कलिमलहर हरमनोज्ञ रघुराम ॥७६॥
सुरवरमुनिवरनृपवरनुतगुणगण, वरद, परमसुखसदन; ।
त्रिभुवनसनवपटुभुज भवदवभयशमन रुचिरतरवदन ॥७७॥
ऐसे गायिन तुजला, हा माजा काम पूरवी वरदा ! ।
हर दासाचे संकट रामा ! भवसिंधुमग्नजनकरदा ! ॥७८॥
स्तुति करुनि तुजी तुजला आम्ही अज्ञान काय बा ! रिझवू ? ।
गावुनि अमृतगुणांते ह्रदयीचे ताप आपुले विझवू ॥७९॥
शेषप्राचेतसमुनिपराशरव्यासनारदर्षिशुकी ।
गाता गुण पार नसे, यांच्या येतील कोण अन्य तुकी ? ॥८०॥