आर्य केकावली - १०१ ते १२०

केकावली हे उत्कृष्ट वीणाकाव्य तसेच ध्वनीकाव्य आहे. केकावलीतील मुख्य रस भक्ति असून करून रस त्याचा अंगभूत आहे.


बहुसंख्य चपळमर्कटकटके आज्ञेत वर्तली नीट; ।

वीट न धरशील तरी माझे मन काय तुजपुढे धीट ? ॥१०१॥

श्रीसद्मी पदपद्मी होयिल मन भृंग, दाखवुनि पाहे; ।

लब्धसुदुर्लभविषय त्यजिल कसे ? बहु सतृष्ण सकृपा ! हे ॥१०२॥

दे अभयदान देवा ! सेवारत मी तुजा विभो ! भाट; ।

त्यजिता अनादराने करीन लोकात फार बोभाट ॥१०३॥

त्वच्चरणाराधन मी जाणत नाहीच लेशही इतर; ।

नाम्चि गातो, येणे प्रसन्न होवूनि अभय तू वितर ॥१०४॥

आहे प्रसाद मजवरि म्हणुनिच वदनासि येतसे नाम ।

हे जरि मुखा न येते, होता कैचा मनासि विश्राम ? ॥१०५॥

विकळमना मी जे की वदलो त्याची करी क्षमा आर्या ! ।

जे सहनशील दक्षिण कृपाळु विश्वार्ह बुध तदाचार्या ! ॥१०६॥

दुःख न रुचे, सुख रुचे, कर्मे करिता विवेकही न रुचे ।

अमृतफळ कसे देतिल पल्लवपाणी स्वकीय विषतरुचे ? ॥१०७॥

हे सर्व सत्य तोवरि जोवरि तुज शरण पातलो नाही ।

आताथोरपणासचि आपुलिया मात्र राघवा ! पाही ॥१०८॥

गंगेला जावुनिया गावखरीचा मिळे जयी वोढा ।

तयि ते न म्हणे, 'मागे हा कमळ शिवतसे; धरा वोढा ॥१०९॥

तू करुणाघन रामा ! भक्तमयूरासि तूचि सुख देशी ।

सन्निध असोनि बापा ! न करी या किंकरासि परदेशी ॥११०॥

विश्वंभरा ! भरवसा आहे या किंकरासि फार तुजा ।

जे योग्य ते करावे दीनजनोद्धारणैकदक्षभुजा ! ॥१११॥

हा दिन रामनंदन चकोर, तू चंद्रमा रमानाथा ! ।

दे चित्तस्वास्थ्य बरे, गायीन तुज्या यशोकिता गाथा ॥११२॥

बहु गोड गुण तुजे ते ऐकावे आदरे स्वये गावे ।

यावेगळे मनोरथ नसती ते तूज काय सांगावे ? ॥११३॥

सौमित्रे ! मजविषयी तू आर्यप्रार्थना करी काही; ।

भक्ति तुजी श्रीरामी बहु कथिले सत्यशीळलोकाही ॥११४॥

श्रीभरता ! राघवपदलाभरता ! अग्रजासि तू विनवी ।

मज दीनाला रक्षुनि साधावी सद्यशे असीच नवी ॥११५॥

शत्रुघ्ना ! भगवज्जनशत्रुघन ! राघवसि हे कळवी ।

माझे भवभय सारे रामनिदेशेकरूनिया पळवी ॥११६॥

माते ! सीते ! बायी ! प्रार्थावे नृपतिला तुवा आंगे ।

सुखदुःख तुला ठावे; मजविषई उचित ते स्वये सांगे ॥११७॥

भगवद्भक्त हनुमन्‍ । साधो ! साधो यश प्रसिद्ध तुजे ।

मजसाठी रामाचे पाय धरी निजशिरी प्रतापिभुजे ॥११८॥

आंगे रिपुबळहर्ता,बाहुबळे ब्रह्मगोळउद्धर्ता ।

तू मारुते ! पुमर्था देशी रघुवीरसेवनसमर्था ॥११९॥

अद्भुत चरित त्रिजगी लोकोद्धारार्थ करि सुखे विभु जे ।

ते त्वच्चरितसखे बा ! त्वाही केले चरित्र तेवि भुजे ॥१२०॥

N/A

References : N/A
Last Updated : August 19, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP