कहाणी वर्णसठीची

हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.


आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहात होता. त्याला सात मुली होत्या. मुली मोठ्या झाल्या, तसं त्यांना एके दिवशीं त्या ब्राह्मणानं विचारलं. मुली मुली, तुम्ही कोणाच्या नशिबाच्या ? त्याला साही मुलींनी उत्तर केलं, बाबा, बाबा, आम्हा तुमच्या नशिबाच्या ? सातवी मुलगी होती ती त्याला म्हणाली, मी माझ्या नशिबाची. हें ऐकल्यावर तिच्या बापाला मोठा राग आला. मग ब्राह्मणानं काय केलं ? साही मुलींना चांगली श्रीमंत ठिकाणं पाहून दिलीं व थाटामाटानं त्यांची लग्नं केलीं. सातव्या मुलीचं लग्न एका भिकारड्याशी लावून दिलं. त्याच्या अंगावर व्याधि उठली होती, हातपाय झडून चालले होते, आज मरेल उद्यां मरील ह्याचा भरवसा नव्हता. आईनं लेकीची ओटी वालांनी भरली, मुलीची बोळवण केली व तिच्या नशिबाची पारख पाहूं लागली. पुढं थोड्याच दिवसांनीं तो तिचा नवरा मेला. तसं त्याला स्मशानात नेलं. पाठीमागून तीहि गेली. सर्व लोक त्याला दहन करूं लागले. तिनं त्यांना प्रतिबंध केला. ती म्हणाली, आतां तुम्ही जा, जसं माझ्या नशिबी असेल तसं होईल असं सांगितलं. सर्वांनी तिला पुष्कळ समजावून सांगितलं. आतां इथं बसून काय होणार ? पण तिनं कांहीं ऐकलं नाही. तेव्हां लोक आपआपल्या घरीं गेले.

पुढं काय झालं ? तिनं आपल्या नवर्‍याच्या प्रेताला मांडीवर घेतलं. तसं बापानं तिला टोला दिला कीं, तुझं नशीब कसं आहे ? तिनं परमेश्वराचा धांवा केला कीं, देवा मला आईबापानं सांडिया, मी उपजतच कां रांडिया ? असं म्हणून नवर्‍याच्या तोंडांत एक-एक वालाचा दाणा घालीत रडत बसली. मग काय चमत्कार झाला ? माध्यानरात्र झाली. शिवपार्वती विमानांत बसून त्याच वाटेनं जाऊ लागली. तसं पार्वती शंकराला म्हणाली, कोणी एक बाई रडते आहे, असं ऐकूं येतं. तर आपण जाऊन पाहूं या. शंकरानं तें विमान खालीं उतरविलं. दोघांनी तिला रडतानं पाहिलं. रडण्याचं कारण विचारलं तिनं झालेली सर्व हकीकत सांगितली. पार्वतीला तिची दया आली. तिनं सांगितलं, तुझ्या मावशीला वर्णसटीचा वसा आहे, तिकडे जाऊन त्या व्रताचं पुण्य घेऊन ये, तुझ्या नवर्‍याला अर्पण कर. म्हणजे तुझा नवरा जिवंत होईल, असं सांगितलं. शंकरपार्वती निघून गेली.

तिनं नवर्‍याला तिथंच ठेवलं. मावशीकडे गेली. वर्णसटीचं पुण्य घेतलं, इकडे आली. नवर्‍याला दिलं, तसा नवरा जिवंत झाला. रोगराई गेली, कांति सुंदर झाली. बायकोला विचारूं लागला, माझ्या हातापायांच्या कळा गेल्या, देह सुंदर झाला, हें असं कशानं झालं ? तिनं सर्व हकीकत सांगितली. मग दोघे नवराबायको मावशीच्या घरीं गेलीं. तिला वर्णसठीचा वसा विचारला. म्हणाली, श्रावण शुद्ध षष्ठीच्या दिवशीं, एका पानावर तांदूळ घ्यावे, दुसर्‍या पानावर वर्णे (वाल) घ्यावे, त्याजवर दक्षणा ठेवावी, व शंकर नहाती, गौरी भराडी, हें माझ्या वर्णसटीचं वाण, असं म्हणून उदक सोडावं.तें ब्राह्मणास द्यावं. असं दरवर्षी करावं, म्हणजे संकटं नाहीतशीं होतात. इच्छित मनोरथप्राप्त होतात. सतत संपत लाभते. या प्रमाणं तिनं केलं. सुखी झाली. माहेरी गेली. बापाला भेटली. त्याला म्हणाली, बाबा बाबा, तुम्हीं टाकले. पण देवांनी दिलं. पुढं सर्वांना आनंद झाला. तसा तुम्हां आम्हां होवो. ही साठा उत्तरांची कहाणी पांचा उत्तरीं सुफळ संपूर्ण.

N/A

References : N/A
Last Updated : September 25, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP