कहाणी शिळासप्तमीची

हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.


आटपाट नगर होतं, तिथं एक राजा होता. त्यानं एक गाव वसवला. जवळ तळं बांधलं. कांहीं केल्या पाणी लागेना, जळदेवतेची प्रार्थना केली, त्या प्रसन्न झाल्या. राजा राजा, सुनेचा वडील मुलगा बळी दे, पाणी लागेल. हें राजानं ऐकलं. घरीं आला मनीं विचार केला, फार दुःखी झाला. तुझ्या पुष्कळ लोकांच्या जिवापेक्षां नातवाचा जीव अधिक नाहीं, पण ही गोष्ट घडते कशी ? सून कबूल होईल कशी ? तशी त्यानं तोड काढली. सुनेला माहेरीं पाठवावी, मुलगा ठेवून घ्यावा. सासर्‍यानं आज्ञा केली, सून माहेरीं गेली. इकडे राजानं चांगला दिवस पाहिला. मुलाला न्हाऊं माखूं घातलं, जेवू घातलं, दागदागिने अंगावर घातले आणि एका पलंगावर निजवून तो पलंग तळ्यांत नेऊन ठेविला. जळदेवता प्रसन्न झाल्या. तळ्याला महापूर पाणी आलं. पुढं राजाची सून माहेराहून येऊं लागली. भावाला बरोबर घेतलं. मामंजींनीं बांधलेलं तळं आलं. पाण्यानं भरलेलं पाहिलं. तिथं तिला श्रावण शुद्ध सप्तमी पडली. वशाची आठवण झाली तो वसा काय ? तळ्या पाळी जावं, त्याची पूजा करावी, काकडीं पान घ्यावं, दहीभात आणि लोणचं वर घालावं, एक शिवराई सुपारी ठेवावी आणि भावाला वाण द्यावं. एक मुटकुळं तळ्यांत टाकावं आणि देवतांची प्रार्थना करावी, जय देवी ! आई माते ! आमचे वंशी कोणी पाण्यात असतील ते आम्हांस परत मिळावेत ! याप्रमाणें तळ्यांत उभं राहून तिनं त्या दिवशीं केल्यावर, बळी दिलेला मुलगा पाय ओढूं लागला. पाय कोण ओढतं ? म्हणून पाहूं लगली, तोंच तिचा मुलगा दृष्टीस पडला. तिनं कडेवर घेतला. आश्चर्य करू लागली, सासरी येऊं लागली. राजाला कळलं, सून आपल्या वडील मुलासह येत आहे. राजास आश्चर्य वाटलं. त्यानं तिचे पाय धरले. तिला विचारलं, अग अग मुली, तुझा मुलगा आम्हीं बळी दिला, तो परत कसा आला ?

मीं शिळासप्तमीचा वसा केला, तळ्यांत वाण दिलं. जळदेवतांची प्रार्थना केली, मूल पुढं आलं, तसं उचलून कडेवर घेतलं. राजाला फार आनंद झाला. तिजवर अधिक ममता करूं लागला. जशा तिला जळदेवता प्रसन्न झाल्या, तशा तुम्हां आम्हां होवोत. ही साठा उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP