ऐका दीपकांनो, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला एक सून होती. तिनं एके दिवशी घरांतला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनी विचार केला, आपल्यावर उगाच आळ आला आहे, तेव्हां आपण तिचा सूड घ्यावा, असा सर्वांनी विचार केला. त्यांनीं रात्रीं हिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसरे दिवशी हिची फजिती झाली. सासू-दिरांनी निंदा केली, घरांतून तिला घालवून दिली. हिचा रोजचा नेम असे, रोज दिवे घांसावे, तेलवात करावी, ते स्वतः लावावे, खडीसाखरेनं त्यांच्या ज्योती साराव्या, दिव्यांच्या अंवसेचे दिवशीं त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. त्याप्रमाणं हीघरांतून निघाल्यावर तें बंद पडलं. पुढं ह्या अंवसेच्या दिवशीं राजा शिकारीहून येत होता. एका झाडाखालीं मुक्कामास उतरला. तिथं त्याच्या दृष्टिस एक चमत्कार पडला. आपले सर्व गांवातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांपाशी गोष्टी करीत आहेत. कोणाचें घरीं जेवावयास काय केलं होतं, कशी कशी पूजा मिळाली, वगैरे चौकशी चालली आहे. सर्वत्रांनी आपाआपल्या घरीं घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्यामागून राजाच्या घरचा दिवा सांगूं लागला. बाबांनो, काय सांगू ? यंदा माझ्यासारखा हतभागी कोणीं नाहीं. मी दरवर्षी सर्व दिव्यांत मुख्य असायचा, माझा थाटमाट जास्ती व्हायचा, त्याला यंदा अशा विपत्तींत दिवस काढावे लागत आहेत. इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं. असं होण्याचं कारण काय ? मग तो सांगूं लागला. बाबांनो, काय सांगूं ? मी ह्या गांवच्या राजाच्या घरचा दिवा. त्याची एक सून होती, तिनं एके दिवशीं घरांतला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरानें विचार केला, हा आपल्यावर उगाच आळ घातला आहे, तेव्हां आपण तिचा सूड घ्यावा. असा सर्वांनी विचार केला. रात्रीं तिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणांत नेऊन टाकली. दुसरे दिवशी तिची फजिती झाली. सासू-दिरांनीं निंदा केली, घरांतून तिला घालवून दिली. म्हणून मला हे दिवस आले. ती दर वर्षी माझी मनोभावं पूजा करीत असे. जिथं असेल तिथं खुशाल असो ! असं म्हणून तिला आशीर्वाद दिला. घडलेला प्रकार राजानं श्रवण केला. आपल्या सुनेचा अपराध नाहीं अशी त्याची खात्री झाली. घरी आला. कोणी प्रत्यक्षा पाहिलें आहे काय म्हणून चौकशी केली. तिला मेणा पाठवून घरीं आणली. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. सार्या घरांत मुखत्यारी दिली. ती सुखानं रामराज्य करूं लागली. तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टळो ! ही सांठा उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.