कर्मयोग अक्षय हा सूर्याला मी तये सुता मनुला ॥
पुत्रा इक्ष्वाकूला मनु शिकवी हे प्रभू तदा वदला ॥१॥
हे अरिताप असा हा राजर्षी ता परंपरें कळला ॥
काल बहू गेल्याने आता तो योग नष्टसा झाला ॥२॥
कर्मयोग तोच आज कथिला मी मित्र भक्त पार्थ तुला ॥
योग पुरातन असुनी उतम हे गुह्य होय या महिला ॥३॥
प्राचीन अशा सूर्या नूतन तूं योग शिकविला म्हणसी ॥
पार्थ पुसे शंकेने देवाला गोष्ट ही घडेल कशी ॥४॥
अरिताप अर्जुना मम जन्म बहू हे तसेच तव असती ॥
भगवान वदे जाणे मी पार्थाते तुला न आठवती ॥५॥
स्वामी मी प्राण्यांचा अव्यय मी जन्म ही नसे मजला ॥
प्रकृती माझी वेष्टुनि मायेनें मीच घेत जन्माला ॥६॥
ज्या ज्या समयी भारत धर्म ग्लानी अधर्म की पसरे ॥
त्या त्या समयी घेतो जन्मा मी तत्त्व हेच जाण खरे ॥७॥
साधूना रक्षाया निर्दाळायास दुष्ट लोकाना ॥
धर्मा स्थापायाला युगी युगी पार्थ मीच घे जनना ॥८॥
अलौकिक जन्म कर्मा पार्था जो जाणतो यथार्थ नर ॥
त्यास पुनर्जन्म नसे ईश्वर पदा मिळवी तोच पुरुष वर ॥९॥
प्रेम क्रोध भय मुक्त मज ठायी लीन अन्य ना घेती ॥
आश्रय ज्ञान तपाने पवित्र जन मजसि येउनी मिळती ॥१०॥
ज्या रीती मज भजती फल तैसे पार्थ मी तया देतो ॥
कोण्या मार्गे जावो अंतीं मजलाच येऊनी मिळतो ॥११॥
फल आशा धरितीते देवांना पूजितीच भक्तीने ॥
सत्वरच प्राप्त होते सिद्धी या जगति पाथ कर्माने ॥१२॥
गुणकर्म विभागाने ब्राह्मणादि चार वर्ण मी रचिले ॥
त्याच्या कर्त्या मजला अव्यय अकर्ता पाहिजे गणिले ॥१३॥
कर्मे न बांधिती मज कर्म फलेच्छा मज कधी नाही ॥
सत्य स्वरुप माझें जाणे त्या कर्म बंधना कांहीं ॥१४॥
प्राचीन मुमूक्षूंनी समजुनि हें सर्व कर्म ही केले ॥
यास्तवच पूर्वजा समकर्मा त्वां पाहिजेच आचरिलें ॥१५॥
कर्म अकर्म कसें हे ज्ञातेंही जाणणेत गोंधळले ॥
कथितो ज्ञाना मी त्या अज्ञान मुक्त मर्म तुला कळलें ॥१६॥
दुर्बोध कर्म आहे सकाम राजस तसेच विपरीत ॥
कर्म विकर्मच जाणा अकर्म तें फलाशा नसे ज्यांत ॥१७॥
अकर्म जन कर्माला कर्म गणी ज्या अकर्म जन वदती ॥
तोच होय कर्मयोगी कर्म करी बुद्धिमान जया म्हणती ॥१८॥
उद्योगांत फलाशा ज्याच्या नाहीं तपास बुध जगती ॥
कर्मे ज्ञानाग्नीने जाळी पंडित असें तया म्हणती ॥१९॥
कर्म फलेच्छा त्यागी कर्मात मग्न धरी न कोणाचा ॥
आधार असा कर्मे करिताही कर्मरहित तो साचा ॥२०॥
सर्व फलाशा सोडी त्यागी संगास इंद्रिया दामी ॥
पुरुष न पापी ऐसा युक्त जरी तो निसर्ग वपु का मी ॥२१॥
संतुष्ट सहज लाभे द्वंद्व मुक्त मत्सरास जो टाकी ॥
सिद्धि असिद्धि समानचि कर्म करी तरि न बद्ध तो लोकी ॥२२॥
राग द्वेष नसे ज्या आसक्ति न ज्ञानमग्न चित्त जया ॥
यज्ञास्तव कर्म करी त्यांचें तें सर्व कर्म जात लया ॥२३॥
आग्नी साधन अर्पण होमहवन हे ब्रह्म ज्या गमते ॥
योगी खरा असें तो ब्रह्मस्वरुप निश्चये तया मिळते ॥२४॥
काहीच कर्म योगी देवा प्रीत्यर्थ हवन्ते करिती ॥
यज्ञाने यज्ञाते ब्रह्मस्वरुप अग्निमधे हविती ॥२५॥
श्रोत्रे इंद्रियादि कांहीं संयम अग्नींत करिति कीं हवना ॥
शब्दादी विषयानी इंद्रिय अग्नीस इतर जन यजना ॥२६॥
इंद्रिय कर्मे कोणी प्राणांचीही तशीच करिति हुत ॥
अर्पून सर्व कर्मा ज्ञान प्रदिप्त संयम अग्नीत ॥२७॥
संयमी पुरुष कोणी तपयज्ञ वसुयज्ञ योग यज्ञाला ॥
स्वाध्याय यज्ञ करिती हविति ज्ञान इतर यज्ञाला ॥२८॥
प्राण अपानी कोणी प्राणात अपान इतर होमीती ॥
प्राणायाम परायण प्राण अपानास रोधुनी धरती ॥२९॥
कोणी आहार नियमुनि प्राण प्राणा मधेच होमीती ॥
यज्ञेच सर्वजण पापास दग्ध आपुल्या करिती ॥३०॥
यज्ञावशेष अमृता भक्षि सनातन ब्रह्मपद पावे ॥
कुरुश्रेष्ठ इह नाही यज्ञ न करी त्या पद कसे मिळावे ॥३१॥
अनेक विध यज्ञ असे ब्रम्हाच्या मुखी सर्वही असती ॥
हे ज्ञान तुला घडता कर्मापासून होय तुज मुक्ती ॥३२॥
ज्ञानाचा श्रेष्ठ यज्ञ द्रव्य-मयाहून जाण अरि ताप ॥
पार्था विलया पावे ज्ञानांतच कर्म शेवटी पाप ॥३३॥
प्रश्न विनय सेवाही यायोगे तू ज्ञानि जन्म पुसशी ॥
ज्ञान कसे मिळवावे करिती तुज बोध हा तत्वदर्शी ॥३४॥
पांडव या ज्ञाने पुनरपि मोहा न पावशी ऐशा ।
बघशी तुज मज ठायी त्वयीं भूत वस्तू राहसी आशा ॥३५॥
समजसि अपणा जरि तू पाप्यामध्येच अग्रगण्य तरी ॥
ज्ञानरुप नौकेनें जाशी तू पाप अब्धि पर तीरी ॥३६॥
प्रदीप्त अग्नी जैसा काष्ठाचे भस्म अर्जुना करितो ॥
सर्वाही कर्मांचें भस्म तसे ज्ञान अग्निही करितो ॥३७॥
ज्ञान समज गती या पवित्र वस्तू नसे दुजी काही ॥
योग साध्य कालानें होई तो ज्ञान मिळवी आपणही ॥३८॥
उत्सुक जो ज्ञानार्थी श्रद्धाळू इंद्रियास वश ठेवी ॥
ज्ञाना मिळवी जलदी ज्ञानाने पूर्ण शांति ही मिळवी ॥३९॥
श्रद्धा नसोनि अज्ञहि संशयि जो नाश सत्य तो पावे ॥
इह परलोक न मिळता सुख मग ते कोठुनी तया व्हावें ॥४०॥
धनंजय कर्मयोगे त्यागी जो कर्मबंध संशय ही ॥
ज्ञानाने नाशी त्या आत्मज्ञान्या न कर्म बंधन ही ॥४१॥
भारता ज्ञान खड्गे अज्ञानज त्हृदय संशया तोडी ॥
योगावलंबन करी युद्धाला ऊठ मोह हा सोडी ॥४२॥
सारांश
शा.वि.
घेतो मी अवतार पार्थ जगती येती न जे मोजिता ॥
दुष्ता निर्दलुनी स्वभक्त अवना मी योजितो तत्वता ॥
नेता मी जगतास हे समजुनी अर्पी स्वकर्मे मला ॥
ऐसें जो करितो न कर्म कधिही बांधी जगी त्याजला ॥१॥