समश्लोकी भगवद्‌गीता - अध्याय सोळावा

संस्कृत भाषेतील गीतेचे पद्यरूपात मराठी भाषेत रूपांतर करण्याचे अवघड कार्य सदाशिवराव परांजपे यांनी केले.


श्री भगवानुवाच

अभयत्व तशी निष्ठा ज्ञान योगात शुद्ध पण चित्ती ॥

दान दम यज्ञ तैसा स्वाध्याय तप बहु सरळ ती वृत्ती ॥१॥

अक्रोधत्व अहिंसा त्याग सत्य अपैशुनच मनी शांत ॥

निर्लोभी भूतदया मर्यादी चंचल मृदु तशात ॥२॥

तेज क्षमा धृति शुद्धी अद्रोही अभिमान नसे ज्याला ॥

त्याचे गुण भारत जो ये दैवी संपदेत जन्माला ॥३॥

दंभ दर्प मान अती क्रोध अज्ञान कठोरता ज्याला ॥

संपदा आसुरी ती पार्था तो ज्यात येत जन्माला ॥४॥

दैवी मोक्षा प्रत नेते ती आसुरीच बंधाला ॥

पांडव शोका न करी दैवी मध्येच जन्म तव झाला ॥५॥

भूतात दोन असती दैवी तैसेच आसुरी लोक ॥

दैवी पूर्ण कथियले कथितो मी आसुरी पार्थ ऐक ॥६॥

प्रवृत्ति वृत्ति न कळे मानव आचार शुद्धी सत्याचे ॥

ऐसे जन जे असती आसुरीत जन्म जाण तू त्यांचे ॥७॥

निराधार मिथ्या जग ईश्‍वर नाही असेच ते म्हणती ॥

कामाविण हेतु नसे दोहोचा भोग हीच उत्पत्ती ॥८॥

आसुरी अल्पबुद्धी नष्ट लोक समजुतिने ऐशा या ॥

क्रूर कर्मे करोनी जग शत्रू क्षय होती विश्‍वा या ॥९॥

विषय भोग अतृप्‍त जरि ती इच्छा ढोंग गर्व मान जया ॥

अशुद्ध आचरनाचे मोहे प्रवर्तति दुष्ट कर्मा या ॥१०॥

अमर्याद चिंता ती व्यापी आमरण सर्व लोका या ॥

विषयीं दंग असोनी मानिति सर्वस्व विषय भोगा या ॥११॥

बद्धच आशापाशी काम क्रोधा मधेच सांपडती ॥

विषयभोग तृप्‍ती स्तव अन्याये द्रव्य संचया करिती ॥१२॥

मी हे आज मिळविले या मनोरथास मीच मिळवीन ॥

हे धन माझे आहे होईल माझेच सर्व इतर धन ॥१३॥

शत्रुस या मी वधिले वधीन दुसरे समर्थ मी आहे ॥

भोक्‍ता मी सिद्ध मीच शक्‍ति मान मी सुखी मनी वाहे ॥१४॥

धनवान कुलीन मीच मजसम न अन्य करीन मी यज्ञ ॥

तोषवीन दानाने मोहे बरळे असेच तो अज्ञ ॥१५॥

अशा अनेक विचारे पडवी भ्रांतिष्ट मोह जालात ॥

दंग विषयोपभोगी पचती ऐसे अशुद्ध नरकात ॥१६॥

मोठे स्वतास म्हणती गर्व मान धन मदांध जे होती ॥

शास्त्र विधी झुगारुनी केवळ दंभेच यज्ञ ते यजिती ॥१७॥

क्रोध मी पण बळ गर्व आश्रय यांचा करुन ते असती ॥

स्वपर देहस्थ ऐशा माझा ते द्वेष मत्सरे करती ॥१८॥

क्रूर द्वेषी ऐसे अशुद्ध नराधम जे जगी असती ॥

देतो सतत तयाना जगती मी आसुरीच योनी ती ॥१९॥

कौंतेय आसुरीया येता योनीत मूर्ख बहु जन्म ॥

मजला न मिळविता ते ऐसे जन मिळवितात गति अधम ॥२०॥

आत्म्याच्या नाशा हे द्वार तिहेरी क्रोध काम लोभ ॥

यास्तव हे टाकावे न धरावा त्यावरी कधी लोभ ॥२१॥

अज्ञान तीन दारे यातून मुक्‍त मनुष्य कौंतेया ॥

झटतो कल्याणाला मिळते ती मग श्रेष्ठ गतिच तया ॥२२॥

शास्त्र विधीला सोडी स्वेच्छाचारेच वर्ततो जगती ॥

सिद्धी कधी न मिळवी न सांख्य न श्रेष्ठ जी असे गति ती ॥२३॥

कार्य अकार्य कसे हे ठरविणेस शास्त्र हाच मार्ग असे ॥

शास्त्र विधी युक्‍तच जे करणे तुज कर्म तेच योग्य असे ॥२४॥

सारांश

शा.वि.

योनी दोनच की जगी असति या दैवी दुजी आसुरी ॥

दैवी जीत असे क्षमा शुचि पणा ना गर्व तो अंतरी ॥

दंभ क्रोध मनी असत्य विषयी लोभी असे आसुरी ॥

दैवी शास्त्र वरी तशी न आसुरी शास्त्रास तू आदरी ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : December 15, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP