अर्जुन उवाच
योग युक्त सतत असे भजती तुजला तसेच जे भजती ॥
अव्यक्त अक्षर ऐसें ब्रह्म यांत योग्य कोणते असती ॥१॥
योग युक्त सतत मना मज ठायीं ठेउनच मज भजती ॥
श्रद्धा युक्त असे जे श्रेष्ठ तेच जाण मम मते असती ॥२॥
अव्यक्त अचल अचिंत्य दृढ अविनाशी अवर्णनीयाला ॥
भजती सर्वव्यापी स्थीर अढळ जे अशाच रुपाला ॥३॥
इंद्रिय निग्रह करिती प्राणी हित चिंतनांत मन गुंते ॥
समबुद्धीही भूती ते येती मजकडेच की अंते ॥४॥
ज्याचे मन अव्यक्ती सक्त असे त्याग कष्ट बहु होती ॥
देही जो त्यास मिळे कष्टानेच तशी अव्यक्त गती ॥५॥
होऊन मत्परायण कर्मे मजलाच सर्व अर्पीती ॥
अनन्य योगें ध्याती उपासना मम तशीच जे करिती ॥६॥
आसक्ती मम ठायी पार्था त्यांना उशीर न करितां ॥
मृत्यू जयात ऐशा संसारी होय मीच उद्धरितां ॥७॥
ठेवी मन मम ठायी माझे ठायींच बुद्धिही स्थीर ॥
म्हणजे पुढे न संशय माझे ठायींच वास करणार ॥८॥
स्थैर्य मना आणाया धनंजया तुं समर्थ नसशील ॥
इच्था धरी अशी की अभ्यासे मजसि तू मिळवशील ॥९॥
अभ्यास अशक्य तरी अर्पीतव सर्व कर्म ही मजला ॥
ऐशा कृत्यानेही अंती तू पावशील सिद्धीला ॥१०॥
अशक्य हे ही तुज तर अवलंबी कर्मयोग माझा हा ॥
करुन मन संयमना लोभ सोड कर्म फल मिळावें हा ॥११॥
ज्ञान थोर अभ्यासापेक्षा त्याहून थोर तें ध्यान ॥
कम फल त्याग तयापेक्षा ये शांति तया मागून ॥१२॥
प्राण्याशी द्वेष नसे मैत्री भूतीं न ज्या पर अपुलें ॥
विरागी निरहंकारी दुःख सुखहि सारखे मनी गणिलें ॥१३॥
मनी तुष्ट संयमी निश्चय दृढ बुद्धि मनहि मज ठायीं ॥
क्षमा शील भक्त असे जन मजला तोच बहु प्रिय होयीं ॥१४॥
त्रास नसे जो लोका लोक जया त्रास मुळी न च होती ॥
क्रोध हर्ष भय तैसा उद्वेग मुक्त प्रिय मजशि अती ॥१५॥
नसे अपेक्षा काहीं दक्ष शुद्ध उदासीन निश्चिंत ॥
संकल्पाला त्यागी प्रिय मजला होय तोच मम भक्त ॥१६॥
हर्ष द्वेष नसोनी गतशोक नसे न इच्छि कांही ॥
शुभाशुभहि कर्म फले त्यागी प्रिय भक्ति मान मज तोही ॥१७॥
शत्रू मित्र समज या अपमान मान समान जो मानी ॥
आसक्ति न कोठेही सुखदुःखे शीत ऊष्ण सम मानी ॥१८॥
स्तुति निंदा सम मानी मौन धरी शांतही मिळे त्यात ॥
स्वस्थान जसें मज तो स्थिर चित्त भक्त मुनी प्रिय होत ॥१९॥
मत्परायणच असुनी ज्ञान अमृत-मय पवित्र सेवीती ॥
श्रद्धा युक्तहि असती प्रिय अतीच मजसि भक्त ते होती ॥२०॥
सारांश
शा.वि.
पूजा जे करिती तुझीच अथवा ब्रह्मास जे पूजिती ॥
कृष्णा श्रेष्ठ तयात अर्जुन पुसे जी रीत ती कोणती ॥
पूजावे मजलाच हेच बरवे माझे मते पांडव ॥
भक्ती ब्रह्मपदी अती कठिण हे सांगे तया यादव ॥१॥