कृष्णास अर्जुन वदे वानिसि संन्यास एकदा योगा ॥
यातील निश्चयाने श्रेयस्कर कोणता सांग तो गा ॥१॥
मोक्षा दोनहि देती संन्यास तसाच योग कर्माचा ॥
श्रेष्ठ कर्मयोग असे बोले भगवान उत्तरी वाचा ॥२॥
द्वेष न कोणासह ही निरिच्छ जो तोच नित्य संन्यासी ॥
द्वद्व मुक्त कर्म करी बंधन तें नच कदापि हो त्यासी ॥३॥
कर्मयोग सांख्य असे भेद करी मूर्ख नच तसे ज्ञाते ॥
आचरिता एकाला दोहोचे जाण सर्व फल मिळते ॥४॥
सांख्याने स्थान मिळे कर्मयोग तेच मिळवुनी देतो ॥
कर्मयोग सांख्याला समजे ज्ञानीं खराच एकच तो ॥५॥
योगाश्रया न करितां कठिण महाबाहु कर्म संन्यास ॥
ब्रम्हपद सत्वर मिळे योगाने युक्त जो तया मुनिस ॥६॥
अपुले अंतर शोधी जिंकी जो इंद्रिया तसे मनही ॥
प्राण्याच्या आत्म्याला समजे जो पुरुष आपणा सम ही ॥७॥अ
ऐशा मतिनें कर्मे केली जरि सर्वदा तरी तीं ही ॥
कर्त्याला नच होती कर्मे ऐशींच बंधने कधिही ॥७॥ब
कर्मे मी न करी नित्यहि वसो ज्ञात्या मनी भावना ॥
बघता श्रवणीं स्पर्शा हुंगिता तसेंच खात असताना ॥८॥
चालता झोप घेता श्वासोच्छवासी मुखी सदा वदता ॥
मल विसर्जन करिता नेत्रांची उघड झाकही करितां ॥९॥अ
कर्मेही करितांना प्रवृत्त विषयांत इंद्रियें होती ॥
जाणावें हे ऐसे पुरुषाने सर्व कर्म या जगती ॥९॥ब
सोडुनीं फल आसक्ती ब्रम्हपदी कर्म अर्पीतो ॥
कमल पत्र जेवि जलें न भिजे कर्मे न बद्ध तैसा तो ॥१०॥
सोडूनि फलासक्ती व्हावयास आत्मशुद्धि केवळ तो ।
योगीच सर्व कर्मे देहेंद्रिय बुद्धि वाणिनें करितो ॥११॥
फलाशा त्याग योगी करुनी मिळवीच नित्य शांतीला ॥
वासना जन्य होतो फलाशा बंधन योग युक्ताला ॥१२॥
संन्यास मनें करुनी कर्मांचा इंद्रिया निग्रही जो ॥
नवद्वार देहस्थहि योगी काही करी न करवी जो ॥१३॥
परमेश्वर जीवाचे कर्तेपण कर्म तत्फल न निर्मी ॥
प्रकृतीच सदा असते मूलभूत पहा सर्वही कर्मी ॥१४॥
पापपुण्य काहीही ईश्वर ना घे कधीच कवणाचे ।
अज्ञान ज्ञानाला झाकी हें मूळ लोक मोहाचे ॥१५॥
ज्ञानाने नाशियले ज्यांचें अज्ञान सर्व ते लोक ॥
ब्रम्हपद तया दावी तेजस्वी ज्ञान ते जसा अर्क ॥१६॥
बुद्धि लीन जयांची ब्रह्मास तशी मनास विश्रांती ॥
निष्ठेस स्थैर्य तसे तत्परायण जे पुरुष या जगती ॥१७॥अ
पापें अशा जनांची ज्ञानानें सर्व पावती नाशा ॥
पुनर्जन्म ना येई निष्पापी त्या जनास ज्ञानि अशा ॥१७॥ब
हत्ती कुत्रे गाई पंडित विद्वान विनय युक्ता ना ॥
ज्ञानी मानी भावें चांडाळादिक समान सर्वा ना ॥१८॥
ज्यांचे मनास ऐशी समता येई असे जनन मरणा ॥
वसती जरि या लोकी दोहोना तेच जिंकिती जाणा ॥१९॥अ
ब्रह्म दोष रहित तसें सर्वाठायी समान हे असतें ॥
ब्रह्मा तयाच साठी ज्ञान्यांच्या बुद्धिला स्थैर्यही येते ॥१९॥ब
बुद्धि स्थिरता पावे गुंते ना जो कधीच मोहात ॥
पुरुष ब्रह्म वेत्ता तो न हर्षे प्रिय वस्तु हो जरी प्राप्त ॥२०॥अ
दुःखी तसा न होई वस्तू अप्रिय त्या जर मिळाली ॥
ऐसी समता येई वृत्ति तयाचि ब्रह्मपदी रमली ॥२०॥ब
विषयांत मन न गुंते मिळतो त्यालाच आत्म आनंद ॥
ज्ञानी ब्रह्माशी तो पावे तादात्म्य नित्य जे सुखद ॥२१॥
कौंतेय दुःख मूलक जन्मति जे इंद्रियामधें भोग ॥
आद्यंतवंत तयांत बुध न रमति परी करिति कीं त्याग ॥२२॥
काम क्रोधाला जो शरीर धारी तरी करी सहन ॥
योगी तोच खरा ही जाणा तो राहतो सुखात जन ॥२३॥
अंतः सौख्यानंदहि अंतर्ज्ञाने प्रकाशितच असतो ॥
ब्रह्मरुप तो होतो ब्रह्मातच लीन होय योगी तो ॥२४॥
द्वैत भाव पाप तसे नष्ट होय ते आत्म संयमी असती ॥
भूतहितेच्छू योगी ते निर्वाण ब्रह्म मिळवुनि घेती ॥२५॥
काम क्रोधा त्यजुनि आत्मसंयमनहि आत्मज्ञान तसें॥
मिळवी यतीस ऐशा ब्रह्म निर्वाण मिळे अनायासे ॥२६॥
दृष्टी भुवयामध्ये लावुनि शब्दादि बाहय विषयांना ॥
त्यागी नियमी प्राणा नासिकस्थ अपानादि वायूना ॥२७॥
इंद्रिय मन बुद्धीला संयमि तो क्रोध भय जया नाही ॥
मोक्ष परायण मुनि तो समजावा नित्य मुक्तसा राही ॥२८॥
तप यज्ञ यांस भोक्ता सर्वजन श्रेष्ठ भूत हितकारी ॥
ऐसे तो मज समजे शांती अक्षय्य असा पुरुष वरी ॥२९॥
सारांश
शा.वि.
धर्माने कथिलेंच कर्म करुनी सोडी अहंकार जो ॥
प्रेम द्वेष नसे मनास समता रात्रंदिनी शांत जो ॥
चिंता ना पुढली तशीच न करी गेहया मनी वस्तुची ॥
संन्यासीच खरा मती स्थिर जया त्या वाण ना शांतिची ॥१॥