नारद-नारायण संवाद :
रुद्राक्ष-महिमा आपल्या अनेक शास्त्रांतून सांगितला आहे. 'देवी भागवतात सांगितले आहे की स्नानादीने निवृत्त होऊन शुध्द वस्त्र परिधान कराव व भस्म लावून रुद्राक्षमाला धारण करावी . नंतर विधिसहित मंत्र जप करावा. जर बत्तीस रुद्राक्ष गळ्यात, चाळीस मस्तकाभोवती, सहा सहा दोन्ही कानात , बारा बारा दोन्ही हातात, सोळा सोळा दोन्ही भुजात, एक शेंडीत, तसेच एकशे आठ रुद्राक्ष वक्षस्थळी धारण केल्यास, धारण करणारा स्वतः नीलकंठ शीव बनतो .
रुद्राक्षास सोने किंवा चांदीच्या तारेत ओवून शेंडीत व कानात धारण करावे. यज्ञोपवीत, हात, कंठ व पोटावर रुद्राक्ष धारण करुन पंचाक्षर मंत्र 'नमः शिवाय' चा जप करावा.
विद्वान पुरुषाने प्रसन्न मन व निर्मल बुध्दीने रुद्राक्ष धारण करावेत. कारण तोच शिव ज्ञानाचे प्रत्यक्ष साधन आहे. जो पुरुष रुद्राक्ष शेंडीत धारण करतो त्याच्यासाठी रुद्राक्ष तारक तत्त्वा ( ओंकार ) प्रमाणे महान आहे. दोन्ही कानात धारण केलेले रुद्राक्ष साक्षात शिव स्वरुप आहेत.
यज्ञोपवीतामध्ये धारण केल्यास रुद्राक्ष वेदांप्रमाणे असतात. हातांत धारण केल्यास दिशाप्रमाणे, तसेच कंठात धारण केल्याने सरस्वती व अग्निदेवतेप्रमाणे महिमावान असतात .
रुद्राक्ष धारणाचा निर्देश चारी आश्रमांत व चारी वर्णांत केलेला आहे. रुद्राक्ष धारण करतात ते साक्षात रुद्राक्ष बनतात. रुद्राक्ष धारण करणार्यांना निषिध्द दर्शन , निषिध्द श्रवण, निषिध स्मरण, निषिध्द वस्तूपासून दोष लागत नाही. जरी तो निषिध्द वस्तू हुंगेल, निषिध्द पदार्थ खाईल किंवा निषिध्द मार्गक्रमण करील तरी तो पापमुक्त रहातो.
जरी रुद्राक्ष धारण केलेला मनुष्य कोणाकडे जेवला तर साक्षात रुद्राने जेवण केले असे मानावे. जो मनुष्य रुद्राक्ष धारण करणार्यास श्राध्दास जेवण घालतो त्यास पितरलोकाची प्राप्ती होते . जे लोक रुद्राक्षधारीचे चरण धुवून ते जल पितात ते सर्व पापांपासून मुक्त होऊन शिवलोकात जातात. जे मनुष्य भक्तिसहित रुद्राक्षयुक्त स्वर्णाभूषण धारण करतात, ते रुद्रत्व प्राप्त करतात .
रुद्राक्षोपाख्यान :
रुद्राक्षाचा अशा प्रकारचा महिमा ऐकून नारदांनी प्रश्न केला "हे निष्पाप ! आपण अशा प्रकारे रुद्राक्षमहिमा वर्णन केलात त्यात महान पुरुषद्वार त्याचे पूजन का करावे ते सांगा ."
नारायणाने सांगितले "हे मुने ! जो प्रश्न आपन विचारीत आहात तोच प्रश्न एका वेळी भगवान गिरीजानाथाना कुमार स्क्न्दाने विचारला होता. त्यावेळी भगवान शंकराने जे उत्तर दिले ते तुला सांगतो .
शुणु षण्मुख तत्त्वेन कथयामि समासतः ।
त्रिपुरो नाम दैत्यस्तु पुराऽऽसीत्सर्वदुर्जयः ॥
हे षण्मुख ! रुद्राक्ष तत्त्वाविषयी कथन करतो.
प्राचीन काली त्रिपुरनामक एक दुर्जन दैत्य होता.
हस्तास्तेन सुराः सर्वे ब्रह्मविष्णवाऽदि देवताः ॥
सर्वेस्तु कथिते तस्मिंस्तदाऽहं त्रिपुरं प्रति ॥
जेव्हा त्याने ब्रह्मा विष्णू इत्यादी सर्व देवतांना त्रास द्यायला सुरुवात केली तेव्हा त्या सर्व देवतांनी त्रिपुरासुरास मारण्याची मला विनंती केली.
अचिन्तयं महाशस्त्रमघोराख्य मनोहरम्
सर्व देवमयं दिव्यं ज्वलंतं वीररुपि यत् ॥
तेव्हा मी एक सर्व देवतायुक्त, दिव्य, जाज्वल्यमान, वीरस्वरुप 'अघोर' संज्ञक मनोहर महाशस्त्राची कल्पना केली .
त्रिपुरस्य वधार्थाय देवनां तारणाय च ।
सर्वविघ्नोपशमनमघोरास्त्रमचिन्तयम् ॥
दिव्यवर्ष सहस्त्रं तु चक्षुरुन्मीलितं मया ।
पश्चन्ममाकुलाक्षिभ्यः पतिता जलबिन्दवः ॥
त्रिपुरासुरास मारणे, देवतांचे रक्षण करणे, तसेच सर्वं विघ्ने दूर करण्यासाठी उन्मीलित नेत्रांनी त्या अघोरास्त्राच्या रचनेविषयी विचार करीत असता माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले .
तत्राश्रुबिंदुतो जाता महारुद्राक्ष वृक्षकाः ।
ममाज्ञया महासेन सर्वेषां हितकाम्यया ॥
नेत्रातील त्या अश्रूंचे रुद्राक्ष वृक्ष बनले. ते माझ्या आज्ञेने सर्व जीवांचे हित साधणारे आहेत.
बभूवस्ते च रुद्राक्षा अष्टत्रिंशत्प्रभेदतः ।
सूर्यनेत्र समुद्भूताःता कपिला द्वादशस्मृताः ॥
ते रुद्राक्ष ३८ प्रकारचे झाले. त्यात माझ्या सूर्य नेत्रा ( उजव्या नेत्रातून ) तून कपिलवर्णाचे बारा प्रकारचे रुद्राक्ष उत्पन्न झाले .
सोमनेत्रोत्थिताः श्वेतास्ते षोडशविद्याः क्रमात् ।
वन्हि नेत्रोद्भवाः कृष्णा दशभेदा भवन्ति हि ॥
माझ्या सोम नेत्रातून ( डाव्या नेत्रातून ) श्वेत वर्णाचे सोळा प्रकारचे व अग्निनेत्रातून ( तृतीयनेत्र ) कृष्णवर्णाचे दहा प्रकारचे रुद्राक्ष निर्माण झाले .
श्वेतवर्णश्च रुद्राक्षी जातितो ब्राह्म उच्यते ।
क्षात्रो रक्तस्तथा मिश्रो वैश्यः कृष्णास्तु शूद्रकः ॥
श्वेत वर्णाचा रुद्राक्ष ब्राह्मण जातीचा, लाल रंगाचा रुद्राक्ष क्षत्रिय जातीचा, मिश्रित रंगाचा वैश्य जातीचा व काळ्या रंगाचा शूद्र जातीचा असतो.
एकवक्त्रः शिवा साक्षाद् ब्रह्महत्त्यां व्यपोहति ।
द्विवक्त्रो देवदेव्यौस्याद् विविधं नाशयेदघम् ॥
एकमुखी रुद्राक्ष साक्षात शिवरुप तसेच ब्रह्महत्या दूर करणारा आहे. दोन मुखी रुद्राक्ष देवीदेवतास्वरुप तसेच विविध पापांचा नाशक आहे.
त्रिवक्त्रःस्त्वनलः साक्षात्स्त्रीहत्यां दहति क्षणात् ।
चतुर्वक्त्रः स्वयं ब्रह्मा नरहत्यां व्यपोहति ॥
तीनमुखी रुद्राक्ष अग्निरुप असून स्त्रीहत्यारुप पापांचा नाश ( भस्म ) करणारा आहे. चतुर्मुखी रुद्राक्ष स्वयं ब्रह्मास्वरुप व नरहत्यानाशक आहे .
पत्र्चवक्त्रः स्वयं रुद्रः कालाग्निनमिनामतः ।
अभक्ष्य भक्षणोद्भ्तैरगम्यागमनोद्भवैः ।
मुच्यते सर्व पापैस्तु पंचवक्त्रस्य धारणात् ॥
पंचमुखी रुद्राक्ष स्वतः कालाग्निनामक आहे. तसेच अभक्ष्य भक्षण व अगम्या गमनाचे पाप दूर करणारा आहे. या रुद्राक्षाच्या धारणेने सर्वं पापे नष्ट होतात.
षड वक्त्रः कार्तिसेयस्तु सा धार्यो दक्षिणे करे ।
ब्रह्महत्यादिभिः पापैः मुच्यते नात्र संशय ॥
सह्य मुखी रुद्राक्ष कार्तिकेय स्वरुप असून उजव्या भुजेवर बांधावेत. हा ब्रह्महत्येपासून मुक्त करणारा आहे.
सप्तवक्त्रो महाभागो ह्यनंगो नाम नामतः ।
तध्दारणान्मुच्यते हि स्वर्णस्तेयादि पातकैः ॥
सप्तमुखी रुद्राक्ष अत्यंत भाग्यशाली तसेच अनंग नामक कामदेव स्वरुप असून, त्याचे धारण केल्यास स्वर्णचोरी इत्यादी पापांपासून मुक्ती मिळते.
अष्टवक्त्रो महासेन साक्षाद देवो विनायकः ।
अन्नकूटं तूलकूटं स्वर्णकूटं तथैव च ॥
दुष्टान्वयस्त्रियं वाऽथ संस्पृशश्च गुरुस्त्रियम् ।
एवामादीनि पापानि हन्ति सर्वा विधारणात् ॥
विघ्नास्तस्य प्रणश्यन्ति याति चान्ते परंपदम् ।
भवंत्येते गुणाः सर्वे ह्यष्टवक्त्रस्य धारणात् ॥
अष्टमुखी रुद्राक्ष साक्षात विनायक स्वरुप आहे. याचे धारण केल्याने अन्न, कापूस, तसेच स्वर्ण यांचे ढीग घरात पडतात. यामुळे दुष्ट स्त्रिया तसेच गुरुपत्नी इत्यादी संस्पृश्यांचे पापसुध्दा नष्ट होऊन जाते . सर्व विघ्ने नष्ट होतात व अंती परमपदाची प्राप्ती होते. अष्टमुखी रुद्राक्ष धारण केल्याने या सर्व गुणांची ( लाभांची ) उत्पत्ती होते.
नववक्त्रो भैरवस्तु धारयेद वाम बाहुके ।
भुक्तिमुक्तिप्रदः प्रोक्तो मम तुल्यबलो भवेत् ॥
नऊमुखी रुद्राक्ष भैरवस्वरुप आहे. यास डाव्या दंडावर बांधले पाहिजे. तो भोग व मोक्ष देणारा व माझ्याप्रमाणे बलशाली बनविणारा आहे.
दशवक्त्रस्तु देवेशः साक्षाद्देवो जनार्दनः ।
ग्रहाश्वैव पिशाचाश्च वेताला ब्रह्मराक्षसाः ।
पन्नागाश्वोपशाम्यंति दशवक्त्रस्य धारणात् ॥
दशमुखी रुद्राक्ष साक्षात जनार्दन भगवान आहे. याच्या धारणने सर्व ग्रह, पिशाच्च, वेताळ, ब्रह्मराक्षस तसेच सर्प यांचे भय दूर होते .
वक्त्रैकादशरुद्राक्षो रुद्रैकादशकं स्मृतम् ।
शिखायां धारयेद्यो वै तस्य पुण्यफलं शुणु ॥
अश्वमेध सहस्त्रस्य वाजपेय शतस्य च ।
गवां शत सहस्त्रस्य सम्यग्द्त्तस्य यत्फलम् ॥
तत्फलं लभते शीघ्रं वक्त्रैकादश धारणात् ॥
एकादशमुखी रुद्राक्ष एकदश रुद्ररुप आहे. यास शेंडीत धारण केल्याने जी पुण्यफले प्राप्त होतात ती ऐका, "सहस्त्र अश्वमेध यज्ञ, शंभर वाजपेय यज्ञ किंवा एक लक्ष गायी दान केल्याचे फल मिळते .
द्वादशास्यस्य रुद्राक्षस्यैव कर्णे तु धारणात् ।
आदित्यास्तोषिता नित्यं द्वादशास्ये व्यवस्थिताः ॥
गोमधे चाश्व्मेधे च यत्फलं तदवाप्नुयात् ।
शृंगिणी शस्त्रिणां चैव व्याघ्रादीनां भयं न हि ॥
न च व्याधि भयं तस्य नैव चाधिः प्रकीर्तितः ।
न च किंचिद्भयं तस्य न च व्याधिः प्रवर्तते ।
न कुतश्च्द्भयं तस्य सुखी चैवेश्वरी भवेत् ॥
द्वादशमुखी रुद्राक्ष कानात धारण केल्याने त्यात निवास करणारे द्वादश आदित्य प्रसन्न होतात. तसेच अश्वमेधादि यज्ञांचे फल प्राप्त होते. शिंगवाले प्राणी , शस्त्रधारी व व्याघ्रादि क्रूर पशूंचे भय रहात नाही. शारीरिक तसेच मानसिक पीडा दूर होऊन ऐश्वर्य प्राप्त होते.
वक्त्र त्रयोदशो वत्स रुद्राक्षो यदि लभ्यते ।
कार्तिकेयसमो ज्ञेयः सर्वकामार्थसिध्दिदः ॥
रसो रसायनं चैव तस्य सर्व प्रसिध्दयति ।
तस्यैव सर्व भोग्यानि नात्र कार्या विचारणा ॥
हे वत्स ! जर त्रयोदशमुखी रुद्राक्ष प्राप्त होईल तर त्याच्या धारणाने कार्तिकेयाची समानता प्राप्त होते. तो रुद्राक्ष सर्व इच्छा पुरविणारा सिध्दिदायक आहे . रस-रसायनाची सिध्दी देणारा व सर्व प्रकारची प्रसिध्दी प्राप्त करुन देणारा आहे. यापासून सर्व भोग प्राप्त होतात.
चतुर्दशास्यो रुद्राक्षो यदि लभ्येत पुत्रक ।
धारयेत्सततं मूर्घ्नि तस्य पिण्डः शिवस्य तु ॥
पूज्यते सन्ततं देवैः प्राप्यते च परागतिः ।
रुद्राक्ष एकः शिरसा धायों भक्त्या द्विजोत्तमैः ॥
हे पुत्र ! जर चतुर्दशमुखी रुद्राक्ष प्राप्त झाला तर त्यास सदैव मस्तकावर धारण करावा. त्यामुळे धारक शिवसमान बनतो. त्याची देवतांकडुन सदैव पूजा होऊन त्यास परम गती प्राप्त होते . श्रेष्ठ ब्राह्मणाने भक्तिभावपूर्वक डोक्यावर धारण करावे.
षड्विंशद्भिः शिरोमाला पंचाशद ह्रुदयेन तु ।
कलाक्षैर्बाहु वलये अर्काक्षै मणिबन्धनम् ॥
अष्टोत्तर शंतैनापि पंचाशद्भिः षडानन ।
अथवा सप्तविंशत्या कृत्वा रुद्राक्षमालिकाम् ॥
धारणाद्वा जपाद्वापि ह्यनन्तं फलमश्नुतं ॥
सव्वीस रुद्राक्षांची माळा डोक्यावर, पन्नासांची ह्रुदयावर, सोळांची भुजावर, तसेच बारांची मणिबंधावर धारण करावी. एकशे आठ , पन्नास, किंवा सत्तावीस रुद्राक्षांची माला धारण किंवा जप केल्याने अनंत फलाची प्राप्ती होते.
अष्टोत्तशतैर्माला रुद्राक्षैर्धार्यते यदि ।
क्षणे क्षणेऽश्वमेधस्य फलं प्राप्नोति षण्मुख ।
त्रिसप्तकुलमुद्धृत्य शिवलोके महीयते ॥
हे षण्मुख ! एकशे आठ मण्यांची माला धारण केल्याने क्षणोक्षणी अश्वमेध यज्ञाचे फल मिळते. त्यामुळे त्याच्या एकवीस उध्दार होऊन शिवलोकाची प्राप्ती होते .