सर्व माळांत श्रेष्ठ रुद्राक्षमाला :
रुद्राक्षाची माळ सर्व प्रकारच्या माळांत श्रेष्ठ मानली आहे. शिवपुराणात सांगितले आहे की,
रुद्राक्षमालिनं दृष्ट्वा शिवो विष्णुः प्रसीदति ।
देवी गणपतिः सूयः सुराश्चान्येऽपि पार्वति ॥
रुद्राक्ष धारण केलेल्या मनुष्यास पाहून शिव, विष्णू, देवी, गणेश, सूर्य तसेच सर्व देवगण प्रसन्न होतात .
साधकांसाठी माळेचे महत्त्व आहे. माळेशिवाय जपादी कर्म समुचित रुपाने संपन्न होत नाही. कुठल्याही प्रकारचा जप असेल तरी तो माळेशिवाय होत नाही. जोपर्यन्त साधक माळेचे मणी पुढे ओढत रहातो तोपर्यंत त्याच्यात हर्ष उल्हास व उत्साह असतो .
जोपर्यंन्त हातात माळा नसेल तोपर्यन्त मंत्रसंख्या जप करतेवेळी लक्षात ठेवणे ( मोजणे ) शक्य नाही. त्यामुळे माळ न जपता मंत्रजप करण्यास गेल्यास मंत्रजप मोजत असता साधकाचे मन स्थिर न रहाता दुसरीकडेच फिरु लागते . म्हणून माळेस जपसाधनेत महत्त्व आहे.
माळा हे मोजण्याचे माध्यम नसून त्यात श्रध्दा, विश्वास व साध्याच्याप्रती प्रेम भरलेले आहे. म्हणून माळेच्या पवित्रतेवर ध्यान देणे अपेक्षित आहे.