मराठी मुख्य सूची|विधी|पूजा विधी|रुद्राक्ष धारण विधी|
रुद्राक्षाचे शुभाशुभ प्रकार

रुद्राक्षाचे शुभाशुभ प्रकार

रुद्राक्ष अत्यंत पवित्र, शंकरांना अत्यंत प्रिय, तसेच दर्शन, स्पर्श व जप द्वारा सर्व पापे नष्ट होतात.


विभिन्न शाखांची मते :

शास्त्रकारांनी रुद्राक्षाच्या अनेक प्रकारांची वर्णने केली आहेत. रुद्राक्ष धारण करणार्‍यांनी त्याविषय़ी विचार करुन आपल्या अनुकुलतेनुसार निर्णय घेऊन रुद्राक्ष धारण करावा.

सर्व गात्रेण सौम्येन सामान्यानि विचक्षणः ।

निकर्षे हमरेखाभा यस्यरेखा प्रदृश्यते ॥

सर्व प्रकारे सौम्य, सुंदर तसेच स्वर्णित आभा असलेला रुद्राक्ष उत्तम असतो. सर्वश्रेष्ठ रुद्राक्षाचे रुप सांगताना रुद्राक्षजाबाल या उपनिषदाचे कथन आहे की "धात्रीफलप्रमाणं यच्छेष्ठमेतदुदाह्रुतम्‌ ॥" अर्थात आवळ्याप्रमाणे जो रुद्राक्ष असतो तो सर्वश्रेष्ठ म्हटला आहे.

शिवपुराणातसुध्दा याचे उत्तम, मध्यम व अधम असे प्रकार वर्णिले आहेत. आवळ्याप्रमाणे रुद्राक्ष उत्तम, बोराच्या फळाप्रमाणे तो मध्यम व चण्या ( हरभरा ) प्रमाणे असणारा तो अधम मानला आहे.

परंतु मध्यम व अधम रुद्राक्षसुध्दा संख्या वृध्दिद्वारा अधिक फलदायक होऊ शकतात.

रुद्राक्षजाबालोपनिषदच्या अनुसार :

त्रिशतं त्वधमं पञ्चशतं मध्यममुच्यते ।

सहस्त्रमुत्तमं प्रोक्‍तमेवं भेदेन धारयेत्‌ ॥

जर तीनशे रुद्राक्ष धारण केले जातील तर अधम, पाचशे मध्यम व एक हजार उत्तम म्हटले जातात. याप्रकारे धारण करणार्‍यासही फल प्राप्‍त होते.

आवळ्याप्रमाणे असणारा रुद्राक्ष सर्व अरिष्टे, विघ्नबाधा, संकटे, क्‍लेश यांचे शमन करतो. परंतु बोराच्या फळाप्रमाणे असणारा रुद्राक्ष काही कमी प्रभावाचा नाही . त्याच्या धारणाने सुखाची वृध्दी होते. गुंजफळाच्या आकाराचा रुद्राक्ष धारण सर्वार्थसिध्दी प्राप्‍त करुन देणारे आहे. याविषयी शास्‍त्रकारांचे मत स्पष्‍ट आहे .

यथा यथा लघुःस्याद्वै तथाधिकफलप्रदः ।

एकैकतः फलं प्रोक्‍तं दशांशैरधिकं बुधै: ॥

रुद्राक्ष जेवढा अधिक लहान असेल तेवढे त्याचे फल अधिक असते. हा जेवढा लहान लहान होत जाईल तेवढे तेवढे एक एक दशांश अधिक फल प्राप्‍त होईल.

रुद्राक्षजबालोपनिषदात सांगितले आहे की शेंडीत एक रुद्राक्ष धारण करावा. डोकीवर तीन रुद्राक्ष माळेप्रमाणे ओवून धारण करावे. गळ्यात छत्तीस रुद्राक्षांची माला घालणे श्रेयस्कर आहे . दोन्ही भुजांवर सोळा सोळा रुद्राक्ष धारण करावेत. मणिबंधावर बारा बारा व खांद्यावर पंधरा पंधरा धारण केले पाहिजेत.

एकशे आठ रुद्राक्षांची माला श्रेष्‍ठ असते. हीस गळ्यात जानव्याप्रमाणे धारण करु शकता. दोनपदरी, तीनपदरी, पाचपदरी , सातपदरी माला बनवून धारण केल्यास उत्तमोत्तम फल प्राप्‍त होते. खरे पहाता रुद्राक्षमालेप्रमाणे जगात अन्य श्रेष्‍ठ माला नाही.

मुकूट व कुंडलांच्या रुपातसुध्दा रुद्राक्षधारण हितकर आहे. कानातील बाळ्या व कंठहार या रुपात रुद्राक्ष धारण करु शकता. कल्याणाची अभिलाषा धरणार्‍यांनी रुद्राक्ष बाजूबंध व कुक्षिबंधाच्या स्वरुपात सतत धारण करीत राहिले पाहिजे .

शिवपुराणानुसार समान, स्निग्ध, दृढम स्थूल तसेच काटयांनी युक्‍त रुद्राक्ष सदैव कामना ( इच्छा ) पूर्ण करणारा व मोक्ष -भोग देणारा आहे. त्याने अकराशे रुद्राक्ष धारणेचे महान फल प्राप्‍त होते. जो मनुष्य अकराशे रुद्राक्ष धारण करतो तो साक्षात‌ रुद्ररुप होऊन जातो.

साडेपाचशे रुद्राक्ष धारण करणारा पुरुष श्रेष्‍ठ मानला जातो. तीनशे आठ रुद्राक्षांची माला तीहेरी ( तीनपदरी ) करुन जानव्याप्रमाणे धारण करतो तो सदा भगवान शंकराचा भक्‍त रहातो . शेंडीत तीन रुद्राक्ष धारण करावेत, कानात दोन्ही बाजूस सहासहा रुद्राक्ष धारण करण्याचे विधान आहे. कंठात एकशे आठ रुद्राक्षाची माला धारण करणे श्रेयस्कर असते .

बाह्या, मणिबंध यात अकरा अकरा रुद्राक्ष धारण करावेत. यज्ञोपवीतात ओवून चांगल्या प्रकारचे तीन रुद्राक्ष घालावेत. कंबरेत कौपीनीच्या रुपात पाच रुद्राक्ष धारण केले पाहिजेत . याप्रकारे रुद्राक्ष धारण करणारा मनुष्य शिव-स्वरुप तसेच स्तुतियोग्य होऊन जातो. हा विधी अकराशे रुद्राक्ष धारण करणार्‍यांसाठी अधिक श्रेयस्कर आहे .

अन्य विधिनुसार शेंडीत एक रुद्राक्ष व डोकीत तीन रुद्राक्ष धारण केले पाहिजेत. कंठाभोवती पन्नास, तसेच दोन्ही भुजांत सोळा सोळा रुद्राक्ष धारण करावेत . मणिबंधात ( मनगटात ) बारा बारा, खांद्यावर पाचशे धारण करावे. यज्ञोपवीत एकशे आठ रुद्राक्षाचे करावे . याप्रकारे हा विधी एक हजार रुद्राक्ष धारण करण्याचा आहे. अशा प्रकारे रुद्राक्ष धारण करणारा मनुष्य रुद्रस्वरुप तसेच समस्त देवतांकडून वंदनीय होतो.

किंवा शेंडीत एक रुद्राक्ष व मस्तकाभोवती चाळीस रुद्राक्ष धारण करावेत. दोन्ही कानात सहासहा, बाहुत सोळासोळा व मनगटावर बाराबारा रुद्राक्ष धारण करावेत. कंठाभोवती बत्तीस व गळ्यात एकशे आठ रुद्राक्ष धारण करणारा मनुष्य शिवस्वरुप व सर्व मनुष्यांकडून पूजनीय बनतो.

रुद्राक्षजाबालोपनिषदमध्ये रुद्राक्षाचे दोन इतर उत्तम व मध्यम प्रकार सांगितले आहेत की

स्वयमेव कृतं द्वारं रुद्राक्षं स्याद्‌हि उत्तमम्‌ ।

यत्तु पौरुषयत्‍नेन कृतं तन्मध्यमं भवेत्‌ ॥

ज्या रुद्राक्षात स्वतः सहजरुपे छेद पडलेला असेल तो उत्तम प्रकारचा रुद्राक्ष आहे. परंतु ज्यास मनुष्य प्रयत्‍नपूर्वक छेद ( छिद्र ) पाडतो तो रुद्राक्ष मध्यम प्रकारचा मानला जातो .

रुद्राक्षाने सर्व पापांचा नाश :

रुद्राक्ष धारणेचा कुठल्याच आश्रमात निषेध नाही. ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ किंवा संन्यासी, कुठलाही असो , यास धारण करु शकता. स्‍त्रियांनीसुध्दा रुद्राक्ष धारण करणे लाभदायक असते. यतींसाठी ओंकाराचे स्मरण करुन रुद्राक्ष धारण करण्याचे वचन आहे. रुद्राक्ष सर्व पापांचा नाश करणारा म्हटले आहे.

दिवा विभ्रद्रात्रिं कृतै रात्रौ विभ्रद्‌ दिवाकृतैः ।

प्रातर्मध्याह्‌नसायाह्‌ने मुच्यते सर्व पातकैः ॥

दिवसा रुद्राक्ष धारण करताच रात्री केलेली पापे दूर होतात. रात्री धारण करावे तर दिवसा केलेली ( प्रातःकाल, मध्याहून व सायंकाल ) पापे नष्‍ट होतात.

शिवपुराणानुसार रुद्राक्ष धारण करणारा मनुष्य जरी महापापी असला तरी तो शुध्द होऊन जातो. ती देवता, दैत्य सर्वांसाठी वंदनीय व शंकराप्रमाणे पापांचा नाश करणारा होतो . जो साधक ध्यान व ज्ञानापासून दूर राहून रुद्राक्ष धारण करतो त्याससुध्दा पापमुक्‍ती होऊन परमगती प्राप्‍त होते. अशा प्रकारचा मनुष्‍य जीवनात नेहमी सुखी रहातो. त्यास अकाली मृत्यूचे भय रहात नाही . परंतु "समान्‌ स्निग्धान्‌ दृढान्‌ स्थूलान्‌ क्षौम सूत्रेण धारयेत् ‌" अर्थात एकसारखे रुद्राक्ष, चमकणारे, दृढ व मोठे रेशमी धाग्यात ओवून धारण करावेत.

भृशुण्डद्वारा रुद्राक्षाचे प्रकार, स्वरुप व फलाविषयी प्रश्न विचारल्यावर भगवान कालाग्निरुद्राने रुद्राक्षाच्या मुखानुसार भेदाभेदावर प्रकाश टाकला आहे.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP