७१.
सुदामा तुला भेटण्या काय आला ?
पुन्हां काय तो दे तुला खावयाला ?
कथी त्यास वृत्तांत माझा दयाळा
जरा थांब ऐसे म्हणावें तयाला.
७२.
दुजा आडवा कां कुणी आर्त आला
किमर्थी प्रभो यावया वेळ केला ?
किती वाट पाहूं तुझी यावयाची
मला उत्कटेच्छा तुझ्या दर्शनाची.
७३.
जरी बैससी भोजना भाउराया
तरी सत्वरीं येथ ये आंचवाया
तुझा घे मनोरुप वारु बसाया
वृथा वेळ लागेल त्या वैनतेया.
७४.
पिता आणि माता नसे ज्ञात ज्याला
वृथा शिष्ट जो मानितो आपणाला
असा चोंबडा भाट हा कर्ण खोटा
करी बोध दुःशासनाला करंटा.
७५.
वदे कर्ण त्या राक्षसा दुःस्वभावें
विनावस्त्र या पांडवांना करावें
असे अच्युता शद्ब येतांच कानीं
दिलीं अंबरें फेंकुनी पांडवांनीं.
७६.
पुन्हां कर्ण कर्णास लागे खलाच्या
म्हणे ओढ वस्त्रास या द्रौपदीच्या
करी नग्न ही सुंदरी या खरांची
बघूं या कसा रक्षितो सव्यसाची ?
७७.
पुढें हा वदे दुःष्ट दुःशासनाला
भितो अकय या निर्बला निर्धनीला
जिता द्रौपदी जाण वारांगना ही
असंबद्ध तें यांत कांहीच नाही.
७८.
असें ऐकतां धैर्य माझें गळालें
भयानें मला पूर्ण अस्वस्थ केलें
सुके कंठ हा कोरडें तोंड झालें
पहा सर्व गात्रांत शैथिल्य आलें.
७९.
असा ऐकुनी मंत्र वैकर्तनाचा
खलें ओढिला कांठ या पैठणीचा
विवस्त्रा करुं लागला हा अरेरे !
करुं काय मी सांग आतां मुरारे !
८०.
करा सव्य माझ्या धरुनी बळानें
निरी ओढिली नीच दुःशासनानें
मनोवाहनानें जगद्रक्षका ये
तनू झांक ही सत्वरीं उत्तरीयें.