१११.
तुझी ही स्वसा मानिली दास यानें
मला दाविली नग्न-मांडी खलानें
मदोन्मत्त हा धूळ खाईल जेव्हां
मनस्ताप हा शांत होईल तेव्हां.
११२.
अहंता अहंमन्य वैकर्तनाची
लया सर्व नेईल हा सव्यसाची
कसे विस्मरुं बोल ते या खलाचे ?
समाधान कैसें करुं या मनाचें ?
११३.
मला वेसवा बोधिलें उद्धटें या
करी बोध हा वस्त्र माझें हराया
मरायास हा नीच लागेल जेव्हां
कृतीची स्मृती यास होईल तेव्हां.
११४.
तिरस्कारितो भाट हा पांडवांना
कुमार्गास हा लावितो कौरवांना
शिरच्छेद होईल याचा कदा ? तें
मधूसूदना सत्वरीं सांग मातें.
११५.
महा धूर्त गांधार राजा विदेशी
अविच्छिन्न हा कौरवांचा हितैषी
अम्हां भीक संपूर्ण लावील जेव्हां
स्वदेशास ह नीच जाईल तेव्हां.
११६.
सदा कृष्ण-कृत्यांत हा दंग राहे
अरेराव हा निश्चयें भ्याड आहे
जुवारांत कौटिल्य केलें खलानें
गळा आमुचा कापिला कैतवानें.
११७.
वधाया महाधूर्त या द्यूतकारा
करी सिद्ध माद्री-सुता धीरवीरा
सहश्रेष्ट याला प्रहारील जेव्हां
घराण्यांत या सौख्य नांदेल तेव्हां.
११८.
नरव्याघ्र पार्थानुजानें उदारा
वधावा रिपुग्राम हा गौण सारा
समुच्छेद या कौरवांचा पहाया
अतोनात उत्कंठ मी देवराया.
११९.
नको विस्मरुं हेलना पांडवांची
स्मृती ठेव या कर्षिल्या कुंतलांची
खलध्वंस निर्मूळ पाहीन जेव्हां
मनःकामना पूर्ण होतील तेव्हां.
१२०.
पुरा घ्यावया सूड या दुर्जनांचा
रहा सारथी नित्य तूं पांडवांचा
स्मशानांत हे शत्रु जातील जेव्हां
सुखानें मला झोप लागेल तेव्हां.