९१.
नमस्ते घनःश्याम कृष्णा समर्था
तुवां टाळिलें या स्वसेच्या अनर्था
सहस्त्रावधी अंबरें देउनीया
तुवां रक्षिली लाज माझी कन्हैया.
९२.
पटा लावितां हस्त दुःशासनानें
अतोनात भांबावले मी भयानें
अकस्मात माझें मनोधैर्य गेलें
म्हणूनी हरे मी तुला त्रस्त केलें.
९३.
तुला घोर हे साकडें घालुनीयां
तुझी भंगिली सौख्यनिद्रा कन्हैया
दिला मी तुला ताप हा वासुदेवा
मदन्याय हा सत्वरीं तूं क्षमावा.
९४.
गजेंद्रास नक्रें यदा त्रस्त केलें
तुवां तेधवां त्यास संरक्षियेलें
तुझा पूर्व वृत्तांत हा जाणुनीया
तुला मारिली हांक मी बंधुराया.
९५.
तुझ्यावांचुनी दुःख कोणास सांगूं ?
प्रसंगांत या साह्य कोणास मागूं ?
न येतास तूं आज लीलांगणीं या
तनू झांकिता कोण ही देवराया.
९६.
मला तूंच माता पिता आणि बंधू
गुरु तूंच माझा कृपापूर्ण सिंधू
दुजा आसरा ना मला वासुदेवा
तुवां नित्य सांभाळ माझा करावा.
९७.
प्रभो तूंच आहेस सर्वत्र माझें
वहा तूंच हें सर्व संसार-ओझें
खलें लाविले नाथ देशोधडीला
नको डावलूं तूं तरी या स्वसेला.
९८.
तुझा भाग्यशाली पद-स्पर्श होतां
अहल्या शिला तारिली तूं महंता
तुझ्या पुण्य हस्तें शिशूपाल मेला
मिळे सद्गती त्या महापातक्याला.
९९.
म्हणूनी तुला प्रार्थना देवदेवा
तुझा स्पर्श या कौरवांना नसावा
तुला ठाउके हे कुलांगार पापी
न हे योग्य निर्लज्ज मोक्षा कदापी.
१००.
तुवां कार्य हें पांडवां सोंपवावें
तयांनींच या दुर्जनांना वधावें
खलांचा समुच्छेद होतील जेव्हां
स्त्रियांची भयें नष्ट होतील तेव्हां.