१०१.
हरे पांडवां वैभवा पोचवावें
तुवां सत्वरीं त्यांस शस्त्री करावें
कधीं आमुच्या शस्त्र येणार हातीं ?
कधीं मान्य होणार माझी विनंती ?
१०२.
धनी धर्म हा वैभवाग्रीं असावा
पराधीन हा डाग याला नसावा
पुन्हां धर्म सम्राट होईल जेव्हां
सुखानें प्रजा सर्व नांदेल तेव्हां.
१०३.
निजाधीनता ध्येय या वीरसूचें
तुला ठाउकें गुह्य हें अंतरीचें
कधीं वत्सला तृप्त होणार आशा
कदापी न माझी करावी निराशा.
१०४.
गतश्री निजाधीनता मेळवाया
तुझें शस्त्र-भांडार दे देवराया
गतश्री पुन्हां प्राप्त होईल जेव्हां
स्वसेला तुझ्या सौख्य लाभेल तेव्हां.
१०५.
पराधीनता शल्य लागे मनाला
मुळांतून काढून टाकी दयाळा
मला वीट आला पुरा या स्थितीचा
कधीं डाग जाणार हा मस्तकाचा.
१०६.
निजाधीनता ना विनारक्तपाता
करी नाथ उद्युक्त शत्रु विघाता
रिपू रक्तबंबाळ होतील जेव्हां
प्रभो कोप हा शांत होईल तेव्हां.
१०७.
रिपू-वक्ष फोडीन मी या गदेनें
प्रतिज्ञा अशी घेतली भीमसेनें
कधीं भीम हा वक्ष फोडील याचें ?
उरीं घाव घालील केव्हां गदेचे ?
१०८.
तुझे केंस माखीन मी शत्रु-रक्तें
असें बोलला शूर हा भीम मातें
विदारील दुःशासना कांत जेव्हां
मना माझिया हर्ष वाटेल तेव्हां.
१०९.
प्रतिज्ञा महा ऐक या द्रौपदीची
सभेंतील या गांजिल्या भामिनीची
रिपू-शोणित-स्नेह लागेल जेव्हां
हरे मुक्त हे केंस बांधीन तेव्हां.
११०.
विदारीन मी मांड दुर्योधनाची
दुजी होड या शूर धर्मानुजाची
वधा सांग देणार केव्हां अनुज्ञा ?
कधीं सार्थ होणार याची प्रतिज्ञा ?