एवं व्रतः स्वप्रियनामकीर्त्या जातानुरागो द्रुतचित्त उच्चैः ।
हसत्यथो रोदिति रौति गायत्युन्मादवन्नृत्यति लोकबाह्यः ॥४०॥
हरिनामगुणकीर्तनकीर्ती । अखंड आवडे जागृतीं ।
स्वप्नींही तेचि स्थिती । दृढ हरिभक्ती ठसावे ॥५७॥
ऐशियापरी भक्तियुक्त । दृढतर जाहलें ज्याचें व्रत ।
तंव तंव होय आर्द्रचित्त । प्रेमा अद्भुत हरिनामकीर्ती ॥५८॥
आत्मा परमप्रिय हरी । त्याचे नामकीर्तीचा हर्ष भारी ।
नित्य नवी आवड वरी । सबाह्याभ्यंतरीं हरि प्रगटे ॥५९॥
चुकल्या मायपूतां संकटीं । एकाकीं बहुकाळें जाहली भेटी ।
तेणें वोरडे घालोनि मिठी । चाले जेवीं पोटीं अनिवार रुदन ॥५६०॥
तेवीं जीवशिवां अवचटी । भक्तीचे पेठे जाहली भेटी ।
आत्मसाक्षात्कारें पडे मिठी । ते संधीमाजीं उठी अनिवार रुदन ॥६१॥
परमात्मयासी आलिंगन । तेणें अनिवार स्फुंदन ।
रोमांचित रुदन । सप्रेम पूर्ण उसासोनि करी ॥६२॥
सवेंचि गदगदोनि हांसे । मानी मजमाजींच मी असें ।
चुकलों भेटलों हें ऐसें । देखोनि आपुलें पिसें हांसोंचि लागे ॥६३॥
मी अखंडत्वें स्वयें संचलों । अभेदपूर्णत्वें अनादि रचलों ।
तो मी अव्ययो म्हणे जाहलों मेलों । येणें आठवें डोलडोलों हांसोंचि लागे ॥६४॥
पळतां दोराच्या सर्पाभेण । पडे अडखळे भयें पूर्ण ।
तोच दोरातें वोळखोन । आपणियां आपण स्वयें हांसे ॥६५॥
तेवीं संसाराचा अभावो । देहभाव समूळ वावो ।
तेथें नाथिली ममता अहंभावो । मज होता पहा वो म्हणूनि हांसे ॥६६॥
बाप गुरुवाक्य निजनिर्वाहो । देहीं असतां विदेहभावो ।
माझे चारी देह झाले वावो । येणे अनुभवें पहा वो गर्जों लागे ॥६७॥
म्हणे धन्य धन्य भगवद्भक्ती । जिणें मिथ्या केल्या चारी मुक्ती ।
मी परमात्मा निजनिश्चितीं । येणें उल्हासें त्रिजगती गर्जवी गजरें ॥६८॥
धन्य भगवंताचें नाम । नामें केलों नित्य निष्काम ।
समूळ मिथ्या भवभ्रम । गर्जोनि निःसीम हाक फोडी ॥६९॥
आतां दुजें नाहींच त्रिलोकीं । दिसे तें तें मीच मी कीं ।
मीच मी तो एकाकी । येणें वाक्यें अलोलिकी हाक फोडी ॥५७०॥
दुर्धर भवबंध ज्याचेनी । निःशेष गेला हारपोनी ।
त्या सद्गुरुच्या निजस्तवनीं । गर्जवी वाणी अलोकिक ॥७१॥
म्हणे संसार झाला वावो । जन्ममरणांचा अभावो ।
कळिकाळासी नाहीं ठावो । म्हणोनियां पहा वो हाक फोडी ॥७२॥
ऐशा हाकांवरी हाका । फोडूं लागे अलोलिका ।
सवेंचि गाये निजात्मसुखा । स्वानंदें देखा डुल्लतु ॥७३॥
परम सख्याची गोड कथा । तृप्ती न बाणे स्वयें सांगतां ।
तेवीं निजानुभवें हरि गातां । धणी सर्वथा पुरेना ॥७४॥
त्याचें गाणें ऐकतां । सुखरुप होय सज्ञान श्रोता ।
मुमुक्षां होय परमावस्था । जरी तो अवचिता गावों लागे ॥७५॥
गातां पदोपदीं निजसुख । कोंदाटे अधिकाधिक ।
वोसंडतां परम हरिख । स्वानंदें अलोलिक नाचों लागे ॥७६॥
सारुनि दुजेपणाचें काज । निरसोनि लौकिकाची लाज ।
अहंभावेंविण सहज । आनंदाचे भोजें अलोलिक नाचे ॥७७॥
जो मोलें मदिरा खाये । तो मदिरानंदें नाचे गाये ।
जेणें ब्रह्मानंदु सेविला आहे । तो केवीं राहे आवरला ॥७८॥
यालागीं तो लोकबाह्यता । स्वये नाचे ब्रह्मउन्मादता ।
लोक मानिती तया पिशाचता । हा बोधु पंडितां सहजा न कळे ॥७९॥
त्याचिया निजबोधाचि कथा । ऐक सांगेन नृपनाथा ।
एक भगवंतावांचून सर्वथा । त्यासी लौकिकता दिसेना ॥५८०॥;