देहेन्द्रियप्राणमनोधियां यो जन्माप्ययक्षुद्भयतर्षकृच्छ्रैः ।
संसारधर्मैरविमुह्यमानः स्मृत्या हरेर्भागवतप्रधानः ॥४९॥
देह-इंद्रिय-मन-बुद्धि-प्राण । हेंचि बंधाचें पंचायतन ।
क्षुधा तृषा भय क्लेश पूर्ण । जन्ममरण इत्यादि ॥६४॥
या पांचां स्थानीं अपार श्रम । या नांव म्हणिजे ’संसारधर्म’ ।
निजभक्तां प्रसन्न आत्माराम । त्यांसी भवभ्रम स्वप्नींही नाहीं ॥६५॥
क्षुधा लागलिया दारुण । अन्नआकांक्षें पीडे प्राण ।
भक्तां क्षुधेची नव्हे आठवण । ऐसें अगाध स्मरण हरीचें ॥६६॥
भावें करितां भगवद्भक्ती । क्षुधेतृषेची नव्हे स्फूर्ती ।
एवढी पावले अगाध प्राप्ती । ते भवभयें निश्चितीं डंडळतीना ॥६७॥
मनामाजीं भवभयभरणी । तें मन रातलें हरिचरणीं ।
आतां भयातें तेथ कोण मानी । मन मनपणीं असेना ॥६८॥
मनीं स्फुरे द्वैताची स्फूर्ती । तेथ भवभयाची दृढस्थिती ।
ते मनीं जाहली हरीची वस्ती । यालागीं भवभयनिवृत्ती द्वैतेंसीं ॥६९॥
देहबुद्धीमाजीं जाणा । नानापरी उठती तृष्णा ।
ते बुद्धि निश्चयें हरीच्या स्मरणा । करितां परिपूर्णा विनटली स्वयें ॥६७०॥
जेथें जें जें स्फुरे तृष्णास्फुरण । तेथें स्वयें प्रगटे नारायण ।
तेव्हां तृष्णा होय वितृष्ण । विरे संपूर्ण पूर्णामाजीं ॥७१॥
यापरी गा तृष्णारहित । हरिस्मरणें भगवद्भक्त ।
इंद्रियक्लेशां भक्त अलिप्त । तोही वृत्तांत ऐक राया ॥७२॥
मुख्य कष्टाचें अधिष्ठान । इंद्रियकर्मीं राया जाण ।
ते इंद्रियकर्मीं ब्रह्मस्फुरण । हरिभक्ताम पूर्ण हरिभजनें ॥७३॥
दृष्टीनें घेऊं जातां ’दर्शन’ । दृश्यमात्रीं प्रगटे नारायण ।
श्रवणीं ’शब्द’ घेतां जाण । शब्दार्थी पूर्ण विराजे वस्तु ॥७४॥
घ्राणीं घेतां नाना ’वासु’ । वासावबोधें प्रगटे परेशु ।
रसना सेवी जो जो ’रसु’ । रसीं ब्रह्मरसु निजस्वादें प्रगटे ॥७५॥
देहीं लागतां शीत-उष्ण । अथवा कां मृदु-कठिण ।
तेथें ’स्पर्श’ ज्ञानें जाण । चिन्मात्र पूर्ण प्रगटे स्वयें ॥७६॥
आतां कर्मेंद्रियप्रवृत्ती । तेथही स्फुरे ब्रह्मस्फूर्ती ।
घेणें देणें गमनस्थिती । इंद्रियां गती आत्मारामें ॥७७॥
ऐसे करितां इंद्रियें कष्ट । ते कष्टीं होय निजसुख प्रगट ।
तेणें इंद्रियां विश्रांति चोखट । पिकली स्वानंदपेठ हरिभक्तां ॥७८॥
जेणें इंद्रियां कष्ट होती । तेणेंचि इंद्रियां सुखप्राप्ती ।
हे भगवद्भजनीं निजयुक्ती । भोगिजे हरिभक्ती हरीचेनि स्मरणें ॥७९॥
जन्म आणि मरण । हें देहाचे माथां जाण ।
भक्त देहीं विदेही पूर्ण । ध्यातां हरिचरण हरिरुप जाहले ॥६८०॥
यालागीं देहाची अहंता । कदा नुपजे भगवद्भक्तां ।
ते भक्तपूर्णतेची कथा । ऐक नृपनाथा सांगेन ॥८१॥
देह धरिल्या पंचाननें । भक्त न डंडळी जीवें प्राणें ।
वंध्यापुत्र सुळीं देणें । देहाचें मरणें तेवीं देखे ॥८२॥
छाया पालखीं बैसावी । ऐसें कोणी चिंतीना जीवीं ।
तैशी देहासी पदवी यावी । हा नुठी सद्भावीं लोभ भक्तां ॥८३॥
देहासी आलिया नाना विपत्ती । भक्तां खेदु नुमटे चित्तीं ।
जेवीं आकाश शस्त्रघातीं । न ये काकुळती तैसे ते ॥८४॥
जननीजठरीं देहो जन्मला । भक्तु न म्हणे मी जन्मा आला ।
रवि थिल्लरीं प्रतिबिंबला । थिल्लर मी जाहला कदा न म्हणे ॥८५॥
सायंप्रातः सूर्य प्रकाशे । अभ्रीं गंधर्वनगर आभासे ।
देह प्रतिपाळी अदृष्ट तैसें । म्यां केलें ऐसें स्फुरेना ॥८६॥
भक्तदेहासी येतां मरण । हेतुरहित हरीचें स्मरण ।
यालागीं देह निमाल्या आपण । न मरतां पूर्ण पुर्णत्वें उरे ॥८७॥
थिल्लरा समूळ नाशु झाला । तरी रवि न म्हणे मी निमाला ।
तेवीं देहो गेलिया भक्त उरला । सद्रूपें संचला हरिस्मरणें ॥८८॥
आधीं काय सर्पु मारावा । मग दोरातें दोरु करावा ।
तो न पालटतां निजगौरवा । दोरुचि अघवा दोररुपें ॥८९॥
तेवीं हरिभक्तां देहाचा अभावो । मा काळ कवणा घालील घावो ।
आतां आम्ही ते आम्हीच आहों । तें आम्हीपणही वावो आमुचेनि आम्हां ॥६९०॥
इत्यादि संसारदेहधर्म । ज्यासी स्पर्शों न शके कर्माकर्म ।
मोहें नव्हेचि भवभ्रम । तो भक्तोत्तम प्रधानत्वें ॥९१॥;
राया आणिकही एक खूण । तुज मी सांगेन संपूर्ण ।