हरिरुवाच-सर्वभूतेषु यः पश्येद्भगवद्भावमात्मनः ।
भूतानि भागवत्यात्मन्येष भाववतोत्तमः ॥४५॥
हरि म्हणे रायाप्रती । अमित भक्तलक्षणस्थिती ।
एक दिगंबरत्वें वर्तती । एक स्वाश्रमस्थिती निजचारें ॥३६॥
एक सदा पडले असती । एकांची ते उन्मादस्थिती ।
एक सदा गाती नाचती । एक ते होती अबोलणे ॥३७॥
एक गर्जती हरिनामें । एक निर्दाळिती निजकर्में ।
एक भूतदयाळू दानधर्में । एक भजननेमें राहती ॥३८॥
ऐशा अनंत भक्तस्थिती । सांगतां सांगावया नाकळे वृत्ती ।
त्यांमाजीं मुख्य संकलि । तीं राया तुजप्रती सांगेन ॥३९॥
पूर्णप्राप्तीचा मुख्य ठावो । सर्वां भूतीं भगवद्भावो ।
हाचि पूर्णभक्तीचा निजगौरवो । तोचि अभिप्रावो हरि सांगे ॥६४०॥
सर्व भूतीं मी भगवंत । सर्व भूतें मजआंत ।
भूतीं भूतात्मा मीचि समस्त । मीचि मी येथ परमात्मा ॥४१॥
ऐसें जें पूर्णत्वाचें मीपण । तेणें वाढे आत्मभिमान ।
सहजें निजनिरभिमान । तें शुद्ध लक्षण ऐक राया ॥४२॥
शुद्ध भक्तांचें निजलक्षण । प्रत्यगात्मयाचें जें मीपण ।
तेंही मानूनियां गौण । भावना पूर्ण त्यांची ऐसी ॥४३॥
सर्वां भूतीं भगवंत । भूतें भगवंतीं वर्तत ।
भूतीं भूतात्मा तोचि समस्त । मी म्हणणें तेथ मीपणा न ये ॥४४॥
सर्व भूतीं भगवंत पाहीं । भूतें भगवंताचे ठायीं ।
हें अवघें देखे जो स्वदेहीं । स्वस्वरुप पाहीं स्वयें होय ॥४५॥
तो भक्तांमाजीं अतिश्रेष्ठ । तो भागवतांमाजीं वरिष्ठ ।
त्यासी उत्तमत्वाचा पट । अवतार श्रेष्ठ मानिती ॥४६॥
तो योगियांमाजीं अग्रगणी । तो ज्ञानियांचा शिरोमणी ।
तो सिद्धांमाजीं मुगुटमणी । हें चक्रपाणी बोलिला ॥४७॥
जैशा घृताचिया कणिका । घृतेंसीं नव्हती आणिका ।
तेवीं भूतें भौतिकें व्यापका । भिन्न देखा कदा नव्हती ॥४८॥
हे ’उत्तम’ भक्तांची निजस्थिती । राया जाणावी सुनिश्चितीं ।
आतां ’मध्यम’ भक्त कैसे भजती । त्यांची भजनगती ऐक राया ॥४९॥;