एकनाथी भागवत - श्लोक २ रा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


द्रुमिल उवाच -यो वा अनन्तस्य गुणाननन्ताननुक्रमिष्यन् स तु बालबुद्धिः ।

रजांसि भूमेर्गणयेत्कथंचित्‍ कालेन नैवाखिलशक्तिधाम्नः ॥२॥

ज्याची लीलाशक्ति अपरिमित । ऐशा अनंत शक्ति ज्याच्या नखांत ।

यालागीं तो 'अनंत' म्हणत । त्याचे गुण समस्त गणवती कोणा ॥३६॥

त्या अनंताची गुणसमृद्धी । गणूं म्हणे तो बालबुद्धि ।

जेवीं कां आकाशाची वृद्धी । मुंगिये त्रिशुद्धी न करवी माप ॥३७॥

सागरींचें जळ संपूर्ण । केवीं गणूं शके लवण ।

तेवीं अनंताचे अनंत गुण । आकळी कवण निजसत्ता ॥३८॥

पर्जन्याचिया धारा । गणितां येतील नृपवरा ।

पृथ्वीचिया दूर्वांकुरां । सुखें महावीरा गणितां येती ॥३९॥

वारा अफाट धांवे । तोही गणितातें पावे ।

निमेषोन्मेषांचे यावे । त्यांसीही संभवे गणित राया ॥४०॥

पृथ्वीचिया परिमाणा । काळें काळें होय गणना ।

परी भगवंताचिया गुणां । वेदांसहि जाणा गणित नव्हे ॥४१॥

भगवंताचें नाम एक । घेतां वेद झाले मूक ।

त्याचे गुण गणितां सकळिक । शेषाचें मुख दुखंड झालें ॥४२॥

त्या अनंताचे अनंत गुण । येथ गणूं शके कवण ।

कांहीं एक संक्षेपें जाण । सांगेन लक्षण अवतारांचें ॥४३॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP