एकनाथी भागवत - श्लोक २१ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


निःक्षत्रियामकृत गां च त्रिःसप्तकृत्वो रामस्तु हैहयकुलाप्ययभार्गवाग्निः ।

सोऽब्धिं बबन्ध दशवक्त्रमहन्सलङकं सीतापतिर्जयति लोकमलघ्नकीर्तिः ॥२१॥

तो देवाधिदेवोत्तमु । स्वयें झाला 'परशुरामु' ।

तेणें क्षत्रियांचा पराक्रमु । केला निर्धर्मु निजप्रतापें ॥४१॥

तो गोब्राम्हणकैवारी । सहस्त्रार्जुनातें संहारी ।

सहस्त्र भुजांची कांडोरीं करी । केली बोहरी दानवकुळा ॥४२॥

जमदग्नीचा कोपाग्नि । परशुरामतेजें प्रज्वळूनि ।

हैहयकुळ जाळूनि । आहाळिली अवनी क्षत्रियांची ॥४३॥

तेणें तीन सप्तकें वीररसु । देऊनि क्षत्रियमद बहुवसु ।

त्या रोगाचा केला नाशु । धरेचे ईशु धरामर केले ॥४४॥

जो अवतारांचें मूळ पीठ । जो वीरवृत्ति अतिउद्भट ।

तो अवतारांमाजीं श्रेष्ठ । अतिवरिष्ठ 'श्रीराम' ॥४५॥

पापें पळती रामनामें । नामांकित वंदिजे यमें ।

गणिकेचीं कर्माकर्में । श्रीरामनामें निर्दळिलीं ॥४६॥

नामें कळिकाळासी धाक । यमदूतां न मिळे भीक ।

रामनामगजरें देख । पळे निःशेख जन्ममरण ॥४७॥

जो देवांचे बंद सोडी । नवग्रहांची बेडी तोडी ।

जेणें रामराज्याची रोकडी । उभविली गुढी तिन्ही लोकीं ॥४८॥

ज्याचेनि शिळा तरती सागरीं । असुर मारिले वानरीं ।

जेणें सुवर्णाची नगरी । वोपिली पुरी शरणागतासी ॥४९॥

जो प्रतापाचा मरिगळा । जेणें सेतु बांधिला अवलीळा ।

चरणीं उध्दरिली शिळा । जो निजजिव्हाळा निजभक्तां ॥२५०॥

तो अवतार मूर्तिमंत । राया अद्यापि असे वर्तत ।

हा संवाद त्रेतायुगांत । द्रुमिल सांगत विदेहासी ॥५१॥

यालागीं श्रीराम राम । नित्य जपे जो हें नाम ।

तो पुरुषांमाजीं पुरुषोत्तम । कर्माकर्म-अतीत तो ॥५२॥

तें रामनाम अवचटें । भीतरीं रिघे कर्णपुटें ।

तैं कळिमळांचीं मळकटें । नामोद्धाटें नासती ॥५३॥

ऐशी रामनामाची ख्याती । जगदुद्धारें केली कीर्ती ।

धन्य धन्य जे परिसती । धन्य जे गाती रामचरित ॥५४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP