इन्द्रो विशङकय मम धाम जिघृक्षतीति कामं न्ययुंक्त सगणं स बदर्युपाख्यम् ।
गत्वाऽप्सरोगणवसन्तसुमन्दवातैः स्त्रीप्रेक्षणेषुभिरविध्यदतन्महिज्ञः ॥७॥
ऐसा नारायणाचा प्रताप । देखोनि निष्ठा दृढ तप ।
तेणें इंद्रासी आला कंप । म्हणे स्वर्ग निष्पाप घेईल माझा ॥७५॥
त्याचें तप देखोनि परम । म्हणे गेलें गेलें स्वर्गधाम ।
इंद्रें कोपें प्रेरिला काम । अप्सरासंभ्रमसवेत ॥७६॥
कामसमवेत अप्सरा । सवें वसंतही दुसरा ।
क्रोधु अवघियां पुढारा । जो तापसांतें पुरा नागवी सदा ॥७७॥
तीर्थोतीर्थींच्या अनुष्ठाना । क्षमा नुपजे अंतःकरणा ।
कोपु येतांच जाणा । करी उगाणा तपाचा ॥७८॥
क्रोधु तापसांचा उघड वैरी । तापसां नागवी नानापरी ।
तोही नारायणावरी । अवघ्यां अग्रीं चालिला ॥७९॥
ऐशीं मिळोनि बिरुदायितें । आलीं बदरिकाश्रमा समस्तें ।
नारायणु तप करी जेथें । उठावलीं तेथें अतिआक्रमेंसीं ॥८०॥
वसंतें शृंगारिलें वन । कोकिळा कलरवें गायन ।
सुगंध शीतळ झुळके पवन । पराग संपूर्ण वरुषती सुमनें ॥८१॥
तेथ भ्रमरांचे झणत्कार । कामिनीगायन कामाकार ।
हावभाव कटाक्षविकार । कामसंचार चेतविती ॥८२॥
नव्हेचि कामिनीकामबाधा । पराक्रमु न चलेचि क्रोधा ।
तोही सांडोनियां बिरुदा । परतला नुसधा म्लानवदनें ॥८३॥
मग मदनें मांडोनियां ठाण । विंधी कामिनीकटाक्षबाण ।
तेणें घायें नारायण । अणुप्रमाण न डंडळेचि ॥८४॥
शस्रें तोडितां आकाशासी । आकाश स्वयें सावकाशी ।
तेवीं कामें छळितां नारायणासी । तो निजसंतोषीं निर्द्वंद्व ॥८५॥
आग्या निजतेजसत्ता । अग्नीतेज प्राशूं जातां ।
तोंड जळे चवी चाखितां । तेवीं कामिनीकामता नारायणदृष्टीं ॥८६॥
नेणतां नारायणमहिमे । धांवोनि घाला घातला कामें ।
तेव्हां अवघींच पराक्रमें । स्वनिंद्य धर्में लाजलीं ॥८७॥
तेथ अवघीं झालीं पराङ्मुखें । पाठमोरीं निघालीं अधोमुखें ।
तेव्हां त्यांची गति निःशेखें । नारायण देखे खुंटिली ॥८८॥
इंद्रियनियंता नारायण । नेणोनि छळूं गेलीं आपण ।
त्यापुढोनि पुनरागमन । सर्वथा जाण करवेना ॥८९॥
मागें न निघवे निश्चितें । ऐसें जाणोनि समस्तें ।
थोर गजबजिलीं तेथें । भयचकितें व्याकुळें ॥९०॥
जाणोनि नारायणप्रताप । आतां कोपून देईल शाप ।
येणें धाकें म्लानरूप । अतिसकंप भयभीतें ॥९१॥
ऐशी देखोनि त्यांची स्थिति । कृपेनें तुष्टला कृपामूर्ति ।
अणुमात्र कोपु नये चित्तीं । अभिनव शांति नारायणाची ॥९२॥