भूमेर्भरावतरणाय यदुष्वजन्मा जातः करिष्यति सुरैरपि दुष्कराणि ।
वादैर्विमोहयति यज्ञकृतोऽतदर्हान् । शूद्रान् कलौ क्षितिभुजो न्यहनिष्यदन्ते ॥२२॥
आतां भावी अवतारवार्ता । तुज मी सांगेन नृपनाथा ।
श्रीकृष्णावतारकथा । परमाद्भुता विचित्र ॥५५॥
जो परेहून परात्परु । जो कां अजन्मा अक्षरु ।
जो श्रुतिशास्त्रां अगोचरु । तो पूर्णावतारु 'श्रीकृष्ण' ॥५६॥
जेथें नाममात्र रिघों न लाहे । जेथें रूपाची न लभे सोये ।
ज्या ब्रह्मत्व अंगीं न साहे । तो अवतार पाहें श्रीकृष्ण ॥५७॥
जो वर्णाश्रमांसी नातळे । ज्यासी ईश्वरत्वही वोंविळें ।
जो अज अव्यय स्वानंदमेळें । तो अवतारु स्वलीलें श्रीकृष्णनाथु ॥५८॥
ऐसा गुणधर्मकर्मातीतु । तो अवतारु श्रीकृष्णनाथु ।
प्रगटला यदुवंशाआंतु । स्वयें जगन्नाथु स्वइच्छें ॥५९॥
जैसें खळाळ कल्लोळ चंचळ । भासे परी तें केवळ जळ ।
काळी भरडी पांढरी चोळ । परी ते केवळ वसुधाचि ॥२६०॥
जे गोडी नाबदरासीं । तेचि वेगळी रवेयासी ।
तैसा अवतार यदुवंशीं । पूर्णांशेंसीं श्रीकृष्ण ॥६१॥
जैसा दीपु लावितां तत्क्षणीं । सवेंचि प्रगटे तेजाची खाणी ।
तैसा उपजतांचि बाळपणीं । अभिनव करणी स्वयें केली ॥६२॥
जें ब्रह्मादिक देवां नव्हे । तें बाळलीलास्वभावें ।
करूनि दाविलें आघवें । देवाधिदेवें श्रीकृष्णें ॥६३॥
वणवा गिळिला मुखें । पर्वत उचलिला नखें ।
पूतनेचें स्तन विखें । प्याला निजमुखें जीवासगट ॥६४॥
जेणें वत्सहरणमिसें । स्त्रष्टयासही लाविलें पिसें ।
जो वत्सवत्सपवेशें । झाला सावकाशें एकाकी एक ॥६५॥
अघ चिरिला जाभाडा । काळियाच्या कुटिल्या फडा ।
यमलोकीं घेऊनि झाडा । आणिला रोकडा गुरुपुत्र जेणें ॥६६॥
जे प्रजा पीडूनि कर घेती । जयां नावडे धर्मनीती ।
ऐसे राजे भारभूत क्षितीं । नेणों किती निर्दाळिले ॥६७॥
एकां सैन्यें एकां स्वांगें । एकां वधवी आन प्रयोगें ।
एकां गोत्रकलहप्रसंगें । अग्रपूजायोगें एकांसी ॥६८॥
अधर्मा लावील सीक । धर्माचें वाढवील बिक ।
हें अवतारकौतुक । राया तूं आवश्यक देखशील पुढां ॥६९॥
जैं जैं लोटेल अहोरात्र । तैं तैं करील नवें चरित्र ।
तया कृष्णसुखासी पात्र । भक्त पवित्र होतील ॥२७०॥
साधूंसी स्वानंदसोहळा । नित्य नवा होईल आगळा ।
ते श्रीकृष्णाची लीला । देखसी डोळां नृपनाथा ॥७१॥;
तोचि बौद्धरूपें जाण । पुढां धरील दृढ मौन ।
तेव्हां कर्माकर्मविवंचन । सर्वथा जाण कळेना ॥७२॥
तो तटस्थपणें सदा । प्रवर्तवील महावादा ।
तेणें वादमिसें सदा । वाढवील मदा महामोहातें ॥७३॥
मोह उपजवील दुर्घट । एक कर्मीं करील कर्मठ ।
एक होतील कर्मभ्रष्ट । न कळे चोखट निजात्महित ॥७४॥
कैसें माजवील मत । वेद मिथ्या मानित ।
वेदविहिता नातळत । तो जाण निश्चित महामोहो ॥७५॥
मोहें केला सर्वांसी छळ । एकां ज्ञानाभिमान प्रबळ ।
ते कर्म निंदिती सकळ । त्यागिती केवळ जाड्य म्हणौनी ॥७६॥;
ऐशिये वर्ततां मोहस्थिती । पूर्ण कळीची होय प्रवृत्ती ।
तेव्हां नीच ते राजे होती । प्रजा नागविती चोरप्राय ॥७७॥
शूद्राहूनि अतिकनिष्ठ । राजे होती परम श्रेष्ठ ।
वर्णावर्ण करिती भ्रष्ट । अतिपापिष्ठ अधर्मी ॥७८॥
अपराधेंवीण वितंड । भलेत्यांसी करिती दंड ।
मार्गस्थांचा करिती कोंड । करिती उदंड सर्वापहरण ॥७९॥
अबळांचें निजबळ राजा । तो राजाचि स्वयें नागवी प्रजा ।
ऐसा अधर्म उपजे क्षितिभुजां । तें गरुडध्वजा न साहवे ॥२८०॥
जेव्हां स्वधर्माचें जिणें । अधर्में निलाग गांजणें ।
यालागीं श्रीनारायणें । अवतार धरणें 'कल्की' नामा ॥८१॥
तो शस्त्रधारा प्रबळ । नष्ट राजे निर्दाळील सकळ ।
महामोहाचें मूळ । स्वयें समूळ उच्छेदील ॥८२॥;
तेव्हां धर्माची पाहांट फुटे । सत्यासी सत्त्व चौपटे ।
तेव्हां वेदोक्त विधान प्रगटे । स्वधर्मराहाटें राहटती सर्व ॥८३॥