योगस्य तपसश्चैव न्यासस्य गतयोऽमलाः ।
महर्जनस्तपः सत्यं भक्तियोगस्य मद्गतिः ॥१४॥
निश्चळ करावया निजचित्ता । साधिली प्राणापानसमता ।
षट्चक्रें भेदूनि तत्त्वतां । पुढें निजात्मता पावावी ॥७३॥
तंव आयुष्या झालें अस्तमान । निजांगीं आदळे मरण ।
ऐसे निमाले जे योगीजन । त्यांसी ऊर्ध्व गमन महर्जनादि लोकीं ॥७४॥
जो गृहस्थाश्रमी ब्रह्मचारी । ब्रह्मचर्यनेमें व्रतधारी ।
जो स्वप्नींहीं नातळे नारी । जो भिक्षाहारी सर्वदा ॥७५॥
जो सदा धडधडीत विरक्ती । एक भिक्षा न धरी हातीं ।
सद्गुरुचिया सेवा करिती । आत्मज्ञानप्राप्ती पावावया ॥७६॥
जे संधीं व्हावें आत्मज्ञान । ते संधीसी आलें मरण ।
ऐशा ब्रह्मचारियासी जाण । ऊर्ध्व गमन महर्जनादि लोकीं ॥७७॥
जे गृहस्थाश्रमीं नेटक । जे अग्निसेवे साग्निक ।
जे स्वधर्में चित्तशोधक । जे सेवक द्विजदेवां ॥७८॥
जे भूतदयाळू भाविक । जे सत्यवादी सात्विक ।
जे निजात्मज्ञानसाधक । जे अवंचक गुरुभजनीं ॥७९॥
गुरुकृपा साधूनि ज्ञान । पावावें ब्रह्म सनातन ।
तंव वेंचलें आयुष्यधन । अंगीं निधन आदळलें ॥२८०॥
तेणें खोळंबली ब्रह्मप्राप्ती । परी ऊर्ध्वलोकीं होय गती ।
जैसी उपासना विरक्ती । तेणें तारतम्यें जाती महर्जनादि लोकीं ॥८१॥
जे वनवासी वानप्रस्थ । जे वैराग्यें अतिविरक्त ।
जे कंदमूळफळीं तृप्त । जे सदा नेमस्त आश्रमधर्मी ॥८२॥
वर्षाकाळीं आसारीं राहे । हेमंतीं जळाशयें ।
उष्णकाळीं पंचाग्नि साहे । तपश्चर्या वाहे अतिनिष्ठा ॥८३॥
शरीरशोषणाचें पाहें । सर्वथा न धरी भये ।
स्वार्थाचेनि लवलाहें । तपोनिष्ठा साहे दारुण ॥८४॥
वैराग्य साधूनि पूर्ण । करावें संन्यासग्रहण ।
साधावया ब्रह्मज्ञान । तेचि काळीं मरण वोढवलें ॥८५॥
ऐसेनि देहान्तस्थिती । त्यासी ऊर्ध्वलोकीं होय गती ।
महर्जनतपोलोकप्राप्ती । तारतम्यस्थिती उपासना ॥८६॥
जो समूळसंकल्पसंन्यासी । लोकलोकांतर न घडे त्यासी ।
हें न टकेचि गा जयासी । आणि झाले संन्यासी विधियुक्त ॥८७॥
जे कां पोटींहून अतिविरक्त । स्वप्नीं धातूंसी न लाविती हात ।
जे यतिधर्मी सदा निरत । जे सदा जपत प्रणवातें ॥८८॥
अंगीकारिले आश्रमविधी । उबगू न मानी जो त्रिशुद्धी ।
मरणीं डंडळीना बुद्धी । त्या गमनसिद्धी सत्यलोकीं ॥८९॥
ऐसे सत्यलोकातें पावती । तेथिल्या भोगांची ज्यां विरक्ती ।
ते ब्रह्मयासवें मुक्त होती । येर ते येती माघारे ॥२९०॥
ज्यांसी सत्यलोकीं भोगासक्ती । तेही खचोनि माघारे येती ।
इतर लोकांची कोण गती । पुनरावृत्ती सोडीना ॥९१॥
जेथवरी भोगासक्ती । तेथवरी पुनरावृत्ती ।
जेथ भोगाची निवृत्ती । तेथ चारी मुक्ती आंदण्या ॥९२॥
ज्या लोकीं ज्या भोगविरक्ती । तेथून ते पुढारे जाती ।
जे लोकीं ज्या भोगासक्ती । ते खचोनि पडती भूलोकीं ॥९३॥;
तैसी नव्हे माझी भक्ती । भक्तां नाहीं इतर प्राप्ती ।
मद्भक्तां माझी गती । जाण निश्चितीं उद्धवा ॥९४॥
जे सकाम माझी सेवा करिती । त्यांसी कामनाफळीं पडे वस्ती ।
ज्यांसी निष्काम माझी भक्ती । त्यांसी माझी प्राप्ती अनन्य ॥९५॥
सकाम भक्तांचे पुरवूनि काम । त्यांसी मी करीं नित्य निष्काम ।
निजभक्तांसी निजधाम । मी पुरुषोत्तम पाववीं ॥९६॥
यालागीं गोपींची कामासक्ती । म्यांचि आणूनि निष्कामस्थिती ।
त्यांसी दिधली सायुज्यमुक्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥९७॥
म्यां गोपिकांसि कामू केला । कीं निःशेष कामू त्यांचा हरिला ।
न विचारितां या बोला । कृष्ण व्यभिचारला मूर्ख म्हणती ॥९८॥
सलोकता आवडे भक्तांसी । तैं मी करीं वैकुंठवासी ।
भक्त मागे समीपतेसी । करीं मी तयासी जिवलग ॥९९॥
हितगुज अळोंच्यासी । हृदयींचें गोड सांगावयासी ।
उद्धवा तूं जैसा आवडसी । ऐशीच त्यांसीं करीं प्रीति ॥३००॥;
भक्त मागे सरुपता । त्यासी मी दें चतुर्भुजता ।
शंखचक्रादि सायुधता । घनश्यामता सुरेख ॥१॥
मुकुट कुंडलें मेखळा । कांसे मिरवे सोनसळा ।
वांकी तोडरु चरणकमळा । कौस्तुभ गळां मत्सम ॥२॥
ठाणमाण गुणलक्षण । वीर्य शौर्य गांभीर्य पूर्ण ।
रुप रेखा समसमान । दोघेही अनन्य सरुपता ॥३॥
रमा दोघांसी एकत्र देखे । देवो कोण हें ते नोळखे ।
पार्षदक्रिया ठकली ठाके । कोणासी सेवकें सेवावें ॥४॥
छत्रधरु चवके चित्तीं । कोणावरी धरुं छत्री ।
चवरधरें चवरें हातीं । कोणाप्रती विंजावें ॥५॥
नमना येती ब्रह्मादि देव । तेही मानिती अतिअपूर्व ।
दोंमाजीं कोण आदिदेव । त्यांसीही स्वयमेव कळेना ॥६॥
जेवीं दीपें दीपू लाविला । न कळे वडील कोण धाकुला ।
तेवीं माझी सरुपता पावला । न वचे ओळखिला आनासी ॥७॥
जेवीं आरिशाचें प्रतिबिंब । दिसे समरुपें स्वयंभ ।
तैशी सरुपतेची शोभ । सम विडंब दोहींचा ॥८॥
देवो होऊनियां प्रसन्न । आपली सरुपता दे संपूर्ण ।
नेदी हृदयींचा द्विजचरण । श्रीवत्सलांछन अविनाशी ॥९॥
श्रीवत्स चिन्ह द्यावयासी पाहीं । विष्णु म्हणे मज सामर्थ्य नाहीं ।
तें असे ब्राह्मणाच्या पायीं । त्याचा चरण हृदयीं धरिल्या लाभे ॥३१०॥
सरुपतेमाजीं जाण । देवा-भक्तांची हे खूण ।
ज्याचे हृदयीं श्रीवत्सलांछन । तो स्वामी श्रीविष्णु जाण सर्वांचा ॥११॥
ऐशी सरुपता जरी झाली प्राप्त । तरी हा देवो मी एक भक्त ।
हा भिन्नत्वाचा भेद किंत । त्याआंत उरला असे ॥१२॥
देवभक्तांमाजीं भेदू । भिन्न सरुपतासंवादू ।
जव नाहीं अद्वयबोधू । तंव परमानंदू प्रकटेना ॥१३॥;
सांडूनि भिन्न भेदवार्ता । भक्त मागे सायुज्यता ।
ते गोड निरुपणकथा । तेथील स्वादता मी जाणें ॥१४॥
सायुज्याचें गोडपण । माझें मी जाणें आपण ।
उद्धवा तुज तेंही जाण । साङग संपूर्ण सांगेन ॥१५॥
देह सरुपता सारिखेपण । हृदयीं भिन्न मीतूंपण ।
ऐशियेही मुक्तीसी जाण । भक्त सज्ञान नातळती ॥१६॥
मी होऊनियां मातें । भजन स्वतःसिद्ध आइतें ।
तें सांडूनियां भेदातें । निजभक्त चित्तें नातळती ॥१७॥
देवेंसीं भक्त अनादिसिद्ध । ठायीं मूळींहून अभेद ।
तेथ दाटूनि जो धरी भेद । तो भक्तिमंद मायिक ॥१८॥
आर्त जिज्ञासु आणि अर्थार्थी । हे भेद केले मायिका भक्ती ।
जे अभेदभावें मज भजती । सायुज्यमुक्ती तयांसी ॥१९॥
ज्यांसी रावो रंक समान । वंद्य निंद्य न मनी मन ।
जे न धरिती देहाभिमान । सायुज्य जाण तयांसी ॥३२०॥
जैशी आपुली साउली । मिथ्या आपणासवें लागली ।
तैशी देहबुद्धि ज्यांसी झाली । त्यांसी फावली सायुज्यता ॥२१॥
जन्मूनि छाया सरिसी वाढे । माझी हे ममता नुठी पुढें ।
ऐसें देहाचें न बाधी सांकडें । सायुज्य रोकडें तयासी ॥२२॥
सांडूनि देहाची विषयासक्ती । जो करी भावें अभेदभक्ती ।
त्यासीचि सायुज्यमुक्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥२३॥
ज्यासी देहीं नुठी मीपण । भूतमात्रीं न देखे तूंपण ।
त्यासी सायुज्यमुक्ति जाण । साङग संपूर्ण सांपडे ॥२४॥
जेवढी मज आत्म्याची व्यक्ती । तेवढीच त्याची प्रतीती ।
त्यासीच सायुज्यता मुक्ती । सहज आपैती उद्धवा ॥२५॥
त्यासी विष्णुस्वरुप व्हावा देहो । हा सर्वथा नुपजे अहंभावो ।
त्यासी विष्णुसगट स्वदेह वावो । यालागीं सारुप्य पहा हो वांछीना ॥२६॥
निजविवेकें पाहतां ठायीं । देहो तितुका मिथ्या पाहीं ।
तेथ सारुप्यता कोणें ठायीं । सज्ञानीं कायी मागावी ॥२७॥
सायुज्यता आलिया हाता । वस्तूवीण ठावो नाहीं रिता ।
सकळ भूतीं एकात्मता । सायुज्य तत्त्वतां या नांव ॥२८॥
सकळ रुपें नांदतें जग । तें जो जाणे आपुलें अंग ।
आपण सर्वात्मा अभंग । त्यासीच साङग सायुज्य ॥२९॥
मी एक सबाह्याभ्यंतरीं । मी एक जंगमीं स्थावरीं ।
मीचि आत्मा चराचरीं । जाण त्याचे घरीं सायुज्य नांदे ॥३३०॥
मीचि एक एकला । एकपणेंचि संचला ।
ज्यासी द्वैताचा दुष्काळ पडिला । सत्य पावला सायुज्य ॥३१॥
एवं भावार्थाच्या अतिप्रीतीं । जें जें निजभक्त वांछिती ।
तें तें मी पुरवीं श्रीपती । चारी मुक्ती भक्तांसी ॥३२॥;
यावेगळे माझे प्रिय भक्त । भक्तिप्रतापें प्रतापवंत ।
भजनशौर्य अतिअद्भुत । निष्काम निरत मद्भजनीं ॥३३॥
आर्त जिज्ञासु अर्थार्थी । या कल्पना न धरोनि हातीं ।
नित्य निष्काम अतिप्रीतीं । मज भजती महाभाग ॥३४॥
नेघती सालोक्य सामीप्य सरुपता । शेखीं न मागती सायुज्यता ।
निष्काम भजती भगवंता । भक्ति तत्त्वतां या नांव ॥३५॥
नवल भजनाची परवडी । आवडीतें प्रसवे आवडी ।
क्षणोक्षण चढोवढी । नित्य नूतन गोडी प्रेमाची ॥३६॥
माझिया आवडीं तत्त्वतां । सर्वस्वें वेंचित जीविता ।
कदा पालट नव्हे चित्ता । भावर्थतां विश्वासी ॥३७॥
मीच एक देवाधिदेवो । सर्वभूतीं माझाचि भावो ।
विकल्प विकृति संदेहो । घालितां पहा हो उपजेना ॥३८॥
नवल भावार्थाची थोरी । मद्भावें देखे नरनारी ।
श्वानसूकरादि आकारीं । नमस्कारी मद्भावें ॥३९॥
नवल त्याची भजनख्याती । सायुज्यादि चारी मुक्ती ।
माझ्या नांवावरुनि ओंवाळिती । भक्ति पढियंती येणें पाडें ॥३४०॥
मांडल्या अतिविघ्न सांकडें । ग्लानी न करिती आणिकांकडे ।
जाणती रामनामापुढें । विघ्न बापुडें ते कायी ॥४१॥
गगन पडों पाहे कडाडें । पृथ्वी उलथावया गडबडे ।
ऐसें मांडलिया सांकडें । नाम पढे श्रीहरीचें ॥४२॥
ऐशी देखोनि अनन्य प्रीती । मी सर्वस्वें भुललों श्रीपती ।
मग न पाहतां कुळ जाती । त्याच्या घराप्रती मी धांवें ॥४३॥
ते न घेती वैकुंठींची वाट । त्यांचें घरचि मी करीं वैकुंठ ।
तेथें चिन्मात्रें फुटे पाहांट । पिके पेंठ संतांची ॥४४॥
उपनिपदें येती तयांपाशीं । स्वधर्म ये सुखवस्तीसी ।
नारदादि सनकादिकांसी । तया घरासी अतिप्रीती ॥४५॥
गर्जती नामाचे पवाडे । माझी कीर्ति गाती वाडेंकोडें ।
माझ्या रामनामापुढें । द्वंद्वाचें उडे बाधकत्व ॥४६॥
ऐशी देखोनि माझी भक्ती । वोरसोनियां निजशांती ।
धांवोनि ये तयांप्रती । वोळली मागुती जावों विसरे ॥४७॥
त्यांसी छळों ये जें जें दूषण । तें तें त्यांसी होय भूषण ।
माझे भक्तीचें प्रसन्नपण । जाण संपूर्ण या नांव ॥४८॥
तेथ सायुज्यादि चारी मुक्ती । त्यांचे सेवेसी स्वयें येती ।
ते जेथ विषय सेवूं जाती । तेथ सायुज्यमुक्ती सेवा करी ॥४९॥
ऋद्धिसिद्धि त्याच्या घरीं । होऊनि राहती कामारी ।
तरी तो सिद्धींची चाड न धरी । माझे भक्तीवरी निश्चयो ॥३५०॥
ऐशी देखोनि निश्चयें भक्ती । मीही करीं अनन्य प्रीती ।
भक्त जेउती वास पाहती । तेउता मी श्रीपती स्वयें प्रकटें ॥५१॥
भक्त स्वभावें बोलों जाये । त्याचें बोलणें मीचि होयें ।
त्याचे बोलण्या सबाह्यें । मीचि राहें शब्दार्थें ॥५२॥
तो कौतुकें खेळे खडे । ते खडेचि मज होणें घडे ।
तो कृपाळु पाहे जयाकडे । त्याचे छेदीं मी गाढे भवबंध ॥५३॥
तो वास पाहे जेणें मोहरी । तेउती मी सुखाची सृष्टी करीं ।
तो म्हणे जयातें उद्धरीं । तो मी स्वपदावरी बैसवीं ॥५४॥
त्यासी अल्पही विचंबू पावे । तो सर्वांगें मी करुं धांवें ।
त्याचें नाम जिंहीं स्मरावें । त्यांसी म्यां तारावें सर्वथा ॥५५॥
जेवीं तान्हयालागीं माता । तेवीं भक्तांची मज चिंता ।
त्यांची सेवाही करितां । मी सर्वथा लाजेंना ॥५६॥
माता बाळकाचें पुरवी कोड । तैसे ते माझे लळेवाड ।
त्यांचें प्रेमचि मज गोड । उपचारचाड मज नाहीं ॥५७॥
मी शरीर तो माझा आत्मा । प्रेमळ असे पढिया आम्हां ।
प्रेमळावरती सीमा । भक्तीचा महिमा चढेना ॥५८॥
त्यासी झणें काळ संहारी । यालागीं त्या आंतबाहेरी ।
मी निजांगाचें दुर्ग करीं । ऐशी प्रीति पुरी प्रेमळाची ॥५९॥
तेथ काळाचेनि हटतटें । लावूनि ब्रह्मस्थितीचे वाटे ।
माझे भक्त नेटेंपाटें । आपणिया आंतवटें स्वसुखें वसवीं ॥३६०॥
त्याचें स्वाभाविक कर्म जाण । तें माझे प्रीतीचें पूजन ।
तो देखे तें माझें दर्शन । त्याची चावटी तें स्तवन खुणेचें माझें ॥६१॥
तो स्वयें करी आरोगण । तेंचि मज नैवेद्यअर्पण ।
त्याची निद्रा ते जाण । समाधि संपूर्ण पैं माझी ॥६२॥
त्याचा निमेषोन्मेषांचा व्यापार । तो मज अत्यंत प्रियकर ।
त्याचे श्वासाचे परिवार । मज अपार सुखविती ॥६३॥
भक्तांची शरीरस्वभावस्थिती । तेणें मी सुखावें श्रीपती ।
ऐसे सप्रेम भक्त आवडती । माझी अनन्यप्रीती मद्भक्तां ॥६४॥
चारी पुरुषार्थां नातळती । उपेक्षूनि चारी मुक्ती ।
सप्रेम करिती माझी भक्ती । मजचि पावती मद्भक्त ॥६५॥
गंगा सागरीं मीनली मिळे । मीनली त्याचीच त्यावरी लोळे ।
तैसा भक्त मिळोनि भावबळें । माझे भक्तीचे सोहळे मजमाजीं भोगी ॥६६॥
जेवीं कां भरें तरुणांगी । तरुणपण भोगी सर्वांगीं ।
तेवीं भक्त मिळोनि मजलागीं । माझे भक्तीचें भोगी वैभव ॥६७॥
कां सतरावीचें गोडपण । चंद्र जाणे आपुलें आपण ।
तेवीं मी होऊनि माझें भजन । भक्त सज्ञान जाणती ॥६८॥
जातिस्वभावें उदक एक । तेंचि गंगा यमुना नांवीं देख ।
प्रयागसंगमीं उद्धरी लोक । तेवीं भक्त भाविक मद्योगें ॥६९॥
तेवीं माझे भक्त मज मिळून । अनन्य करिती माझें भजन ।
येथ भाविक सात्विक अतिदीन । उद्धरती जाण मद्योगें ॥३७०॥
पृथ्वी निधानें भरली आहे । परी पायाळेंवीण प्राप्ति नोहे ।
तेवीं आत्मा स्वतःसिद्ध आहे । गुरुकृपा लाहे तैं प्राप्ती ॥७१॥
चहूं पुरुषार्थातें त्यागिती । चारी मुक्ति उपेक्षिती ।
पंचम पुरुषार्थाची भक्ती । मज पढियंती उद्धवा ॥७२॥
येचि भक्तीचें मज कोड । हेचि भक्त माझे लळेवाड ।
मज अवाप्तकामा त्यांची चाड । ऐसें प्रेम गोड तयांचें ॥७३॥
आम्ही प्रेमाचे पाहुणे । भावार्थाचे आंदणे ।
म्यां अनन्याची सेवा करणें । जीवेंप्राणें सर्वस्वें ॥७४॥
माझें नाम आत्माराम । मी अवाप्तसकळकाम ।
परी प्रेमळांलागीं सकाम । ऐसें गोड प्रेम तयांचें ॥७५॥
मग आपुलिये संबसाटीं । प्रेमळू घें मी उठाउठी ।
वरीव सुखही दें शेवटीं । मज प्रीति मोटी प्रेमाची ॥७६॥
प्रेम मजसीं मोलें अधिक । संवसाटी करितां नव्हे देख ।
यालागीं वरीव देतां सुख । न ये तैं सेवक सेलेचा होय ॥७७॥
प्रेमाचा जिव्हाळा पूर्ण । भावार्थाची उणखूण ।
जाणता मी एक श्रीकृष्ण । इतरांसी जाण कळेना ॥७८॥
मज गोपिकांची कोण गोडी । त्यांच्या प्रेमाची जाति चोखडी ।
यालागीं मज त्यांची आवडी । अतिगाढी उद्धवा ॥७९॥
कुब्जा काय सुंदर होती । तिच्या प्रेमाची मज प्रीती ।
राधा प्रार्थी मी वनाप्रती । काय विषयासक्तीलागूनी ॥३८०॥
कोण भक्ती केली गोपाळीं । काय तीं सोंवळीं कीं ओंवळीं।
त्यांचे उच्छिष्ट कवळ मी गिळीं । प्रेमसंमेळीं डुल्लत ॥८१॥
पांडवांच्या वाचें मी काय लागें । त्यांचीं वेवटें सोशीं अनेगें ।
मी सुदाम्याच्या पायां लागें । काय त्याचेनि पांगें पांगलों ॥८२॥
मी काय अन्नासी दुकाळलों । तो यज्ञपत्न्यांसीं मागों गेलों ।
मी भावार्थाचा भुकेलों । प्रेमाच्या पावलों पाहुणेरा ॥८३॥
माझी काय क्षीण झाली शक्ति । मज गोपिका दावीं बांधिती ।
त्यांच्या निजप्रेमाची जाती । मी स्वयें श्रीपती पोखितू ॥८४॥
मी न लागतां कोणाची कवडी । अर्जुनाचीं धूतसें घोडीं ।
धर्माघरीं उच्छिष्टें काढीं । मज अतिआवडी प्रेमाची ॥८५॥
मज प्रेमळांची अतिआवडी । ते लोकेषणालाज दवडी ।
महत्त्वाच्या विसरवी कोडी । त्यांच्या सेवेची जोडी मजलागीं ॥८६॥
सकळ अळंकार लेऊनि माता । निजपुत्र मस्तकीं लाडवितां ।
त्याच्या कंटाळेना थुंकमुता । तेवीं प्रेमळें सर्वथा मजलागीं ॥८७॥
ऐसा प्रेमाचेनि अतिपांगें । म्यां पंगिस्त होइजे श्रीरंगें ।
यालागीं तया पुढेंमागें । सदा सर्वांगें तिष्ठत ॥८८॥;
उद्धवा यादव समस्त । असतां माझें बहुत गोत ।
तूंचि प्रियकर मज जो येथ । माझें प्रेम अद्भुत तुजलागीं ॥८९॥
हे ऐकोनि देवाची गोठी । उद्धवें पायीं घातली मिठी ।
देवो सुखावोनि पोटीं । उठाउठी आलिंगी ॥३९०॥
हृदयीं हृदय जालें संलग्न । देहीं देहा पडिलें आलिंगन ।
मनेंसीं एक झालें मन । स्वानंद पूर्ण वोसंडे ॥९१॥
देवो विसरला देवपण । भक्ता नाठवे भक्तपण ।
दोघांचें उडालें दोनीपण । स्वानंदीं पूर्ण बुडाले ॥९२॥
सेव्यसेवकता ठेली गोठी । द्वैतभावाची खुंटली दृष्टी ।
भक्तिसाम्राज्याच्या पाटीं । दोघां झाली भेटी निजात्मता ॥९३॥
स्थूळ लिंग आणि कारण । इंहीं उपलक्षिजे महाकारण ।
ते देहचतुष्टयाची आठवण । आठवितें कोण ते ठायीं ॥९४॥
तेथ निबिड आणि निघोट । सुखस्वरुप घनदाट ।
नाहीं आदि मध्य शेवट । तें झालें प्रकट स्वयंभ ॥९५॥
नवल देवाचें पूर्णपण । तेथही लाघव केलें जाण ।
मोडों नेदीचि उद्धवपण । ऐसा भक्त आन मज मिळेना ॥९६॥
उद्धवाऐसा मजपाशीं । कोण मिळेल अळोंचासी ।
माझें निजगोड कोणापाशीं । म्यां सावकशीं सांगावें ॥९७॥
मज निजधामा गेलिया जाण । माझें जें निःसीम निजज्ञान ।
त्यासी उद्धव शुद्ध सांठवण । यालागीं उद्धवपण राखिलें ॥९८॥
उद्धव स्वानंदीं निमग्न । त्यासी थापटूनि आपण ।
सावध करी श्रीकृष्ण । येरा भक्तपण आठवलें ॥९९॥
म्हणे जय जय श्रीकृष्णनाथा । जें मज सुख दाविलें आतां ।
तें नित्य निर्वाहे सर्वथा । ऐशी कृपा तत्त्वतां करावी ॥४००॥
तंव श्रीकृष्ण म्हणे उद्धवा । हा माझा निजगुह्य गोप्य ठेवा ।
तुज म्यां सांगीतला कणवा । पुरुषार्थ पांचवा या नांव ॥१॥
हें वेदशास्त्रां अगम्य । सकळ देवांसी अतिदुर्गम ।
जेणें लुब्धें मी पुरुषोत्तम । तें हें भक्तप्रेमरहस्य ॥२॥
मज वश्य करावयाचें वर्म । पोटीं धरावें भक्तिप्रेम ।
चहूं मुक्तींचा पडे भ्रम । पुरुषार्थकाम वोसरे ॥३॥
ज्यासी माझी सप्रेम भक्ती । त्याचेनि नांवें विघ्नें पळती ।
मजवेगळी अन्यथा गती । करावया प्राप्ती कोणाची ॥४॥
जयासी माझी अनन्य भक्ती । तेथ माझी पूर्ण कृपास्थिती ।
मद्भक्तां मजवेगळी गती । कदा कल्पांतीं असेना ॥५॥
वेदविधीं करावा बाधू । तो निःश्वसित माझा वेदू ।
जेथ माझा पूर्ण कृपाबोधू । तेथ विधिवादू बाधीना ॥६॥
जे कां माजे भक्त सकाम । ते फळभोगांतीं होऊनि निष्काम ।
तेही ठाकिती माझें निजधाम । भक्तां अन्यगमन असेना ॥७॥
ज्यासी माझें अनन्य भजन । स्वकर्म त्याचे सेवी चरण ।
विधिवेदू वोळंगे अंगण । त्यासी अन्यथागमन असेना ॥८॥
जेथ सप्रेम नाहीं माझी भक्ती । तेथ कर्में अवश्य बाधती ।
कर्मास्तव अन्यथागती । अभक्त पावती उद्धवा ॥९॥
जेथ माझी साचार भक्ती । तेथ कर्माची न चले गती ।
मद्भक्तां माझी प्राप्ती । सत्य निश्चितीं या हेतू ॥४१०॥
भक्तांसी सर्वांभूतीं मद्भावो । तेथ कर्मबंधा कैंचा ठावो ।
कर्मानुगती खुंटली पहा हो । मत्प्राप्ति स्वयमेवो मद्भक्तां ॥११॥
भक्त पाऊल ठेवी अवनीं । परी म्यां ठेविलें न धरी मनीं ।
कर्ता भगवंत सत्य मानी । यालागीं कर्मबंधनीं बांधवेना ॥१२॥
भक्तांस नाहीं अन्यथा गती । मद्भक्तां माझी अनन्य प्रीती ।
त्या भक्तभावार्थाच्या युक्ती । विशद श्रीपती स्वयें केल्या ॥१३॥
’न मे भक्तः प्रणश्यति’ । हें बोलिला अर्जुनाप्रती ।
तें साचार बिरुद श्रीपती । तो भक्तां अन्यगती घडोंचि नेदी ॥१४॥
भक्तशापाची ऐकतां गोठी । देवो कैवारें सवेग उठी ।
सुदर्शन लावूनि पाठी । केला हिंपुटी दुर्वासा ॥१५॥
एका अंबरीषाकारणें । दहा गर्भवास सोशिले जेणें ।
तो अनन्य भक्तांसी उणें । कोण्याही गुणें येवों नेदी ॥१६॥;
भक्तकैवारी श्रीकृष्ण । हे भावार्थाची निजखूण ।
एका जनार्दना शरण । भावो प्रमाण भक्तीसी ॥१७॥
शुद्धभावेंवीण जे भक्ती । तेचि दांभिक जाण निश्चितीं ।
ते अपक्वचि राहे प्राप्ती । जेवीं कांकड जाती मुगांची ॥१८॥
’भक्तियोगस्य मद्गतिः’ । हे मूळपदींची पदस्थिती ।
तेंचि वाढविलें किती । ऐसें श्रोतीं न म्हणावें ॥१९॥
’मद्गती’ या पदाची व्युत्पत्ती । कोण आहे जाणे किती ।
हें रहस्य जाणे विरळा क्षितीं । यालागीं क्षमा श्रोतीं करावी ॥४२०॥
हो कां भक्ति माझी निजजननी । ज्यां प्रेमपान्हां ये वाढवूनी ।
सरता केलों भगवद्भजनीं । ते म्यां गौण महिमेनीं वानिली ॥२१॥
भगवद्भक्तीचें महिमान । मी केवीं जाणें अज्ञान ।
जें बोलिलों तें सर्वथा गौण । क्षमा पूर्ण करावी ॥२२॥
भक्ति माझी निजमाउली । ते मी आपुल्या बोबडे बोलीं ।
ग्रंथाधारें गौरविली । सप्रेम भुली भुलोनी ॥२३॥
प्रेमाची निजजाति कैशी । आठवों नेदी आठवणेसी ।
एवं विसरवूनि हेतूसी । भक्तिरहस्यासी बोलविलें ॥२४॥
जेवीं कां निजबाळकातें । माउली बोल बोलवी त्यातें ।
तेवीं भक्तीनें मज केलें येथें । म्यां चुकी कोणातें ठेवावी ॥२५॥
माउलीचें लोभाळूपण । प्रकट करी तो मूर्ख जाण ।
याहीपरी मी अज्ञान । चुकलेपण दिसताहे ॥२६॥
उडिदीं काळें जेथींच्या तेथें । तेवीं चुकलेपण माझें येथें ।
चुकीचि मानावी निश्चितें । हेंही गुरुनाथें वारिलें ॥२७॥
चुकलेपणचि मानितां । मी हों पाहें कवि कर्ता ।
मीपण नावडे गुरुनाथा । तेणें तें तत्त्वतां सांडविलें ॥२८॥
साङग झालिया कथाकथन । तेणें श्लाघें न घ्यावें मीपण ।
तंव गुरुंनीं दावूनि निजखूण । मीतूंपण उडविलें ॥२९॥
हेही बोल बोलता । मी नव्हें नव्हें गा सर्वथा ।
मी नव्हें कवि कर्ता । हें गुरुचें तत्त्वतां गुरु जाणे ॥४३०॥;
तंव श्रोते म्हणती चमत्कार । भक्तिसुखाचें सुखसार ।
भक्तिपरमामृतसागर । उघड साचार तुवां केला ॥३१॥
भागवत मुख्य भक्तिप्रधान । जें भक्तीचें सुख सनातन ।
तें करतळामळ करुनि जाण । तुवां परिपूर्ण दाविलें ॥३२॥
तुवां हा थोर केला उपकार । तरावया स्त्रियादि शूद्र ।
जग व्हावया भजनतत्पर । भागवत निजसार काढिलें ॥३३॥
भागवतीचें गुप्त पीयूख । तें त्वां प्रकटिलें भक्तिसुख ।
तेणें संत सुखावले देख । श्रोते सकळिक निवाले ॥३४॥
तुज संतोषोनि श्रीपती । दीधली आपली निजभक्ती ।
यालागीं तुवां भक्तीची कीर्ती । यथार्थस्थितीं वर्णिली ॥३५॥
तुझे भक्तीचा एकेक बोल । ब्रह्मसुखेसीं सखोल ।
त्याहीमाजीं प्रेमाची वोल । येताति डोल चित्सुखें ॥३६॥
तुज वाखाणितां निजभक्ती । प्रेमें वोसंडे चित्तवृत्ती ।
विसरोनियां ग्रंथस्फूर्ती । भक्तीची कीर्ती वानिशी ॥३७॥
निजआवडी वाडेंकोडें । वानितां भक्तीचे पवाडे ।
तुज नाठवे मागेंपुढें । प्रेम गाढें जाणवलें ॥३८॥
जंव जंव भक्तीचें निरुपण । अधिकाधिक वाढतां जाण ।
तंव तंव येतसे स्फुरण । तेथ कोण पुरे म्हणेल ॥३९॥
जंव जंव निरुपणा वाढी । तंव तंव भक्तीची अधिक गोडी ।
तेणें श्रोत्यांचीही आवडी । चढोवढी वाढली ॥४४०॥
करितां भक्तिसुखनिरुपण । श्रोते वक्ते लांचावले जाण ।
होतां अमृताचें आरोगण । पुरे कोण म्हणों शके ॥४१॥
यापरी गा अतिप्रीतीं । वाढलि निरुपणीं भक्ती ।
ते आवरुनियां स्फूर्ती । पुढील ग्रंथार्थीं प्रवर्तें ॥४२॥
हें ऐकोनि संतवचन । केलें साष्टांग नमन ।
भली दीधली आठवण । येरवीं निरुपण नावरतें ॥४३॥
’भक्तियोगस्य मद्गतिः’ । ये पदाची पदव्युत्पत्ती ।
निरुपिली भगवद्भक्ती । जेणें भगवत्प्राप्ती अतिसुलभ ॥४४॥;
हे न करितां भगवद्भक्ती । त्रिगुणगुणीं जीवपंक्ती ।
बांधिल्या संसारीं उन्मज्जती । तेही स्थिती हरि सांगे ॥४५॥