बोधितस्यापि देव्या मे, सूक्तवाक्येन दुर्मतेः ।
मनोगतो महामोहो, नापयात्यजितात्मनः ॥१६॥
काम्य कर्मीं होईल सुख । हें बोलणें समूळ लटिक ।
काम्य कर्मीं अधिक दुःख । हें नेणती मूर्ख सकाम ॥८७॥
प्रत्यक्ष म्यां याग करुन । इंद्रादि देवांतें यजून ।
उर्वशीसंभोगा लाधून । अतिदुःखी जाण मी झालों ॥८८॥
नारायणऊरुसीं जन्मली । यालागीं ’उर्वशी’ नांव पावली ।
त्या मज श्रुतिवाक्यें बोधिलीं । निष्काम बोली अतिशुद्ध ॥८९॥
ऐकतां श्रुतिनिष्कामबोली । माझी न वचेच सकाम भुली ।
जंव गोविंदें कृपा नाहीं केली । तंव कामाची चाली खुंटेना ॥१९०॥
भावें हरीसी निघाल्या शरण । हृदयीं प्रकटे नारायण ।
तेव्हा सर्व काम सहजें जाण । जाती पळोन हृदयस्थ ॥९१॥
उर्वशीकामसंगें जाण । थोर कष्टलों मी आपण ।
असो तिचा अपराध कोण । मीचि हरिस्मरण विसरलों ॥९२॥
जरी मी करितों हरीचें स्मरण । तरी काम बापुडें बाधी कोण ।
मज माझी असती आठवण । तैं तुच्छ जाण उर्वशी ॥९३॥