रामनिर्याणमालोक्य, भगवान् देवकीसुतः ।
निषसाद धरोपस्थे, तूष्णीमासाद्य पिप्पलम् ॥२७॥
बळभद्र झाला देहातीत । हें देखोनि देवकीसुत ।
भगवान् श्रीकृष्णनाथ । स्वयें इच्छित निजधाम ॥७८॥
तेव्हां धरातळीं धराधर । मौनें अश्वत्थातळीं स्थिर ।
वीरासनीं शार्ङगधर । श्यामसुंदर बैसला ॥७९॥
ज्याच्या स्वरुपाचे आवडीं । शिवविरिंच्यादि झालीं वेडीं ।
ज्याच्या दर्शनाची गोडी । दृष्टी नोसंडी क्षणार्ध ॥१८०॥
दृष्टीनें चवी चाखिली गाढी । तंव तंव रसना चरफडी ।
तिणें कीर्तनरसें रसगोडी । चवी चोखडी चाखिली ॥८१॥
प्राशनेंवीण कृष्णरस । रसना सेवी अतिसुरस ।
तेव्हां विषयरस तो विरस । होय निरस संसार ॥८२॥
श्रवणीं पडतां श्रीकृष्णकीर्ती । त्रिविध तापां उपशांती ।
ज्याची वर्णितां गुणनामकीर्ती । चारी मुक्ती कामार्या ॥८३॥
चरणकमलमकरंद । तुळशीमिश्रित आमोद ।
सेवितां घ्राणीं परमानंद । इतर गंध ते तुच्छ ॥८४॥
ज्याचा लागतां अंगसंग । देहबुद्धीसी होय भंग ।
स्वानंदविग्रही श्रीरंग । अंगप्रत्यंगसुखकारी ॥८५॥
ज्याचे आवडीं वंदितां पाये । समाधि लाजिली मागें ठाये ।
तो अश्वत्थातळीं पाहें । बैसला आहे निजशोभा ॥८६॥
तें अंतकाळींचें कृष्णध्यान । शुकासी आवडलें संपूर्ण ।
तोही स्वानंदें वोसंडून । श्रीकृष्णध्यान वर्णित ॥८७॥