एकनाथी भागवत - आरंभ

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥

ॐ नमो श्रीसद्गुरु अच्युता । तूं देहीं असोनि देहातीता ।

गुणीं निर्गुणत्वें वर्तता । देहममता तुज नाहीं ॥१॥

देहममता नाहीं निःशेख । तानेपणीं प्यालासी विख ।

पूतना शोषिली प्रत्यक्ष । दावाग्नि देख प्राशिला ॥२॥

जो तूं वैकुंठपीठ विराजमान । त्या तुज नाहीं देहाभिमान ।

होऊनि गोवळांसमान । हुंबरी जाण घालिशी स्वयें ॥३॥

तुज पावावया कर्मबळें । सदा सोशिती सोंवळें ओंवळें ।

तो तूं मेळवूनि गोवळे । जेवणें खेळेंमेळें स्वयें करिसी ॥४॥

ज्यातें म्हणती दुराचार । तो तुवां करुनि व्यभिचार ।

केला गोपिकांचा उद्धार । हें अगम्य चरित्र वेदशास्त्रां ॥५॥

घरीं सोळा सहस्त्र नारी । नांदसी एकलक्ष साठी सहस्त्र कुमरीं ।

तरी तूं बाळब्रह्मचारी । तुज सनत्कुमारीं वंदिजे ॥६॥

तुझे ब्रह्मचर्याची थोरी । शुक नारद वंदिती शिरीं ।

हनुमंत लोळे पायांवरी । तूं ब्रह्मचारी नैष्ठिक ॥७॥

व्रतबंध नव्हतां आधीं । तुवां भोगिलीं गोवळीं पेंधीं ।

तो तूं उर्ध्वरेता त्रिशुद्धीं । तुज भीष्म वंदी सर्वदा ॥८॥

नवलक्ष गोकंठपाशीं । तुज बांधवेना हृषीकेशी ।

तो तूं भावार्थें बांधिलासी । रासक्रीडेसी गोपिकीं ॥९॥

जैसे जैसे त्यांचे मनोरथ । तैसतैसा तूं क्रीडा करित ।

सामास रात्रि करुनि तेथ । तत्प्रेमयुक्त विचरसी ॥१०॥

तो तूं कामासी नातळत । कामिनीकाम पूर्ण करित ।

लाजवूनि विधिवेदार्थ । गोपिका समस्त तारिल्या ॥११॥

गोपी तारिल्या प्रमाद्भुतें । गायी तारिल्या वेणुगीतें ।

गौळिये तारिले समस्तें । श्रीकृष्णनाथें निजयोगें ॥१२॥

कंस तारिला दुष्टबुद्धी । व्याध तारिला अपराधी ।

ऐसा कृपाळु तूं त्रिशुद्धी । संसार अवधी श्रीकृष्णा ॥१३॥

नुल्लंघवे श्रीकृष्णाच्या बोला । यमें गुरुपुत्र आणूनि दिधला ।

तो श्रीकृष्ण निजतनु त्यागिता जाहला । जो नव्हे अंकिला कळिकाळा ॥१४॥

भागवतीं कळसाध्यावो । जेथें निजधामा जाईल देवो ।

तो अतिगहन अभिप्रावो । सांगे शुकदेवो परीक्षितीसी ॥१५॥

कळसावरतें न चढे काम । तेवीं देवें ठाकिल्या निजधाम ।

राहिला निरुपणसंभ्रम । ’कळसोपक्रम’ या हेतु ॥१६॥

वेदशास्त्रार्थनिजनिर्वाहो । देहीं नुपजे अहंभावो ।

तो हा एकतिसावा अध्यावो । जेथ निजधामा देवो स्वेच्छा निघे ॥१७॥

श्रीकृष्णाचें निजधामगमन । ब्रह्मादिकां अतर्क्य जाण ।

एका जनार्दनकृपा पूर्ण । विशद व्याख्यान सांगेन ॥१८॥

दारुकें द्वारका प्रयाण । केलिया, निजधामा निघे श्रीकृष्ण ।

तें निर्याणकाळींचें दर्शन । पाहों देवगण स्वयें आले ॥१९॥

तेचि अर्थीचें निरुपण । श्रीशुक सांगे आपण ।

श्रोता परीक्षिती सावधान । श्रीकृष्णनिर्याणश्रवणार्थी ॥२०॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP