अथ कृष्णदयार्णवकृत
श्रीएकनाथस्तवकदशक
सप्रेमयुक्त घडली गुरुभक्ति साची । झाली कृपा सफल साध्य जनार्दनाची ॥
ब्रह्मैव बोध समता निजनिर्विकारी । श्रीएकनाथ विबुधाभरणावतारी ॥१॥
पाहों त्रिदेव यवनाकृति आर्त आले । श्राद्धान्न घालुनि तयांप्रति तृप्त केलें ॥
साम्यें प्रशंसुनि वरप्रद केश शौरी । श्रीएकनाथ विबुधाभरणावतारी ॥२॥
त्वत्कीर्तिपुण्यसरिता कलिदोष नाशी । त्वत्सांप्रदाय परमामृत दे जनांसी ॥
ज्याच्या वरें जडमुढां भजनेंचि तारी । श्रीएकनाथ विबुधा० ॥३॥
संपादिलें ऋण बहु द्विजभोजनासी । तें फेडिलें यदुविरें श्रुत सज्जनांसी ॥
केला ऋणी निजबळें भवबाधहारी । श्रीएकनाथ विबुधा० ॥४॥
श्रीखंडिया म्हणवि कृष्णचि ब्रह्मचारी । सर्वोपचार जलवाहक तालधारी ॥
सेवासुखें विसरला स्वपदा मुरारी । श्रीएकनाथ विबुधा० ॥५॥
श्रीकृष्णदास नमितां जडलिंग भागीं । केला उभा यम स्वयें रजनिप्रसंगीं ॥
तें युद्धकांड करवी परिपूर्ण अग्रीं । श्रीएकनाथ० ॥६॥
रामायणादि दशमांतिल रुक्मिणीचें । केलें स्वयंवर फलप्रद वाक्य ज्याचें ॥
अध्यात्मतंतु न तुटे कविताप्रकारीं । श्रीएकनाथ० ॥७॥
वाराणशींत विदुषांप्रति मान्य झाली । एकादशावरि टिका सुगमार्थ केली ॥
ब्रह्मीं स्वकर्मविनियोग जनोपकारी । श्रीएकनाथ विबुधा० ॥८॥
ब्रह्मप्रतीति प्रगटी भजनीं द्विजांच्या । दुष्टाघरोग हरि पादरजेंचि ज्याच्या ॥
भूतीं दया भजन सर्व घटीं विचारी । श्रीएकनाथ विबुधा० ॥९॥
देहात्मभाव निरसी जड दृश्यरोधें । जीवात्मता विसरवी स्वरुपावबोधें ॥
लक्ष्यांश जीवशिव ऐक्यपदीं स्विकारी । श्रीएकनाथ० ॥१०॥
हा एकनाथदशकस्तव नित्यभावें । वाग्देवता प्रकटितां सकलार्थ पावे ॥
त्याला जगद्गुरु दयार्णव साहकारी। श्रीएकनाथ विबुधाभरणावतारी ॥११॥
॥ इति श्री कृष्णदयार्णवविरचिते श्रीमदेकनाथस्तवनदशक संपूर्णमस्तु ॥