एकनाथी भागवत - श्लोक १३ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


तथाऽप्यशेषस्थितिसम्भवाप्ययेष्वनन्यहेतुर्यदशेषशक्तिधृक् ।

नैच्छत्प्रणेतुं वपुरत्र शेषितं, मर्त्येन किं स्वस्थगतिं प्रदर्शयन् ॥१३॥

मायादि तीन्ही गुण । इत्यादि कारणां कारण ।

निजांगें श्रीकृष्ण आपण । स्वयें अकारण अनादित्वें ॥२८॥

ब्रह्मांडें कोटी अनंत । उत्पत्तिस्थितिप्रलयावर्त ।

करुनि श्रीकृष्णु अलिप्त । सामर्थ्यें अद्भुत श्रीकृष्णीं ॥२९॥

अशेषांही परम शक्ती । श्रीकृष्णलेशें सामर्थ्यवंती ।

कृष्णुदेह तो विदेहशक्ती । स्वेच्छाशक्तीं स्वधामा गेला ॥१३०॥

इहलोकींची आरक्ती । श्रीकृष्णासी नाहीं चित्तीं ।

निजधामाची अतिप्रीती । तेही निश्चितीं असेना ॥३१॥

निजदेहेंही इहलोकीं वस्ती । स्वेच्छा न मानीच श्रीपती ।

माझ्या देहाची अगम्य गती । तेणें साधकस्थिती भ्रंशेल ॥३२॥

माझा देह चैतन्यघन । तेथें बाधीना विषयसेवन ।

हें देखोनि साधक जन । देहसाधन मांडिती ॥३३॥

वायो साधूनियां पूर्ण । दृढ करुनि देहधारण ।

माझ्याऐसें विषयसेवन । करावया अभिमान वाढेल ॥३४॥

ऐसा वाढल्या देहाभिमान । माझें मावळेल निजात्मज्ञान ।

यालागीं विदेह श्रीकृष्ण । गेला निघोन निजधामा ॥३५॥

माझें नाकळतां निजात्मज्ञान । परी माझ्याऐसें विषयसेवन ।

करुं लागती योगी जन । यालागीं श्रीकृष्ण निजधामा गेला ॥३६॥

माझ्या देहाची स्थिति गती । शंभु स्वयंभू कदा नेणती ।

मा इतरांसीं ते गती । कैशा रीतीं कळेल ॥३७॥

परी माझेऐसा देहाभिमान । वाढवितील योगी जन ।

हें जाणोनियां श्रीकृष्ण । विदेहें आपण निजधामा गेला ॥३८॥

ज्याचे देहाचें दर्शन । देखतां सबाह्य निवे मन ।

त्याही देहाचें मिथ्यात्व पूर्ण । दावूनि श्रीकृष्ण निजधामा गेला ॥३९॥

एवं त्यागावया देहाभिमान । कृष्ण निजधामा करी गमन ।

तरावया साधक जन । कृपाळु पूर्ण दीक्षा दावी ॥१४०॥

एथवरी वैराग्यस्थिती । देहाभिमानाच्या विरक्तीं ।

साधावी निजात्मप्राप्ती । हे दीक्षा श्रीपती दावूनि गेला ॥४१॥

जेणें देहें स्वयें श्रीकृष्ण । आचरला अनेक विंदान ।

परी ज्ञात्यासी न लगे दूषण । हें पूर्णत्व पूर्ण प्रकाशलें ॥४२॥

जैत अथवा आल्या हारी । ज्ञान मैळेना दोंहीपरी ।

ज्यासी मिथ्या भास नरनारी । तो सदा ब्रह्मचारी व्यभिचारामाजीं ॥४३॥

स्त्रीपुत्रादि गृहवासी । असोनि नित्य संन्यासी ।

हेंही लक्षण हृषीकेशीं । येणें अवतारेंसीं दाविलें ॥४४॥

अंगीं बाणलें गोवळेपण । सवेंचि स्वामित्व आलें पूर्ण ।

शेखीं सेवकही जाहला आपण । तरी पूर्णपण मैळेना ॥४५॥

एकाचे घरीं उच्छिष्टें काढी । एकाचीं अंगें धूतसे घोडीं ।

तरी पूर्णत्वाचिये जोडी । उणी कवडी नव्हेचि ॥४६॥

एकाचीं निमालीं आणिलीं बाळें । एकाचीं समूळ निर्दाळिलीं कुळें।

इंहीं दोंही परी ज्ञान न मैळे । हेंही प्रांजळें प्रकाशिलें ॥४७॥

एकाचा पूर्ण जाहला कैवारी। एकाचा जाहला पूर्ण वैरी ।

परी एकात्मता चराचरीं । अणुभरी ढळेना ॥४८॥

एकीं उद्धरिलीं चरणीं लागतां । तोही एकाचे चरणीं ठेवी माथा ।

बाप ज्ञानाची उदारता । न्यूनपूर्णता तरी न घडे ॥४९॥

इतर ज्ञाते ज्ञानस्थिती । बोल बोलोनि दाविती ।

तैशी नव्हे श्रीकृष्णमूर्ति । आचरोनि स्थिती दाविली अंगें ॥१५०॥

अतिगुह्य ज्ञानलक्षणें । आचरोनि दाविलीं श्रीकृष्णें ।

परी अणुमात्रही उणें । नेदीच पूर्णपणें अंगीं लागों ॥५१॥

एवढी ज्या देहाची ख्याती । जेणें देहें दीन उद्धरती ।

ज्या देहातें सुरवर वंदिती । ज्या देहाची कीर्ती त्रैलोक्य वर्णी ॥५२॥

त्या देहाची अहंकृती । निःशेष सांडूनि श्रीपती ।

गेला निजधामाप्रती । ठेवूनि निजमूर्ति स्वभक्तध्यानीं ॥५३॥

श्रीकृष्णें देह नेला ना त्यागिला । तो लीलाविग्रहें संचला ।

निजभक्तध्यानीं प्रतिष्ठिला । स्वयें निजधामा गेला निजात्मयोगें ॥५४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP