एकनाथी भागवत - श्लोक १४ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


य एतां प्रातरुत्थाय, कृष्णस्य पदवीं पराम् ।

प्रयतः कीर्तयेद्भक्‍त्या, तामेवाप्नोत्यनुत्तमाम् ॥१४॥

श्रीकृष्णअवताराचे अंतीं । कृष्णाची जे परम गती ।

अतिउत्कृष्ट योगस्थिती । अतर्क्य निश्चितीं सुरश्रेष्ठां ॥५५॥

जे गतीहूनि वरती । चढेना अधिक गती ।

तीतें ’परा पदवी’ म्हणती । वेदशास्त्रोक्तीं सज्ञान ॥५६॥

हे ’श्रीकृष्णपरमपदवी’ । जो कोणी भक्तियुक्त सद्भावीं ।

नित्य नेमस्त धरुनि जीवीं । पढे निजभावीं प्रातःकाळीं ॥५७॥

भक्तियुक्त हृदयकमळीं । या चौदा श्लोकांची जपमाळी ।

जिह्वाग्रें अनुदिनीं चाळी । नित्य प्रातःकाळीं नेमस्त ॥५८॥

केलिया या नेमासी । सांडणें नाहीं प्राणांतेंसीं ।

ऐशी निष्ठा जयापाशीं । उत्तमत्वासी तो पावे ॥५९॥

श्रीकृष्णपदवी गातां गीतीं । पाया लागती चारी मुक्ती ।

त्यांचीही उपेक्षूनि स्थिती । कृष्णपदवी निश्चितीं स्वयें पावे ॥१६०॥

हे चौदाही श्लोक जाण । चौदा विद्यांचें जन्मस्थान ।

जो प्रातःकाळीं करी पठण । कृष्णपदवी पूर्ण तो पावे ॥६१॥

हे चौदाही श्लोक जाण । चौदा भुवनांचें निजजीवन ।

कृष्णपदवी पाविजे पूर्ण । नेमस्त पठण केलिया ॥६२॥

हे चौदाही श्लोक जाण । चौदा पदें गयावर्जन ।

पदीं पिंडा समाधान । नेमस्त पठण केलिया ॥६३॥

हे चौदाही श्लोक जाण । चौदा इंद्रांच्या जीवां जीवन ।

इंद्रांचा इंद्र होइजे आपण । नेमस्त पठण केलिया ॥६४॥

हे चौदाही श्लोक जाण । चौदा कांडें वेद संपूर्ण ।

वेदवादां समाधान । नेमस्त पठण केलिया ॥६५॥

हे चौदाही श्लोक जाण । संसाराचे गुणकर्मवर्ण ।

मोडूनि करी ब्रह्म पूर्ण । नेमस्त पठण केलिया ॥६६॥

प्रातःकाळीं नेमस्त पठण । करितां पाविजे ब्रह्म परिपूर्ण ।

मा त्रिकाळीं जो करी पठण । तो स्वदेहें श्रीकृष्ण स्वयें होय ॥६७॥

एथ पढोनि जो अर्थ पाहे । तो स्वयें स्वयंभ श्रीकृष्ण होये ।

श्रीकृष्णाची पूर्ण पदवी पाहे । आंदणी होये तयाची ॥६८॥

श्रीकृष्णपदवी निजनिर्याण । श्रवणें पठणें अर्थें जाण ।

साधकां करी ब्रह्म परिपूर्ण । हें गुह्य निरुपण परमार्थसिद्धीं ॥६९॥

एथ न करितां अतिसाधन । अनायासें ब्रह्मज्ञान ।

कृष्णपदवी पाविजे पूर्ण । श्रद्धायुक्त पठण नेमस्त करितां ॥१७०॥

तक्षकभयाची निवृत्ती । देहीं पावावया विदेहप्राप्ती ।

हे सुगमोपायस्थिती । कृपेनें परीक्षितीप्रती शुक सांगे ॥७१॥

हे कृष्णपदवी निजनिर्याण । श्रद्धायुक्त नेमस्त पठण ।

करितां पाविजे ब्रह्म पूर्ण । हे प्रतिज्ञा पूर्ण श्रीशुकाची ॥७२॥

ऐशी हे सुगम परी । असतां जो श्रद्धा न धरी ।

तो बुडाला संसारसागरीं । अविद्येघरीं घरजांवयी तो ॥७३॥

तोचि अविद्येचा पोसणा । विषयीं प्रतिपाळिला सुणा ।

अहंथारोळां बैसणा । सर्वदा जाणा वसवसित ॥७४॥

असोत या मूढ गोष्टी । रचल्या सुखा पडेल तुटी ।

या श्लोकपठणासाठीं । होय भेटी परब्रह्मीं ॥७५॥

कृष्णनिजपदवीव्याख्यान । करावया मी अपुरतें दीन ।

जनार्दनें कृपा करुन । हें निरुपण बोलाविलें ॥७६॥

एका जनार्दना शरण । श्रीकृष्णपदवीनिरुपण ।

तो हा ’एकादशाचा कळस’ पूर्ण । व्यासें जाणोन वायिला ॥७७॥

श्रीकृष्णपदवीपरतें । निरुपण न चढे एथें ।

तो हा ’कळस’ एकादशातें । व्यासेण निश्चितें निर्वाळिला ॥७८॥

निर्वाळिलें निरुपण । हे जनार्दनकृपा पूर्ण ।

एका जनार्दना शरण । यापरी श्रीकृष्ण निजधामा गेला ॥७९॥

येरीकडे द्वारकेसी । दारुक पावला विव्हळतेसीं ।

तेथील वर्तले कथेसी । परीक्षितीसी शुक सांगे ॥१८०॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP