कथाकल्पतरू - स्तबक १२ - अध्याय १

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥

॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥

श्रीगुरुभ्यो नमः ॥ ओंनमोजी श्रीअनंता ॥ तूंचि कार्यकारणकर्ता ॥ गुणां निर्गुणां उभयतां ॥ वागविता तूंची ॥१॥

जयजयाजी परात्परा ॥ जयजयाजी निर्विकारा ॥ अजरामरा अपंरपारा ॥ वेदगर्भा ॥२॥

जयजयाजी महद्भूता ॥ स्थावरजंगमा पूर्णभरिता ॥ शुद्धस्वरूपा अच्युता ॥ कैवल्यंदानी ॥३॥

ऐसिया तुज नमस्कार ॥ स्वयंप्रकाश तूं सहस्त्रकर ॥ ह्मणोनि आदिवंदनीं अधिकार ॥ तुझेचि ठायीं ॥४॥

तूं होवोनि गजानन ॥ करिसी भक्तमनोरथ पूर्ण ॥ तें तुझेंचि रूप सगुण ॥ जगद्वयापका ॥५॥

निजभक्तांचा घेवोनि कैंवार ॥ युगानुयुगीं मर्दिसी असुर ॥ ऐसिया तुज नमस्कार ॥ कृपासागरा ॥६॥

तुझी करावया स्तुती ॥ माझी केतुलीती मती ॥ शेषनारदादि सदा गाती ॥ परि अंत न लागे ॥७॥

तूं अनंत तुझीं नामें अनंत ॥ गुण अनंत चरित्रें अनंत ॥ सर्वकाळ गाती संत ॥ परमभक्ती करोनी ॥८॥

ऐसी एकाग्रमनें करितां स्तुती ॥ प्रत्यक्ष पावला गणपती ॥ संकेत दावी वरदहस्तीं ॥ प्रसन्नपणें ॥९॥

पाई घालितां लोटांगण ॥ वरदहस्तें दावी खुण ॥ कीं करीं ग्रंथ निरूपण ॥ साह्यकारी असें मीं ॥१०॥

आतां नमूं ब्रह्मकुमरी ॥ जे धवलहारा श्र्वेतांबरी ॥ भक्तमनोरथ पूर्ण करी ॥ कृपामात्रें ॥११॥

वीणापुस्तक शंखकमळ ॥ हातीं मिरवती सार्वकाळ ॥ जियेचें नमिती पदयुगुळ ॥ प्रेमळभक्त कर्यारंभीं ॥१२॥

यावरी नमुं कुळदेवता ॥ गुरुमाउली मातापिता ॥ तैसेंचि दंडवत हरिभक्तां ॥ केलें साष्टांगेसीं ॥१३॥

मांगां एकादशस्तबकाचें ॥ कथन जाहलें असे साचें ॥ पुढें अनुसंधान द्वादशाचें ॥ श्रोताजनीं आयकिजे ॥१४॥

पुराणांतरीं ऋषि बोलिले ॥ मतांतरें भेद पडिले ॥ तेचि येथें संग्रहिले ॥ कल्पतरुग्रंथीं ॥१५॥

अनेकपुष्पींचा दिव्यमधुं ॥ मधुमक्षिका मेळवी अगाधु ॥ तेविं येथें कथासंबंधु ॥ मेळविलासे ॥१६॥

श्रोतीं होवोनि सावधान ॥ पांडवकथा कीजे श्रवण ॥ तेणें उल्हासे अंतःकरण ॥ वक्तयाचें ॥१७॥

जेवीं देखोनि चंद्रोदयातें ॥ सारितापतीसि ये भरितें ॥ तेवीं देखोनि भाविक श्रोत्यातें ॥ वक्ता मनीं उचंबळे ॥१८॥

जन्मेजय राजा भारती ॥ वैशंपायन वेदमूर्तीं ॥ या दोहींची सुखसंगती ॥ घडली येथें ॥१९॥

तया परस्परांचा अनुवाद ॥ हरिकथेचा परमानंद ॥ श्रोतीं ऐकावा भेदाभेद ॥ ह्मणे मधुकरकवी ॥२०॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ द्वादशस्तबक मनोहरू ॥ मंगलचरणप्रकारू ॥ प्रथमाध्यायीं कथियेला ॥२१॥

॥ श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ श्रीमज्जगदीश्वरार्पणमस्तु ॥

॥ इति श्रीकथाकल्पतरौ द्वादशस्तबके प्रथमोऽध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP