॥ श्रीगणेशाय नमः ॥
सहित पांडवासर्वेश्वर ॥ दुःखित बैसला धृतराष्ट्र ॥ तैसाचि सर्व परिवार ॥ वीरपत्नी वीरमाता ॥१॥
तंव धैर्य धरोनि ते वेळां ॥ अंधें धर्मासि प्रश्न केला ॥ कीं हा दळभार मृत पडिला ॥ समस्तांचा ॥२॥
याचें परिमाण जाणत अससी ॥ तरी सर्व सांगें मजसी ॥ तंव धर्म ह्मणे तयासी ॥ ऐकें ताता ॥३॥
दहासहस्त्रां एक अयुत ॥ दहाअयुतीं लक्ष निभ्रांत ॥ शतलक्षीं विख्यात ॥ बोलिजे कोटी ॥४॥
अडसष्ट कोटी एकलक्ष ॥ आणि अधिक सहस्त्र वीस ॥ संग्रामसंख्या विशेष ॥ पडली येथें ॥५॥
लक्ष मर्यादा करोनी ॥ महारथींची संख्या जाणीं ॥ धनुर्धर चौदालक्ष आणी ॥ सहस्त्र चौदा ॥६॥
आणिक देशपरत्वें वीर ॥ पांचशतें साठ अधिकतर ॥ हे सांगितले थोरथोर ॥ एवं अठरा अक्षौहिणी ॥७॥
याउपरी धृतराष्ट्रें पुसिले ॥ हे सकळ कोणे गती पावले ॥ तें सर्वज्ञपणें वहिलें ॥ सांगे मज ॥८॥
तंव ह्मणे पंडुनंदन ॥ स्वामी स्वंपराक्रमें करुन ॥ सहसैन्य पुत्रादि मरोन ॥ मले स्वर्गीं तुझे ॥९॥
तयां इंद्रलोक जाहले ॥ आणि जे युद्धीं मान्य भले ॥ ते गंधर्वीं वाहोनि नेले ॥ अंतराळीं ॥१०॥
जे संग्रामभूमिके वास करिती ॥ तयां गुह्मकलोकप्राप्ती ॥ जे येकांगवीर शस्त्रघातीं ॥ सन्मुख क्षीण जाहले ॥११॥
ते ब्रह्मलोकाप्रति गेले ॥ आणि जे संग्रामाबाहेर मेले ॥ ते उत्तरदेशीं पावले ॥ पुण्यस्थान ॥१२॥
यावरी धृतराष्ट्र पुसत ॥ तुज हें ज्ञान कैसें विदित ॥ तें मज सागें समस्त ॥ युधिष्ठिरा गा ॥१३॥
धर्म ह्मणे हो नृपमणी ॥ तवाआज्ञेकरोनि वनीं ॥ गेलों तीर्थयात्रे लागुनी ॥ तेथें अनुग्रह पावलों ॥१४॥
लोमेशऋषीतें अभिवंदिलें ॥ तेणें दिव्यचक्षु दीधले ॥ ह्मणोनि म्यां जाणितलें ॥ परलोकगमन ॥१५॥
तंव अंध ह्मणे धर्मातें ॥ जीं मेलीं अनाथें सनाथें ॥ तीं कोणकोण लोकांतें ॥ पावली सांग ॥१६॥
येरु ह्मणे ताता पाहें ॥ तयां यक्षलोक प्राप्त आहे ॥ कां जे शरीरदान उत्साहें ॥ केलें पक्षिश्वापदां ॥१७॥
मग संतोषोनि अंध ह्मणे ॥ आतां प्रेतकर्म करणें ॥ माझेनि आज्ञेप्रमाणें ॥ धर्मराया ॥१८॥
वैशंपायन ह्मणती राया ॥ ऐसें अंधोक्त ऐकोनियां ॥ सुधर्मा विदुरा संजया ॥ युयुत्सु सूताद्रिकांसी ॥१९॥
तथा पुत्र सेवकांतें ॥ आज्ञा दीधली पंडुसुतें ॥ कीं प्रेतकार्यें समस्तें ॥ करारे शीघ्र ॥२०॥
ऐसी धर्माज्ञा पावेन ॥ इंद्रसेनादि मिळोन ॥ द्रव्यें घृत तैल चंदन ॥ अगरकाष्ठें आणिलीं ॥२१॥
पट्ठकुळीं व स्त्रीं झाकोनी ॥ शास्त्रमार्गें चिता रचोनी ॥ दाह देते जाहले तत्क्षणीं ॥ धूम्रें कोंदलें ब्रह्मांड ॥२२॥
दूर्योधनादि समस्त ॥ कौरव येकोत्तरशत ॥ दुःशासन लक्ष्मण धृष्टकेत ॥ शल्य आणि भूरिश्रवा ॥२३॥
सोमदत्त क्षेमधन्वा सृंजय ॥ विराट द्रुपद द्रौपदेय ॥ पांचाल्य आणि शिखंडिय ॥ कन्या अवयवयुक्ता ॥२४॥
कां जे स्थूणयक्षें लिंग दीधलें ॥ तें तो घेवोनि गेला आपुलें ॥ मग तयाचें स्त्रीत्व ठेविलें ॥ त्याचिये ठायीं ॥२५॥
मागील शाप सत्य केला ॥ ह्मणोनि स्त्रीरूप शिखंडि जाहला ॥ तोही चिते आंत घातला ॥ भीष्मशत्रू ॥२६॥
पार्षत युधामन्यु कोसल ॥ औजस शकुनी सौबळ ॥ भगदत्त पार्थिव भूपाळ ॥ कर्ण कर्तन कार्ष्णेय ॥२७॥
अभिमन्य घटोत्कच सृंजया ॥ भगबंधु अलंबुष विजया ॥ जळसंधादि करूनियां ॥ वीर सहस्त्रावधी ॥२८॥
नानादेशींचे भूपाळ ॥ अनाथ सनाथ सकळ ॥ सानथोर सर्व दळ ॥ केली एकत्र राशी ॥२९॥
दारुवांची रचोनी चित्ता ॥ विदुर राजाज्ञे करितां ॥ स्नेहें दाह जाहला देता ॥ कांता करिती कोल्हाळ ॥३०॥
सर्वभूतां कश्मल जाहलें ॥ धर्में अंधासि पुढें केलें ॥ मग सकळस्त्रियांसह गेले ॥ गंगेप्रती ॥३१॥
वैशंपायन ह्मणती राया ॥ सर्वही गंगेसि जावोनियां ॥ वस्र्त्रालंकार फेडोनियां ॥ मांडिलें उदककर्म ॥३२॥
पितरां पुत्रां पौत्रांचें ॥ बंधु सुत दास शूरांचें ॥ उदककर्म रायंचें ॥ करिते जाहले ॥३३॥
सर्व कांता करुस्त्रिया ॥ बहुत दुःखें पीडलिया ॥ स्नानें सारिली रिघोनियां ॥ जळीं बुड्या देताती ॥३४॥
जाणों गंगातीरचि निरुतें ॥ प्रसवलेंसे वीरपत्नीतें ॥ आकीर्ण जाहलें शोभतें ॥ समुद्रवत ॥३५॥
तंव अकस्मात कूंती ॥ शोकें व्यापिन्नली रुदती ॥ मग पुत्राप्रति बोलती ॥ जाहली देखा ॥३६॥
मंदमंदवाचे ह्मणे ॥ जो सूर्यासम मारिला अर्जुनें ॥ तो कर्ण पराक्रमी जाणणें ॥ बंधु तुमचा मत्पुत्र ॥३७॥
तैसा शुर नाहीं दुसरा ॥ त्याचें उदककर्म करा ॥ तो ज्येष्ठबंधु युधिष्ठिरा ॥ आमुचा ह्मणारे ॥३८॥
सूर्यापासोनि जाहला मातें ॥ या ऐकोनि मातृवाक्यातें पांडव जाहले शोक करिते ॥ कर्ण बंधु ह्मणवोनी ॥३९॥
मग मातेप्रति वचन ॥ धर्म बोले शोक करून ॥ अहो सर्प समान दारुण ॥ बाणजाळ कर्णाचें ॥४०॥
जयापुढें वीर कवणी ॥ उभा राहों न शके रणीं ॥ जो न मरे अर्जुनावांचोनी ॥ ब्रह्मादि देवां ॥४१॥
तो तवगर्भी सूर्यापासोन ॥ दैवें संभवना नंदन ॥ त्याचेनि बाहुबळें ससैन्य ॥ आह्मी त्रास पावलों ॥४२॥
अज्ञातपणें मारिला पार्थे ॥ कळलें नाहीं हो आह्मांतें ॥ जो प्रीतिकर गांधारातें ॥ तो निधानातें पावला ॥४३॥
सकळांमाजी दोघेजण ॥ परमरथी कर्णार्जुन ॥ अतिपराक्रमी नंदन ॥ माते प्रसवलीस ॥४४॥
हा मंत्रप्रभाव मोठा ॥ परि कर्ण घात जाहला ओखटा ॥ हायहाय वैकुंठपीठा ॥ काय केलें ऐसें तुवां ॥४५॥
पांचाळ द्रौपदेय अभिमन्य ॥ यांचे मृत्युदुःख एकगुण ॥ परि कर्णवधाचें शतगुण ॥ दुःख मज जाहलें ॥४६॥
कौरवक्षयसमुद्रांत ॥ मी बुडाली शोकग्रस्त ॥ ऐसें विलपोनि पंडुसुत ॥ करी उदककर्म कर्णचें ॥४७॥
जे उमे होते तेथ ॥ स्त्रिया पुरुषादि समस्त ॥ ते उदककर्मा आणित ॥ धर्मराजा ॥४८॥
मग कर्णस्त्रियांसहवर्तमान ॥ प्रेतकर्मांतें सारोन ॥ मंत्र गुप्तें करून ॥ केला सर्वविधी ॥४९॥
ह्मणे आह्मी नाशलों हो माते ॥ आज्ञातपणें मारिलें बंधूतें ॥ धर्म आंकुलेंद्रिय तेथें ॥ जाहला बंधूंसहित ॥५०॥
मग गंगातीर टाकोन ॥ आले ऐलाडी उतरोन ॥ सर्व स्त्रिया सेवकजन ॥ धृतराष्ट्रादिक ॥५१॥
तेव्हां कर्णदुःखें दुःखित ॥ धर्म चाले शोकाक्रांत ॥ ह्मणे पार्थें केला निःपात ॥ सहोदराचा ॥५२॥
आतां असो हा दूःखसागर ॥ आलिया हस्तनापुरा बाहेर ॥ नागरिकीं केला गजर ॥ मंगलतुरांचा ॥५३॥
दुःखवृत्ती राहिली मागें ॥ लागलीं बांधावणीं अनेगें ॥ आतां कथा येणें प्रसंगें ॥ ऐका ग्रंथांतरींची ॥५४॥
पांडव नदी उतरोनि आले ॥ इतकें संस्कृतीं असे कथिलें ॥ तेथोनि स्त्रीपर्व संपलें ॥ भारतीचें ॥५५॥
परि पुराणांतर विशेष ॥ ऐका सावधानें कथारस ॥ नगरीं जाहला उल्हास ॥ धर्म विजयी जालिया ॥५६॥
सर्व नगराबाहेर राहिले ॥ तंव पार्थासि स्फुरण आलें ॥ ह्मणे अकराअक्षौहिणी दळ पडिलें ॥ सामर्थ्यें माझेनी ॥५७॥
धन्य माझा संसार ॥ मी गांडीवधन्वा वीर ॥ माझेनीच राज्यभार ॥ प्राप्त धर्मासी ॥५८॥
ऐशा गर्वें मिशा चोळी ॥ कोणाकडे न निहाळी ॥ तें जाणोनियां वनमाळीं ॥ बोलता जाहला ॥५९॥
ह्मणे पार्था तवअंतर्गत ॥ मज विदित जाहलें समस्त ॥ तरी चाल पी निर्धारार्थ ॥ बभ्रूजवळी ॥६०॥
मग दोघे रथीं बैसोनी ॥ पार्थ आणि चक्रपाणी ॥ गेले रणभूमीसि तत्क्षणीं ॥ बभ्रुजवळी ॥६१॥
तें श्रीकृष्ण ह्मणे बभ्रूनें ॥ कवणरे झुंजला येथें ॥ तें पूर्वजांचिये सुकृतें ॥ सांगें आह्मांप्रती ॥६२॥
बभ्रू ह्मणे ऐका वचन ॥ असत्यभाषणें पूर्वजां पतन ॥ तरी येथें देखिले सुदर्शन ॥ फिरतां चक्र ॥६३॥
आणि भीमगदा विशेष ॥ तथा हनुमंताचें पुच्छ ॥ यांहींच केला विनाश ॥ सर्व सैन्याचा ॥६४॥
आणि ह्मणे गा वनमाळी ॥ माझी इच्छा पूर्ण जाहली ॥ आतां स्वर्गीं जाईन सांभाळीं ॥ दातृत्व आपुलें ॥६५॥
देवें सुत्र आकर्षिलें ॥ जीवन कढोनियां घेतलें ॥ बभ्रूनें कलेवर सांडिलें ॥ गेला इंद्रलोकीं ॥६६॥
मग त्यांतें सस्कारोनी ॥ पार्थें उत्तरकर्म सारोनी ॥ येते जाहले रणस्थानीं ॥ तंव नवल वर्तलें ॥६७॥
अर्जुनासि ह्मणे कृष्ण ॥ पैल गजघंटा येई घेवोन ॥ येरु जंव आणी उचलोन ॥ तंव लांवी उडोनि गेली ॥६८॥
पाहे तंव अंडीं देखिलीं ॥ मग कृष्णासि स्थिती पुसली ॥ कीं हे युद्धाआंत वांचली ॥ कैसी देवा ॥६९॥
यावरी ह्मणे चक्रपाणी ॥ हे सर्वही माझी करणी ॥ अगा तूं तरी कां जाणोनी ॥ होसी अज्ञ ॥७०॥
जेणें ऐसिया रणखळ्यांत ॥ लावी वांचविली अंड्यासहित ॥ हस्तिघंटेनें निभ्रांत झांकिली पाहें ॥७१॥
तिये मागुती वांचवाया ॥ घंटा काढविली धनंजया ॥ तैसें तुह्मं वांचविलें म्यां ॥ मारोनि अठरा अक्षौहिणी ॥७२॥
मदनादि यादव समस्त ॥ धाडिले पूर्वस्थळीं नेमस्त ॥ पांचाळां दुर्योधनाशिबिरांत ॥ उतरविलें कार्यार्थें ॥७३॥
तुज विश्वरूप दाविलें ॥ तैं सर्व मारिले ह्मणितलें ॥ तुजसी निमित्तमात्र केलें ॥ तें आठवी सव्यासाची ॥७४॥
माझे व्यक्ताव्यक्त गुणधर्म ॥ जाणती ज्ञानिये सवर्म ॥ हें ऐकोनि सांडिला भ्रम ॥ धनंजयें देखा ॥७५॥
करी स्तुती जोडोनि कर ॥ ह्मणे नकळे तुझें चरित्र ॥ तूंचि होवोनि सुत्रधार ॥ खेळविशीं बाहुलीं ॥७६॥
ऐसा पार्थगर्व हरोनी ॥ बभ्रूचें कार्य संपादोनी ॥ आले पार्थचक्रपाणी ॥ धर्माजवळी ॥७७॥
क्षेमालिंगन दीधलें ॥ सर्व वृत्तांता सांगीतलें ॥ तंव येक नवल जाहलें ॥ ऐकें जन्मेजया ॥७८॥
करीन पांडवगर्भघात ॥ हें बोलिला होता द्रोणसुत ॥ तदनु उत्तर द्शेसि जपत ॥ मंत्र द्रौणी ॥७९॥
तेणें ब्रह्मशिरास्त्र चेतवलें ॥ वन्हिज्वाळीं कडाडिलें ॥ गर्भपाडावया आलें ॥ उत्तरेचा ॥८०॥
तें येरां न दिसे न भासे ॥ परि गुर्विनीसि दिसे भासे ॥ मंत्रशक्ती असे विशेषें ॥ अद्दष्टरूप ॥८१॥
तंव तेसमयीं श्रीपती ॥ सभे धर्मादिकांप्रती ॥ जावयालागीं द्वारावती ॥ आज्ञा मागता जाहला ॥८२॥
तैं कुंतीप्रमुख समस्तीं ॥ नानापरी केली स्तुती ॥ ते सांगतां विप्तत्ती ॥ विस्तारले ग्रंथ ॥८३॥
मग रथ संजोगिला ॥ देवो बैसावया गेला ॥ तंव शोक आयकिला ॥ उत्तरेचा ॥८४॥
ते अभिमन्याची राणी ॥ सहामासांची गुर्विणी ॥ ह्मणे रक्ष गा चक्रपाणी ॥ उदरीं गर्भा ॥८५॥
नानाकरुणा भाकोनी ॥ देव स्तविला दीनवदनीं ॥ तंव श्रीकृष्ण ह्मणे झणी ॥ न करीं शोक बाळे ॥८६॥
तुझें संकट समग्र ॥ मज निवारणीय निर्धार ॥ ह्मणोनियां घातलें चक्र ॥ अद्दश्य उदरीं ॥८७॥
तेणें द्रौण्यस्त्राचें तेज समस्त ॥ आलें होतें जे उदरांत ॥ तें निवारलें त्वरित ॥ करोनि शीतळता ॥८८॥
तेथें शस्त्र सुदर्शन ॥ परिक्षितीसि जाहलें रक्षण ॥ वांचला नवमास संपूर्ण ॥ सामर्थ्यें कृष्णाचेनी ॥८९॥
परि मृतगर्भ जन्मेल ॥ मागुता श्रीकृष्ण उठवील ॥ ते कथा सांगिजेल ॥ पुढिले अन्वयी ॥९०॥
गर्भी गुंतलेंसे चक्र ॥ आणि धांवा ऐकोनि थोर ॥ तेथेंचि राहिला कृपाकार ॥ पांडवांजवळी ॥९१॥
ऐसें पुराणांतरीं असे ॥ परि संस्कृतभारतीं नसे ॥ हें स्त्रीपर्व येथें विशेषें ॥ कथिलें संकलोनी ॥९२॥
वैशंपायन ह्मणती भारता ॥ श्रीहरीकथा गातां ऐकतां ॥ पावन होती श्रोतावक्ता ॥ पदप्रसंगीं ॥९३॥
श्रीहरीचे वर्णिता गुण ॥ संकटां दोषां होय दहन ॥ तेथें ब्रह्माशिरास्त्राचें कारण ॥ उरे केवीं ॥९४॥
कलियुगीं साधन मुख्यतः ॥ सांदर परिसिजे हरिकथा ॥ तेणें वैकुंठपद योग्यता ॥ पाविजे मनुजें ॥९५॥
सदा सर्वदा कीर्तन कीजे ॥ नवविधा भुक्ति मेळविजे ॥ तेणें सकळ दुःखें विसरिजे ॥ भारता गा ॥९६॥
॥ श्लोकः ॥
श्रवणं कीर्तन विष्णोः स्मरणं पादसेवनम् ॥ वंदनं अर्चनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् ॥१॥
राया तुझिये सुखसंगतीं ॥ मज जोडली ईश्वरभक्ती ॥ जेणें कैवल्यपदप्राप्ती ॥ होइजे सहजें ॥९७॥
अकरा ब्राह्मण उठोनि तेथ ॥ रायासि आशिर्वाद देत ॥ वस्त्र उजळलें अकरा हात ॥ तैसेंचि कुष्टही हरपलें ॥९८॥
सानंद होवोनि जन्मेजय ॥ ह्मणे तूं तारक मुनिराय ॥ माझिये पातकांचा क्षय ॥ केला तुवां ॥९९॥
आतां असो हा येथ प्रश्न ॥ द्वादशस्तबक जाहल संपूर्ण ॥ आणि एकादशपर्वाख्यान ॥ संपलें येथोनी ॥१००॥
पुराणगाथा महोदधी ॥ त्याचा विस्तार अनंतभेदीं ॥ तो वणवें केविं शब्दीं ॥ एकाननें ॥१॥
परि स्फुरविलें सर्वेश्वरें ॥ तींचि येथें लिहिली उत्तरें ॥ आणीक असती अपारें ॥ जीं अश्रुत मजलागीं ॥२॥
पूर्वील काळीं ऋषिजनीं ॥ जें गाइलें नानापुराणीं ॥ तेंचि येथें संग्रहोनी ॥ रचिली ग्रंथ ॥३॥
मज उपसितां शब्दसिंधु ॥ राहिला असेल पदबिंदु ॥ तये अपराधाचा बाधू ॥ श्रोताजनीं न कीजे ॥४॥
संख्या वाढेल कल्पतरूची ॥ ह्मणोनि कथिलें सारसारजी ॥ श्रोतयां उपजावया रुची ॥ केला संग्रहो ॥५॥
ताभ्रगोळा मूळ संस्कृत ॥ त्याचें पात्र घडिलें प्राकृत ॥ अज्ञानजडजीवोद्धरणार्थ ॥ नामनौका रचियेली ॥६॥
प्रद्युम्राचे ज्येष्ठकुमरें ॥ बहिरामश्याह नृपवरें ॥ आज्ञा दीधली ह्मणोनि आधारें ॥ रचिला ग्रंथ ॥७॥
तया रायाचे सभेआंत ॥ चतुःशास्त्रवेत्तें पंडित ॥ पुराणचर्चा अखंडित ॥ असे जयांसी ॥८॥
म्यां तयांचे आज्ञाधारें ॥ ग्रंथ रचिला मतांतरें ॥ हें करविलें सर्वेश्वरें ॥ मज रंकाकरवीं ॥९॥
माझी केतुली ती मती ॥ कीं अभिमानें बोलवें ग्रंथीं ॥ परि श्रवणमात्रें हरिभक्ती ॥ उपजे ज्ञानवैराग्य ॥११०॥
अनंतशास्त्रें पुराणमतें ॥ वेदाधारें ऋषिप्रणितें ॥ सकळांचे आद्यंतातें ॥ पावे ऐसा कोणी नसे ॥११॥
कृष्णयाज्ञवल्कियें मार्ग दाविला ॥ तोचि म्यां पुढें चालविला ॥ अष्टमस्तवकापासोनि मांडिला ॥ कथाकल्पतरू ॥१२॥
कविमधुकरें कृपाळा ॥ प्रेमें स्तवोनि श्रीगोपाळा ॥ द्वादशस्तबक संपविला ॥ ह्मणे मधुकरकवी ॥१३॥
इति श्रीकथाकल्पतरू ॥ द्वादशस्तबक मनोहरू ॥ स्त्रीपर्वसमाप्तिप्रकारू ॥ अष्टमाऽध्यायीं कथियेला ॥११४॥
स्तबक ओंव्या संख्या ॥८७३॥
॥ शुभंभवतु ॥
॥ इति श्रीकथाकल्पतरौ द्वादशस्तबकः समाप्त ॥