कथाकल्पतरू - स्तबक १२ - अध्याय ७

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥

मग विनवी जन्मेजयो ॥ सांगा पुढील कैसा भावो ॥ तंव ह्मणे मुनिरावो ॥ ऐकें भारता ॥१॥

सर्वही कुरुक्षेत्रीं पातलें ॥ रणीं पडलियां देखिलें ॥ करूणारसें वोसंडले ॥ विलाप करितां ॥२॥

तयेवेळीं कृष्णाप्रती ॥ बोलती जाहली माता कुंती ॥ तें ऐकावें दत्तचित्ती ॥ अनुक्रमेंसीं ॥३॥

अगा हें कौरवपांडवरण ॥ भीष्मद्रोण कर्ण अभिमन्य ॥ द्रुपद शल्यादि बंधुजन ॥ येथें झुंजते जाहले ॥४॥

सुवर्णकवचीं जडितरन्तीं ॥ समग्र शस्त्रास्त्रें धरोनी ॥ झुंजतां शेखीं पडिले रणीं ॥ पांचाळादिक ॥५॥

कृष्णा येणें शोक अत्यंत ॥ मी अंतरी असें पीडित ॥ भूते पक्षी श्वापदें वोढित ॥ असती प्रेतां ॥६॥

पांडवांचा कोपाग्नी ॥ शांत जाहला क्षयजीवनीं ॥ भक्षिताती सर्व प्राणी ॥ रणीं पतितां ॥७॥

देवा कौरवांच्या कांता ॥ रुदन करिती समस्ता ॥ रक्तमांसें पूर्णता ॥ जाहली मेदिनी ॥८॥

या धृतराष्ट्राचिया सुना ॥ आकोशें करिती रोदना ॥ तेणें थोर दुःख कृष्णा ॥ होतें मानसीं ॥९॥

माझी पूर्वपापें सर्वत्रीं ॥ वाटे आजि देखिलीं नेत्रीं ॥ त्राहीं त्राहीं गा श्रीहरी ॥ वोखटा संसार ॥१०॥

वैशंपायन ह्मणती राया ॥ ऐसा शोक केला कुंतियां ॥ देखिला गांधारियां ॥ दुर्योधन ॥११॥

उलथोनि कलथोनि पाहिला ॥ तंव चोळणा रुधिरें भरला ॥ ऐसा बीभत्स देखिला ॥ केला हाहाःकार ॥१२॥

आळवी धाय मोकलोनी ॥ अश्रुपातें वाहें नयनीं ॥ जैसी सरितां जीवनीं ॥ वर्षाकाळीं ॥१३॥

शोक करोनि नानापरी ॥ मग ह्मणे गा श्रीहरीं ॥ कैसा क्षय जाहला समरीं ॥ तंव देवो बोलिला ॥१४॥

जेथें धर्म तेथें जय ॥ जेथें अधर्म तेथें अपाय ॥ ह्मणोनि शोक करूंनये ॥ पाहें विचारोनी ॥१५॥

स्थैर्य ह्मणे गांधारी ॥ मी हतपुत्रा शोक नकरीं ॥ काळ विपरित जाहला परि ॥ नशमे दुःखमरितें ॥१६॥

जे पहुडोनि पलंगावरी ॥ सुख भोगिती निरंतरीं ॥ ते पडिले पृथ्वीवरी ॥ होवोनि प्रेतें ॥१७॥

अंगीं चर्चोनियां चंदनें ॥ स्त्रिया वाळेयाचे विंजणे ॥ घेवोनि वीजिती ज्यां कारणें ॥ ते धूळीनें माखले ॥१८॥

आणि ह्मणे गा पाहें कृष्णा ॥ भीमें मारिलें दुर्योधना ॥ अकराअक्षौहिणी सेना ॥ नाशा आजी पावली ॥१९॥

जो दुर्योधन रत्‍नपलंगी ॥ निद्रा करी अष्टभोगीं ॥ पत्‍नी भानुमती तन्वंगी ॥ तो रक्तधूळीं भरलासे ॥२०॥

कैसा विपरित जाहला काळ ॥ सिंहें मारिला शार्दूळ ॥ नायकोनि वृद्धबोल ॥ पावला अपमृत्यु हा ॥२१॥

निःकंटक तेरा वरुषें ॥ येणें राज्य केलें असे ॥ ऐसा शोक नानाआक्रोशें ॥ केला गांधारियां ॥२२॥

ह्मणे दुर्योधनाचे केश ॥ पाहें दीर्घ काळे विशेष ॥ शोभती जघनप्रदेश बहुवस ॥ सर्वावयवीं ॥२३॥

जैसी मदनमाता रुक्मिणी ॥ तुवां पाळिली चक्रपाणी ॥ तैसीच लक्ष्मणाची जननी ॥ पाळिली दुर्योधनें ॥२४॥

ते भानुमती शोकाक्रांत ॥ पाहें कैसी आहे लोळत ॥ भ्रतारमुखा अवलोकित ॥ दीनवदना ॥२५॥

माझे शतपुत्र मारिले ॥ हें दुःख थोर जाहलें ॥ त्याचिया स्त्रिया पदतळें ॥ पाहें चालताती ॥२६॥

रुधिरें भरलीं असे क्षिती ॥ प्रेतें पक्षीश्वापदें ओढिती ॥ बांधवपुत्रांचिया युवती ॥ करिती आक्रोश ॥२७॥

कृष्णा चातुरंग पडिलें ॥ माजी शोधिती पति आपुले ॥ येकींच्या हातीं लाधले ॥ त्या तेथेंचि रडताती ॥२८॥

येकींचे पती दिसत नाहीं ॥ पशुपक्ष्यांनी खादले काई ॥ तिया लोळताति पाहीं ॥ न दिसती ह्मणोनी ॥२९॥

जिया मंजुळ बोलताती ॥ तिया शंखध्वनि करिती ॥ पक्ष छेदोनि भ्रमरी पडती ॥ तैशा पडियेल्या ॥३०॥

मुखें चंद्राचिये समानें ॥ कमलपत्रापरीं नयनें ॥ तिया रहितरूपलावण्यें ॥ दिसती बीमत्स ॥३१॥

अरे या स्त्रियांचेनि शोकें ॥ ब्रह्मांड फुटूं पाहें दुःखें ॥ इतुक्यांत दुःशासन देखे ॥ पडिला छिन्नभिन्न ॥३२॥

ह्मणे वैराचें उसणें अनंता ॥ हा दःशासन स्वयें घेतां ॥ तोहीं भीमें मारिला निरुता ॥ जैसा सिंहें कुंजर ॥३३॥

जेणें गांजिली द्रौपदी ॥ तो माखलासे अशुद्धीं ॥ जयाचे दोनी बाहु युद्धीं ॥ तुटोनि पडिले ॥३४॥

बहुतकोपें वृकोदर ॥ याचें प्याला असे रुधिर ॥ उचंबळला शोकसागर ॥ उमींगर्जनाकोल्हाळें ॥३५॥

गांधारी ह्मणे गा कृष्णा ॥ भीमें मारिलें दुर्योधना ॥ पडिला रणांगणीं उताणा ॥ परि कैसा शोभतसे ॥३६॥

जैसा पूर्णचंद्र दिसे ॥ तैसें मुख शोभत‍असे ॥ हा चित्रसेन विशेषें ॥ पडिला रणीं ॥३७॥

ज्याचिये पुढें शत्रुसेना ॥ उभी राहूं न शके कृष्णा ॥ तो पडिला असे उताणा ॥ दुर्योधनाजवळी ॥३८॥

जेवीं गंधर्व सेविजे अप्सरीं ॥ कीं देवांगनीं भंगनेत्री ॥ तेवीं दुर्योधन लावण्यनारीं ॥ सेव्यमान ॥३९॥

जैसा अग्निदीप्त गिरिवर ॥ तैसा माझा पुत्र गांधार ॥ त्याचा भीमें केला संहार ॥ गदारूपी उदकवृष्टीं ॥४०॥

गांधारी ह्मणे रे श्रीहरी ॥ जो गजें सिंहापरी ॥ तो दाशार्हरावो समरीं ॥ पडिला नारायणाख्य ॥४१॥

नवकोटी नारायण ॥ ज्याचें असंख्य असे सैन्य ॥ तें सकळही पावलें निधन ॥ मत्पुत्रसेवक ॥४२॥

अरे कृष्ण इकडे पाहें ॥ हा अभिमान्यु मारिला आहे ॥ छिन्नभिन्न त्याची काय ॥ दिसे अशोभ्य ॥४३॥

पाहें हे बिराटराजसुत ॥ गेली तयाचे समीपता ॥ मार्जन करीतसे प्रेता ॥ आपुले पतीचे ॥४४॥

ते सौभद्राचें मुख ॥ अवघ्राण करिते देख ॥ सुंदररूप अलोलिक ॥ मदनमूर्ती ॥४५॥

मदनशरें व्यापिन्नली ॥ पाहें लज्जेतें अतिक्रमली ॥ पतिकवचा फेडूं लागली ॥ मोहास्तव ॥४६॥

ह्मणे ऐसा कमलयन ॥ कौरवीं मारिला एकवटोन ॥ जयाचे गजशुंडे समान ॥ दोनी हस्त ॥४७॥

पाहें हात पसरोनि पडिला ॥ तो उत्तरेनें आलिंगिला ॥ ह्मणे प्रिया कां धरिला ॥ ऐसा करी विलाप ॥४८॥

ह्मणे सुभद्रा तुझी जननी ॥ आणि मी पढियंती कामिनी ॥ या दोघीतें सांडोनी ॥ कोठें जासी प्राणेश्वरा ॥४९॥

त्याचे केश रक्तें भरले ॥ तो धूवोनि उत्संगी घेतले ॥ कैसें मुखचुंबन केलें ॥ जिवंताच्यापरी ॥५०॥

ह्मणे पांडवपांचाळां देखतां ॥ तुज पाडिलें प्राणनाथा ॥ कैसी वांचेल पंडुकांता ॥ तुझेनि दुःखें ॥५१॥

तूं क्षात्रधर्मेंकरोनी ॥ पावलासि स्वर्गभुवनीं ॥ आतां मी देहपात करोनी ॥ येईन तुजसवें ॥५२॥

तूतें टाकोनियां आतां ॥ कैसी वांचेन प्राणनाथा ॥ मज दीनवदनेचें वृथा ॥ गेलें जीवित ॥५३॥

सहा मास वर्‍हाडासी ॥ जाहले तोंचि तूं आह्मासी ॥ सांडोनियां स्वर्गलोकासी ॥ गेलासि कैसा ॥५४॥

शिवशिव हे जगन्निवासा ॥ कां पाडिलें ऐशा वळसां ॥ अरे सौभद्रा राजसा ॥ देई साद ॥५५॥

ऐसे उतरेचे विलाप ॥ म्यां ऐकोनियां अमूप ॥ देहीं उपनला परिताप ॥ हृदय उलतसे ॥५६॥

हा विराट पडिला समरीं ॥ विलाप करिती त्याच्या नारी ॥ पक्षीश्वापदें नानापरी ॥ ओढिती प्रेतें ॥५७॥

स्त्रिया विराटा आलिंगोनी ॥ विवर्णा रुदती कामिनी ॥ पाहेंपाहें चक्रपणी ॥ दुःसह दूःख ययांचें ॥५८॥

उत्तर सौभद्र सुदक्षिण ॥ लक्ष्मणादि राजनंदन ॥ राये राणे बंधुजन ॥ ससैन्यें पडिले ॥५९॥

त्यांचिया सकळ कामिनी ॥ हतभर्तृका रुदती रणीं ॥ पाहेंपाहें चक्रपाणी ॥ ह्मणे गांधारी ॥६०॥

येरीकडे हा पाहें कर्ण ॥ महाबळिया अग्निसमान ॥ जेणें बहुतांचा घेतला प्राण ॥ तया पार्थें पाडिलें ॥६१॥

जयाचेनि वीर्यबळें ॥ सकळ पांडव त्रास पावले ॥ माझे पुत्र झुंजिन्नले ॥ जयाचेनि आधारें ॥६२॥

जेवीं सिंहें मारिजे हस्ती ॥ तेवीं कर्ण पडिला क्षिती ॥ पाहें तयाचिया युवती ॥ करिती कोल्हाळ ॥६३॥

अगा कर्दळीचिया परी ॥ सकळ लोळती धरणीवरी ॥ तो पार्थे पाडिला समरीं ॥ कृष्णा तुझिये साह्यत्वें ॥६४॥

जेवीं कृष्णापक्षीं चतुर्दशीसी ॥ कळाहीन दिसे शशी ॥ तैसी विकळता कर्नासी ॥ जाहली प्राप्त ॥६५॥

मग धाय मोकलोनियां ॥ ह्मणे कर्णा माझ्या तान्हुल्या ॥ तुं क्षात्रधर्म करोनियां ॥ गेलासि सूर्यलोकीं ॥६६॥

तुझेनीचि बळविचारें ॥ येवढें आदरिलें गांधारें ॥ तेणें पांडवो वनांतरें ॥ लंघवियेलीं ॥६७॥

तो तूं आजि पडीलासि रणीं ॥ आतां तुज कैं देखों नयनीं ॥ ह्मणोनि अंग घाली धरणी ॥ परमदूःखें ॥६८॥

तिये उठविलें यदुरायें ॥ येरीं बैसोनि कर्णमुख पाहे ॥ मग पाहिलें सतीयें ॥ जयद्रथासी ॥६९॥

ह्मणे पाहें हा ममजामात ॥ जो सर्वलक्षनमंडित ॥ तो पडिला होवोनि प्रेत ॥ रणामाजी ॥७०॥

सिंधुसौवीरगांधार ॥ कांबोज यवन नृपवर ॥ ऐसे सकळ पडिले वीर ॥ मित्र आप्तादी ॥७१॥

माझ्या कन्या सुना सखिया ॥ सकळही वीरांच्या स्त्रिया ॥ अनीश्वरा विधवा जालिया ॥ दुःसहदुःखें ॥७२॥

येरीकडे हा पाहें शल्य ॥ नकुळसहदेवांचा मातुळ ॥ तो मारिला सहदळ ॥ धर्मरायें ॥७३॥

कृष्णा तुजसीं अभिमान करी ॥ तो हा मद्र पडिला समरीं ॥ नव्हें कृतपुत्र दुराचारी ॥ हा जयद्रथ जांवई ॥७४॥

तैसाचि हा पर्वतस्वामी ॥ भगदत्तवीर पराक्रमी ॥ गजदळासहित भूमीं ॥ ग्रस्तजाहला ॥७५॥

ज्यासी रुक्मरूपी माळ ॥ कंठीं शोभे सोज्वळ ॥ त्यासी भक्षिती वेळाउळ ॥ काकादि पक्षी ॥७६॥

जैसें इंद्रा आणि बळीसी ॥ युद्ध जाहलें परमावेशीं ॥ तैसें घोरांदर पार्थेंसीं ॥ केलें येणें ॥७७॥

दुजा नाहीं ज्या समान ॥ तैसा प्रत्यक्ष चंडकिरण ॥ तो पार्थें पाडिला गंगानंदन ॥ शिखंडी पुढें करोनी ॥७८॥

युगांतीं पडे सूर्य जैसा ॥ शरपंजरी पडिला तैसा ॥ पाहें कैसें हृषीकेशा ॥ जाहलें अखर ॥७९॥

जया तुल्य विद्यावंत ॥ नाहीं यया त्रैलोक्यांत ॥ तो हा द्रोणाचार्य येथ ॥ घृष्टद्युम्रें मारिला ॥८०॥

जेवीं परशरामावतार ॥ तेवीं द्रोणगुरु महावीर ॥ तयाचाही केला संहार ॥ धर्में संदिग्ध बोलोनी ॥८१॥

अरे अद्यापि द्रोण पाहें ॥ जीवंतचि कीं दिसत आहे ॥ कृपी रुदतसे हायहाय ॥ दूःखें करोनी ॥८२॥

तयेलागीं पुढें करोनी ॥ पाहें ब्राह्मण आले घेवोनी ॥ ते मुरडले गंगेहूनी ॥ येरी ये स्थानीं लोळतसे ॥८३॥

कृष्णा पाहें हा सोमदत्त ॥ याचा युयुधानें केला घात ॥ महावीर बळिवंत ॥ तयां पक्षी तोडिती ॥८४॥

पडिला यूपध्वज वीर ॥ त्याचिया स्त्रिया रडती फार ॥ कोल्हाळें करिती गजर ॥ पतिप्रेता पाहोनी ॥८५॥

अरे जाहला सर्व संहार ॥ प्रवर्तला बीभत्सवीर ॥ तयामाजी करुणापूर ॥ चालिला उमडोनी ॥८६॥

अर्जुन आणि सात्विक ॥ यांहिं अयुक्त केलें एक ॥ हस्त तोडोनियां देख ॥ मारिला भूरिश्रवा ॥८७॥

शकुनिया वीर सबळ ॥ तो सहदेवें मारिला मातुळ ॥ पाहें पक्षियांचा कोल्हाळ ॥ होतो त्यावरी ॥८८॥

जो स्वरूपें शतसहस्त्र ॥ धरी मायारुपें अपार ॥ तो पांडवतेज‍अंगार ॥ घटोत्कच पडियेला ॥८९॥

गांधारी ह्मणे गोपाळा ॥ हा ससैन्य कांबोज पडिला ॥ देखोनि उचंबळो उठिला ॥ तत्कांतांसी ॥९०॥

कलिंगराजा पडिला भूमीं ॥ जो मागधदेशाचा स्वामी ॥ जाहला जयसेन संग्रामीं ॥ खंडविखंड ॥९१॥

पाहें पांडवांचें वीर ॥ द्रोणे पाडिले अपार ॥ हे धृष्टद्युम्नाचे कुमर ॥ तथा आणिकांज रायांचे ॥९२॥

हा द्रोणाचार्यें द्रुपद ॥ रणीं मारिला महाजोघ ॥ जैसा झाडिजे गजमद ॥ सिंहें अंगप्रौढीं ॥९३॥

तयाचिया दीन स्त्रिया ॥ महावीरांचिया भार्या ॥ पाहें पां येथें अवघिया ॥ कोल्हाळ करिती ॥९४॥

धृष्टकेतु महाक्रोधी ॥ तो द्रोणें पाडिला युद्धीं ॥ जेवीं उन्मळोनियां नदी ॥ पाडी तरुवरां ॥९५॥

तैसाचि द्रोणास्त्रें चेदिपती ॥ पाडिला आहे पाहें क्षितीं ॥ आणि बहुवीरांची शांती ॥ केली धृष्टकेतूनें ॥९६॥

मग स्वयें मृत्यु पावला ॥ पक्षीश्वापदीं देह ओढिला ॥ चेदिराज वीर भला ॥ नातु दाशार्हाचा ॥९७॥

ययांचिया सकळ स्त्रिया ॥ पाहें शोकाब्धींत बुडालिया ॥ मेले दुर्योधनकार्या ॥ भ्रतार ज्यांचे ॥९८॥

ममपुत्रांतें सांढोनी ॥ दुरी गेले नाहीं कवणी ॥ लक्ष्मणदि पुत्र रणीं ॥ प्रेतें होवोनि पडियेले ॥९९॥

अरे आमुचे वीर आहवीं ॥ केवीं मारुं शकिजे पांडवीं ॥ परि हे करणी आघवी ॥ तुझीच कृष्णा ॥१००॥

तूं पांडवां साह्य होवोन ॥ द्रोण कर्ण दुर्योधन ॥ शल्य जयद्रथ विकर्ण ॥ सोमदत्तादी ॥१॥

हे मारविले अनेक ॥ जे देवां अजेय देख ॥ आह्मां काळ जाहला विमुख ॥ बोल कवणा ठेवावा ॥२॥

भीष्माचार्यें विदुरें समग्रु ॥ मज पूर्वीच कथिला विचारू ॥ कीं तूं स्नेह नको करूं ॥ पुत्रांच्या ठायीं ॥३॥

आतां काळाग्नींत समस्ता ॥ भस्म जाहले माझे सुत ॥ तये शोकसमुद्रीं बुडत ॥ असे मी वासुदेवा ॥४॥

ऐसें गुण नानपरी ॥ स्वयें उच्चारोनि गांधारी ॥ विव्हळ होवोनि भूमीवरी ॥ पडिली शोकाक्रांत ॥५॥

क्षणैक राहे कोपें करोनी ॥ मग ह्मणे रे चक्रपाणी ॥ तुवंचि मारविले रणीं ॥ सकळवीर ॥६॥

परस्परें वैर रचिलें ॥ तैसेंचि हें प्रत्यया आलें ॥ माझे अंतरीं जाळ उठिले ॥ न शमे शोक ॥७॥

तरी आतां शापीन तूतें ॥ ऐसें ह्मणितलें कृष्णातें ॥ तें पुढें ऐकें निरुते ॥ जन्मेजया गा ॥८॥

ह्मणे त्वां मारविलें आमुचेयांसी तैसेंचि हावो तवज्ञातीसी ॥ आजपासोनि छत्तीसवर्षीं ॥ हतज्ञाति पुत्र अमात्य तूं ॥९॥

वनचरें कुत्सित होसील ॥ आत्मघात पावसील ॥ सकळही स्त्रिया रुदतील ॥ आमुच्यापरी ॥११०॥

वैशंपायन ह्मणती राया ॥ ऐसें शापिलें गांधारियां ॥ तंव श्रीकृष्ण हांसोनियां ॥ बोले पतिव्रतेसी ॥११॥

अहो माते जाणतेसी ॥ जैसें जाहलें कौरवांसी ॥ तैसेंच दैवयोगें वृष्णीसी ॥ होईल सत्य ॥१२॥

मजवीण वृष्णिचक्राचा ॥ संहार कर्ता दुजा कैंचा ॥ मी अवघ्य असें साचा ॥ देवां दानवां पन्नगां ॥१३॥

आणि सर्वत्र अजेम अमर ॥ यादववीर असती समग्र ॥ ह्मणोनि परस्पर होईल संहार ॥ माझेचि कर्तुत्वें ॥१४॥

ऐसें उभयोक्त ऐकिलें ॥ पांडव भूमिये पडिले ॥ परि ते देवें उठविले ॥ संबोखोनी ॥१५॥

ययाउपरी गांधारीसी ॥ बोलता जाहला हृषीकेशी ॥ ह्मणे ऐकें माते मानसीं ॥ न करीं शोक ॥१६॥

तुझेनि अपराधें करोनी ॥ सकळ वीर पडिले रणीं ॥ त्वां गांधाराचा लोभ धरोनी ॥ वृद्धवाक्य सांडिलें ॥१७॥

स्न्रेहमोहें आपुल्यांसी ॥ अज्ञानपणें न शिकविसी ॥ माझ्याठायीं आरोपिसी ॥ आपुला दोष ॥१८॥

गेले मेले नष्ट जाहले ॥ तेथें कवणाचें काय चाले ॥ प्राणी पापपुण्यार्जित फळें ॥ पाविजती प्राप्तकाळीं ॥१९॥

जो जैसें आचरे प्राणी ॥ तो तैसें पावे निर्वाणीं ॥ येथ आमुची कापट्यकरणी ॥ आरोपिसी वृथा ॥१२०॥

पाहें ब्राह्मणी गर्भ धरिते ॥ शमदमादि साधनें वर्तते ॥ तोचि तत्पुत्रा धर्म निरुतें ॥ प्राप्त होय ॥२१॥

पशुपाळण वणिक्कन्येसी ॥ संगोपन करिते वैश्यी ॥ तेंचि कर्म पुढें पुत्रासी ॥ तिचिये देखा ॥२२॥

शृद्री दास्यपण करी ॥ तैसाचि तत्पुत्र अवधारीं ॥ आणि क्षत्रियरायाची कुमरी ॥ युद्धीं उदित ॥२३॥

मातृपितरांचें आचरण होय ॥ तैसेंचि पुत्राचे कर्म पाहें ॥ ह्मणोनि याचें नवल नोहे ॥ उठें गांधारीये ॥२४॥

ऐसें कृष्णवाक्य ऐकोनी ॥ गांधारी बैसली उठोनी ॥ दुःखें राहिली मौन धरोनी ॥ दीनवदना ॥२५॥

परि अनारिसें ग्रंथांतरी ॥ दुःखें पीडलिया गांधारी ॥ ते उठवितां नानापरी ॥ उठेचिना ॥२६॥

अवघे पांडव भागले ॥ अंधादिकही शीणले ॥ विदुरादि ज्ञाते श्रमले ॥ उठवितां नानापरीं ॥२७॥

सकळवीरांच्या कामिनी ॥ तियेची अवस्था देखोनी ॥ आल्या पतिदुःख सांडोनी ॥ उठवावया ॥२८॥

परि तो नुठेचि गांधारी ॥ निचेष्टित पडिली धरत्रीं ॥ यावरी बोलिला श्रीहरी ॥ समस्तांसी ॥२९॥

ह्मणे माझें ह्मणितलें करावें ॥ इयेसि येथेंचि सांडावें ॥ नावेंक पैलस्थळीं जावें ॥ मग पाहों कौतुक ॥१३०॥

ऐकोनि अवघे गेले दूरी ॥ मग काय केलें श्रीहरीं ॥ ते ऐका नवलपरी ॥ सावधानें ॥३१॥

गांधारीं दूःखें पीडित ॥ तंव क्षुधा लागली अद्भुत ॥ चहूं भोंवती पाहत ॥ परि कोणी दिसेना ॥३२॥

मग उठोनि रणाआंत ॥ कांही भक्षावया पाहत ॥ तंव देखिला अकस्मात ॥ वृक्ष आंबियाचा ॥३३॥

तयावरुतें जंव पाहे ॥ तंव पक्कफळीं लवत आहे ॥ ह्मणोनि तोडावया जाय ॥ परि हात पावेना ॥३४॥

गज पडिले होते खालीं ॥ तयांवरी उभी राहिली ॥ हात घातला पक्कफळीं ॥ तरीही नपवे ॥३५॥

मग पुत्रांचीं कलेवरें ॥ उचलोनियां आणिलीं त्वरें ॥ तीं मांडिलीं परस्परें ॥ वरिच्यावरी ॥३६॥

तयांवरी उभी राहिली ॥ पुनः हात घातला फळीं ॥ इतुक्यांत प्रकटला वनमाळी ॥ हास्य करित ॥३७॥

ह्मणे लाज धरीं पतिव्रते ॥ हें काय मांडिलें भलतें ॥ कां सांडिलें शोकदःखातें ॥ कवणें तूतें उठविलें ॥३८॥

येरी लज्जाउमान जाहली ॥ अधोवदनें बोलू लागली ॥ कृष्णा क्षुधा थोर लागलीं ॥ तियें मातें उठविलें ॥३९॥

॥ श्लोकः ॥

या सुस्थैर्यविनाशिनी क्षयकरी कामस्य निर्नाशिनी दंडाकारकरी बलप्रमथिनी शीलव्रतध्वंसिनी ॥

योषिद्दंधुविशेषविग्रहकरी सर्वार्थसंमोहिनी सा मां बाधति पंचमूतदमदनी लोके प्रसिद्धा क्षुधा ॥१॥

ऐसें ऐकोनि ह्मणे हरी ॥ स्वांगुष्ठ घालीं हो विक्रीं ॥ मग निक्षेपितां येरीं ॥ तंव द्रवलें अमृत ॥१४०॥

तृप्तीनें ढेंकर दीधला ॥ आम्रवृक्ष अदृश्य जाहला ॥ आणि श्रीकृष्णाही गेला ॥ पांडवांजवळी ॥४१॥

अवघीं बोलावोनि आणिलीं ॥ तंव गांधारी तयांजवळी ॥ जावोनि बैसली उगली ॥ सांडोनी शोकमोह ॥४२॥

हें पुराणांतरीं असे ॥ परि संस्कृतमारतीं नसे ॥ पुढें अग्रस्त्रीपर्व विशेषें ॥ सांगेल कवि मधुकर ॥४३॥

इति श्रीकथाकल्पतरू ॥ द्वादशस्तबक मनोहरू ॥ गांधारीशोकशमनप्रकारू ॥ सप्तमाऽध्यायीं कथियेला ॥१४४॥

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP