कथाकल्पतरू - स्तबक १२ - अध्याय ३

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥

मुनीसि ह्मणे जन्मेजयो ॥ सांगा अग्रकथान्वयो ॥ येरू ह्मणे ऐकें संजयो ॥ सांगे अंधासी ॥१॥

ते कृपकृतवर्मा द्रौणी ॥ पांचाळ द्रौपदेयां मारोनी ॥ त्वरें आले रथ प्रेरोनी ॥ दुर्योधनाजवळी ॥२॥

किंचित् प्राण असे उरला ॥ ऐसा गांधार पाहिला ॥ रथाखालीं तये वेळां ॥ उतरले तिघे ॥३॥

भग्नगात्र रक्तें भरला ॥ बहुतीं श्वापदीं असे वेढिला ॥ तिघांसि देखतां संतोषला ॥ तये वेळीं ॥४॥

परि दुःखे रुदन केलें ॥ येरीं मुखींचें रक्त धूतलें ॥ मग परस्परें बोलिले ॥ तयासमक्ष ॥५॥

हा अकराअक्षौहिणींचा स्वामी ॥ रक्तें माखोनि लोळे भूमीं ॥ जो बलाढ्य क्षात्रधर्मी ॥ रायांमाजी अग्रगण्य ॥६॥

हे गदा जयाचे पाणीं ॥ तो भीमें पांडिला मेदिनीं ॥ क्षत्रियासि जे व्हावी निर्वाणीं ॥ ते गती जाहली ययातें ॥७॥

परि धर्मही अधर्मी पाहीं ॥ गांधारा तुझा शोक नाहीं ॥ अंधपितरें करितील काई ॥ हतपुत्र बापुडीं ॥८॥

धिक् त्या कृष्णार्जुनांचें ॥ आणि जिणें वृकोदराचें ॥ आणिका रायांसि वाचे ॥ काय ऐसें सांगतील ॥९॥

कीं बंधु मारिले समरीं ॥ हेचि थोरींव संसारीं ॥ राया धन्य माता गांधारी ॥ जियेचा पुत्र तूं पराक्रमी ॥१०॥

तुझे शतबंधु रणीं पडिले ॥ क्षात्रधर्में स्वर्गीं गेले ॥ धिक् आमुचें जियांळें ॥ राहिलों मृत्युलोकीं ॥११॥

ज्याचेनि प्रसादें सम्यक ॥ रत्‍नगृहें भोगादिक ॥ आह्मीं भोगिलीं अनेक ॥ तया शेखीं अंतरलों ॥१२॥

अगा आह्मां टाकोनि मागें ॥ पुढां करोनि चातुरंगें ॥ नाश पावोनियां वेगें ॥ जातोसि स्वर्गी ॥१३॥

आह्मां नाहीं स्वर्गभुवन ॥ तुजवांचोनि दिसतों दीन ॥ मग सांगती धृष्टद्युम्र ॥ मारिला ऐसें ॥१४॥

आह्मीं मारिलें सकळ सैन्य ॥ आणि दुसें टाकिलीं जाळोन ॥ हें स्वर्गीं सांगावें वर्तमान ॥ भीष्मद्रोणादिकांसी ॥१५॥

परि अनारिसें पुराणांतरीं ॥ पांडवांसी मारिलें रात्रीं ॥ ऐसें सांगता जाहला वक्रीं ॥ अश्वत्थामा ॥१६॥

त्यांचीं शिरें घालोनि रथीं ॥ तुज दावाया आणिलीं असती ॥ येरू संतोषें ह्मणे स्वहातीं ॥ देई शिर भीमाचें ॥१७॥

द्रौणीनें अवघीं शिरें आणिलीं ॥ रायापुढें राशीं केली ॥ शिर दीधलें तियेवेळीं ॥ भीमपुत्राचे ॥१८॥

मी धारें घेवोनि दोनी करीं ॥ त्राहाटिलें भूमीवरी ॥ तंव जाहलें क्षणाभीतरीं ॥ पिष्टप्राय ॥१९॥

हर्षाचा विषाद जाहला ॥ मग क्रोधें राव बोलिला ॥ ह्मणे असत्य प्रमाद केला ॥ कांरे आजी ॥२०॥

भीम कुंतीचे हातूनि पडिला ॥ तो पाषाणावरी आदळला ॥ तेणें पाषाण चूण जाहला ॥ बाळपणीं जयाचे ॥२१॥

त्याचें शिर चूर्ण जाहलें ॥ हें केवीं जाय साच मानिलें ॥ तुह्मीं अन्यायातें केलें ॥ मारिलीं बाळकें ॥२२॥

ग्रंथांतरीं आणिक बोली ॥ शिरें तळहातीं दडपिलीं ॥ तंव दुग्ध निघोनि चूर्ण जाहली ॥ भिजले हात ॥२३॥

ह्मणोनि कोपें विषादला ॥ ह्मणे कांरे बाळघात केला ॥ हे पांडव नव्हती जाहला ॥ प्रमाद थोर ॥२४॥

आतां न वांचवे जीवें ॥ पांडव रक्षिले वासुदेवें ॥ ते येवोनि स्वभावें ॥ मारितील तुह्मां ॥२५॥

यावरी अश्वत्थामा मागुता ॥ रायासि जाहला बोलता ॥ जी वांचविलें पंडुसुतां ॥ कुष्णें कापट्य करोनी ॥२६॥

हें मजही जाणवलें ॥ जेव्हां सौप्तिक कर्म केलें ॥ परि शिरसादृश्‍य देखिलें ॥ ऐसें जाहलें ह्मणोनि ॥२७॥

परि दुर्योधन अवधारीं ॥ म्या सर्व मारिले रात्रीं ॥ आतां उमयदळा माझारी ॥ उरलों दहाजण ॥२८॥

कौरवांकडील आह्मीं तीन ॥ पांच पांडव सात्यकी कृष्ण ॥ ऐसे तयांचे सात जण ॥ राहिले असती ॥२९॥

जरीं तूं जिवंत राहसी ॥ तरी नेत्रीं अवलोकिसी ॥ नातरी श्रवनीं ऐकसी ॥ मारूं तयांसी तिघेजण ॥३०॥

दुर्योधनें ऐसी वाणी ॥ मनःप्रिय ऐकोनी ॥ मग तयांसि आश्वासोनी ॥ बोलता जाहला ॥३१॥

अरे भीष्में द्रोणें कर्णेही ॥ जें माझें कार्य केलें नाहीं ॥ तें तुह्मीं तिघांजणांहीं ॥ आजि केलें ॥३२॥

धृष्टद्युम्न शिखंडीसहित ॥ तुह्मी मारिलेति सुप्त ॥ तुह्मां कल्याण हो बहुत ॥ पुनःसंग स्वर्गी व्हावा ॥३३॥

ऐसा हर्ष विषाद पावला ॥ मग नूष्णींभूंत जाहला ॥ शरीरापासोनि उत्क्रमला ॥ प्राण दुर्योधनाचा ॥३४॥

द्रौणी कृपादि तेथ होते ॥ ते नाथनाथ जाहले ह्मणते ॥ अंबरीं विमान जाहले पाहते ॥ विद्युत्तेजयुक्त ॥३५॥

विमानी घातला दुर्योधन ॥ व्याप्त इंद्रादि सुरगण ॥ दिव्यमाळा दिव्य आभरण ॥ श्रृंगारयुक्त ॥३६॥

साधुसाधु बोलोनी ॥ स्वर्गीं नेला सुरगणीं ॥ संजयो ह्मणे राया नयनीं ॥ देखिलें मियां ॥३७॥

वैशंपायन ह्मणती राया ॥ ऐसा पुत्रक्षय ऐकोनियां ॥ अनिवार चिंताशोक तया ॥ जाहलीं धृतराष्ट्रसी ॥३८॥

इकडे तेचि रात्रीठायीं ॥ धृष्टद्युम्नाचा सारथी पाहीं ॥ येवोनि सांगता जाहला सर्वही ॥ धर्माप्रती ॥३९॥

परि अनारिसें ग्रंथातरीं ॥ कीं सात्यकी आणि द्रुपदकुमरी ॥ जावोनि सांगती उत्तरीं ॥ श्रीकृष्णासी ॥४०॥

दुजें येक असे मत ॥ कृष्णें जैं नेले पंडुसुत ॥ तेव्हां पांचाळीसहित ॥ गेला गोविंद ॥४१॥

शिबिरीं द्रौपदीचे कुमर ॥ आणि द्यृष्टद्युम्नादि दळभार ॥ ठेविले होते समग्र ॥ तैं विनविलें द्रौपदीयें ॥४२॥

जीजी देवा माझीं लेंकुरें ॥ त्वां रक्षावीं सर्वप्रकारें ॥ मग कृत्या निर्मिली सर्वेश्वरें ॥ शक्तिरूप ॥४३॥

तिये आज्ञा केली देवें ॥ कीं त्वां गस्तफेरीं फिरावें ॥ आजि दळभारा रक्षावें ॥ जंव येऊं आह्मी ॥४४॥

ह्मणोनि पांडव नेले यात्रेसी ॥ द्रौपदीसह पंचगंगेसी ॥ मग द्रौणीनें तिये निशीं ॥ केलें बिजें ते ठायीं ॥४५॥

तंव कृत्या आड आली ॥ ते नानामंत्रें निवारिली ॥ मग प्रसन्न करोनि चंद्रमौळी ॥ पावला खड्‌ग ॥४६॥

तेणें कृत्येसि हाणितलें ॥ धडशिर वेगळें केलें ॥ अभिचारिक आरंभिलें ॥ प्रवेशोनि शिबिरीं ॥४७॥

तेथ सर्वसंहारं केला ॥ तंव सात्यकी कृष्णापें गेला ॥ सर्व वृत्तांत सांगीतला ॥ धर्मादिकांसी ॥४८॥

ऐसें पुराणांतरमतीं ॥ परि संस्कृतभारतीं ॥ धृष्टद्युम्नाचा सारथी ॥ सांगता जाहला ॥४९॥

ह्मणे गा महारांजा धर्मा ॥ द्रौणी कृप कृतवर्मा ॥ यांहीं करोनि सौप्तिककर्मा ॥ मारिलें समस्तांसी ॥५०॥

धर्मे हा शब्द आयकिला ॥ हाय ह्मणोनि धरणीं लोटला ॥ पुत्रशोकें विव्हळला ॥ आक्रंदे थोर ॥५१॥

धर्म पडिला देखोन ॥ सात्यकी आणि भीमार्जुन ॥ विव्हळ होवोनि माद्रीनंदन ॥ शोक करिते जाहले ॥५२॥

ह्मणती त्यांसी आपण जिंकिलें ॥ त्यांहीं आमुच्यातें मारिलें ॥ तयांचे अवघे मेले ॥ तैसेचि आमुचेही ॥५३॥

आपण आधीं जय पावलों ॥ पाठी पराजयी जाहलें ॥ शोकसमुद्रीं बुडालों ॥ अवघेहि राया ॥५४॥

जितुके युद्धीं पडिले ॥ तितुकेही स्वर्गीं गेले ॥ परि आमुचें वृथा जाहलें ॥ जीवित्व देखा ॥५५॥

आजि द्रौपदीतें समस्त ॥ आह्मी असों रडत ॥ काय जीवंत कीं मृत ॥ असेल शिबिरीं ॥५६॥

जरी शिबिरीं असेल जळाली ॥ तरी आमुची कळा गेली ॥ पुढें जीवितें खंडलीं ॥ भरंवसेनी ॥५७॥

अथवा असेल जीवंत ॥ तरी देखोनि हत बंधुसुत ॥ ते शोकसमुद्राआंत ॥ असेल पडिली ॥५८॥

तियेचें दुःख फेडावया ॥ कैंचा उपावो धर्मराया ॥ अग्निदग्ध जाहलिया ॥ असेल चडफडत ॥५९॥

ऐसा करूणाशोक ऐकिला ॥ धर्मराजा सावध बैसला ॥ मग नकुळा पाठविला जाहला ॥ ह्मणे ऐकें बंधुराया ॥६०॥

द्रौपदीची शुद्धी करोनी ॥ जितनृत्य येई घेवोनी ॥ तियेप्रती मी पाहेन नयनीं ॥ राजसेतें ॥६१॥

येरू रथीं बैसोनि निघाला ॥ शिबिरभूमिके पातला ॥ सकळांचा संहार देखिला ॥ पडिला मूर्च्छित ॥६२॥

स्वस्थ होवोनि पुढें जात ॥ तंव एके उरले दुसांत ॥ द्रौपदी देखिली शोकभूत ॥ दीनवदना ॥६३॥

मग नकुळ त्या वेळां ॥ थोरशब्दें आरंबळला ॥ सेवकांसह मूर्छित पडिला ॥ पृथ्वीवरी ॥६४॥

मागुतीं सेवक सावध जाहले ॥ नकुळा शांतवन करूं लागले ॥ येरें उठोनि बिजें केलें ॥ द्रौपदीजवळी ॥६५॥

सर्वनाश जाहला जाणोनी ॥ आणि नकुळांते देखोनी ॥ अत्यंतशोकें याज्ञसेनी ॥ लोळे भूमिये ॥६६॥

येरें उचलोनियां रथीं ॥ बैसविली महासती ॥ मग नेली धर्माप्रती ॥ शोकाक्रांत ॥६७॥

तेथ अंग घालोनि धरणीं ॥ आक्रंदत द्रुपदनंदिनी ॥ जैसी कर्दळीं मेदिनी ॥ पडे चंडवातें ॥६८॥

भीमें धावोनि तत्क्षणीं ॥ उठवियेली करीं धरोनी ॥ सुशब्दें आश्वासिली कामिनी ॥ नानापरि समस्तीं ॥६९॥

यावरी ते द्रौपदीसती ॥ बोलती जाहली धर्माप्रती ॥ तूं गा कैसी भोगिसी क्षिंती ॥ नाशले पुत्रपौत्र ॥७०॥

आतां राज्यत्याग करूनी ॥ सर्वसुखेच्छा सांडोनी ॥ चला सर्व जाऊं वनीं ॥ वृथा संसार ॥७१॥

वधूनि ज्ञातिबांधवांसी ॥ राज्य भोगूं पाहतोसी ॥ तुझी दुष्टमती ऐसी ॥ राज्यलोभें ॥७२॥

तरी राज्य जयाकारणें ॥ तो सौभद्र गेला प्राणें ॥ पाहें पां मारिली नंदनें ॥ अश्चत्थामें पशूंपरी ॥७३॥

तुझें हृदय वज्रघटित ॥ माझिये दुःखा नाहीं अंत ॥ आतां देहनाश निभ्रांत ॥ करीन विष भक्षोनी ॥७४॥

अथवा गळपाश लावीन ॥ भलत्यापरी प्राण त्यजीन ॥ तरी कांहीं प्रयत्‍न करून ॥ वांचवा मज ॥७५॥

ऐसें करुणालापें बोले ॥ तें धर्मरायें परिसिलें ॥ मग बोलों आदरिलें ॥ द्रौपदीयेसी ॥७६॥

ह्मणे ते धर्मज्ञ पुत्रबंधु ॥ मरण पावले सन्नद्धु ॥ तेथें शोक कराया संबंधु ॥ नाहीं तुज पतिव्रते ॥७७॥

त्यांहीं क्षात्रधर्म साच केला ॥ तयां स्वर्गलोक प्राप्त जाहला ॥ आणि द्रौणी तरी पळाला ॥ आतां कोणा वधावें ॥७८॥

ऐसाही सांपडेल उपायें ॥ तरी गुरुपुत्र वधूं नये ॥ ह्मणोनि ऐसियासि काय ॥ कीजे प्रयत्‍न ॥७९॥

येरी ह्मणे तो गुरुपुत्र ॥ तयाचा करूं नये संहार ॥ तरी ऐका एक विचार ॥ जेणें वांचेन मी ॥८०॥

त्या द्रौणीचिये शिरीं ॥ मणी येक असे अवधारीं ॥ तो आणोनियां झडकरी ॥ बांधा मस्तकीं माझिये ॥८१॥

तेणें वांचेन मी निरुती ॥ ऐकोनि धर्म सचिंत चित्तीं ॥ तंव येरी कोपें भीमाप्रती ॥ बोलती जाहली ॥८२॥

ह्मणे माझें कराया रक्षण ॥ तूंचि योग्य भीमसेन ॥ तरी जिंकोनि द्रोननंदन ॥ आणीं मणी मस्तकींचा ॥८३॥

तुवां मागां नानापरी ॥ दैत्य वधिले वनांतरीं ॥ तुजसमान चराचरीं ॥ नसे वीर दुसरा ॥८४॥

हा भीमें शब्द ऐकिला ॥ स्वर्णरथीं आरुढला ॥ धनुष्यबाणें साजिन्नला ॥ नकुल केला सारथी ॥८५॥

रथ प्रेरोनि शीघ्रगती ॥ गेले दग्धशिबिरांप्रती ॥ तंब द्रौणी बैसोनि रथीं ॥ होता जात ॥८६॥

तेणें भीमसेन देखिला ॥ रथा पवनवेग दीधला ॥ झुंजावया सन्नद्ध जाहला ॥ भीमासवें ॥८७॥

इकडे भीम गेलियावरी ॥ धर्मासि ह्मणे श्रीहरी ॥ कीं द्रौपदीचिये शोकातें दूरी ॥ पार्थचि करील ॥८८॥

भीम गेला असे त्वरें ॥ परि द्रौणासीं झुंजतां नपुरे ॥ तयाजवळी शस्त्रास्त्रें ॥ असती नानाविध ॥८९॥

पूर्वी ब्रह्मशिरास्त्र जाण ॥ द्रोणापासोनि पावला अर्जुन ॥ तेणें अश्वत्थामा कोपोन ॥ परमदुःखी जाहला ॥९०॥

ह्मणोनि दुजें ब्रह्मशिरास्त्र ॥ द्रोनापें होतें मंत्रपर ॥ तें पुत्रासि दीधलें थोर ॥ रक्षक निर्वाणीचें ॥९१॥

ह्मणे प्राणपत्ति अवसरीं ॥ हें सोडावें शत्रुवरी ॥ परि तवबुद्धी दुराचारी ॥ सन्मार्गीं न राहसील ॥९२॥

यावरी तुह्मी गेलेति वनासी ॥ तें द्रौणी येवोनि द्दारकेसी ॥ यादवीं पुजिलें तयासी ॥ मग तो मजसी भेटला ॥९३॥

मजप्रती एकांतीं ह्मणे ॥ अगस्तीपासाव पितयें द्रोणें ॥ साधिलें नानातपसाधनें ॥ ब्रह्मशिरास्त्र ॥९४॥

तें मज दीधलें असे पिंतें ॥ आणि इषीकादिकें बहुतें ॥ अस्त्रें असती निभ्रांतें ॥ मजजवळी पैं ॥९५॥

तरी अगस्तिदत्त ब्रह्मशिरास्त्र ॥ तुवां अंगिकारोनि शीब्र ॥ आपुलें रिपुहरणचक्र ॥ द्यावें मजलागीं ॥९६॥

म्यां ह्मणितलें द्रौणीसी ॥ कीं माझें चक्र देवां दैत्यांसी ॥ गंधवी नरां पन्नगांसी ॥ उचलवेना ॥९७॥

गदा पद्म धनुष्य चक्र ॥ धरी ऐसा नाहीं वीर ॥ जो मजसमान असेल झुंजार ॥ तोचि धरूं शकेला ॥९८॥

तथापि सांटी करूं पाहसी ॥ ह्मणोनि देतों निश्चयेंसीं ॥ परि उच्चलनप्रेरणेसी ॥ अससी अशक्त ॥९९॥

ह्मणोनि त्यापुढें ठेविलें ॥ येरें डावेहस्तें पहिलें ॥ चक्र घेवों मांडिलें ॥ तंव न घेववेची ॥१००॥

ह्मणोनि उजविये हातें ॥ उचलितांही नुचले तयातें ॥ दोहीं हातीं उचलितांही तें ॥ न घेववे देखा ॥१॥

तें हालवितां न हाले ॥ देहीं थोर श्रम जाहले ॥ मग मन शंका पावलें ॥ राहिला अघोमुख ॥२॥

यावरी मी ह्मणे तयासी ॥ अरे जेणें जिंकिले शिवासी ॥ जो सदा प्रिय आह्मांसी ॥ श्वेतवाहन ॥३॥

तेणें गांडविघन्वें पार्थें ॥ नाहीं इच्छिलें सुदर्शनातें ॥ तरी वृथालाप मातें ॥ कां केला तुवां ॥४॥

पार्थ हिमाचळपर्वतीं गेला ॥ नानापतें आचरला ॥ तोही प्रार्थिता नाहीं जाहला ॥ यया चक्रातें ॥५॥

प्रत्यक्ष ममपुत्र प्रद्युम्नवीर ॥ तथा ज्येष्ठबंधु बलभद्र ॥ त्यांहीं केला नाहीं स्वीकार ॥ या चक्राचा ॥६॥

छपन्नकोटी यादवींही ॥ हें प्रार्थिलें नाहीं कहीं ॥ तें चक्र इये समयीं ॥ द्रौणें तुवां मागीतलें ॥७॥

जें उचलाया समर्थ नव्हसी ॥ तें कैसें रणीं प्रेरिसी ॥ तंव बोलता जाहला मजसी ॥ द्रोणात्मज ॥८॥

ह्मणे तवचक्र प्रार्थिलें एतदर्थें ॥ कीं म्यां अजेय व्हावें सर्वातें ॥ परि तें मजसी हतमाग्यतें ॥ पावले केवीं ॥९॥

आतां ममकल्याण हो ऐसा ॥ आशिर्वाद देई सर्वेशा ॥ मग म्यां द्रौणीसि परियेसा ॥ वरें आश्वासिलें ॥११०॥

तेव्हां अश्वरत्‍नें धन ॥ मज देवोनि गेला आपण ॥ ऐसा प्रबळ द्रोणनंदन ॥ जाणे ब्रह्मशिरास्त्र ॥११॥

करील भीमासि अपकार ॥ ह्मणोनि जाणें असे शीघ्र ॥ मग सज्ज करोनि रहंबर ॥ धमार्जुनेंसी निघाला ॥१२॥

वायुवेगें चालिले ॥ भीमा वाडंगावया वहिले ॥ तंव भीमें असे वाइलें ॥ द्रौणीवरी ॥१३॥

भागीरथीचिये तीरीं ॥ व्यासांसहित ऋषीश्वरीं ॥ तयां देखतां झुंजारी ॥ मांडली भीमाद्रौणीसी ॥१४॥

इतुक्यांत शीघ्र पाठोवाटी ॥ आले धर्मार्जुन जगजेठी ॥ ते द्रौणीनें पाहतां दृष्टीं ॥ अंतरीं भय पावला ॥१५॥

मग इषीकास्त्र निर्वाणीं ॥ स्वयें प्रेरिता जाहला द्रौणी ॥ तयाचिये पासोनि वन्ही ॥ उठिला थोर ॥१६॥

असंभाव्य उठिल्या ज्वाळा देखा ॥ कल्पांत मांडला तिहींलोकां ॥ चरित्र वर्तलें काळांतका ॥ सारिखें सकळां ॥१७॥

तो अभिप्राय जाणोनी ॥ पार्थासि ह्मणे चक्रपाणी ॥ आतां अस्त्र सोडीं निर्वाणीं ॥ द्रोणोपदिष्ट ॥१८॥

मज तुज बंधूकारणें ॥ परित्राण होय जेणें ॥ तें निर्वाणीं न राखणें ॥ तुवां गुप्त ॥१९॥

ऐसा कृष्णें आज्ञापिला ॥ पार्थ रथाखालीं उतरला ॥ धनुषीं वाण सादिला ॥ स्मरिला गुरुद्रोण ॥१२०॥

कृष्णधर्म मुख्य आघवे ॥ आमुचे ते वांचवावे ॥ वैरियांसी जीवें घ्यावें ॥ ऐसें अस्त्र अभिमंत्रिलें ॥२१॥

गुरुदेव नमस्कारिले ॥ पार्थें दिव्यास्त्र सोडिलें ॥ अग्निज्वाळीं धडाडिलें ॥ संघट्टलें इषीकास्त्रा ॥२२॥

दोनी अस्त्रें जाळूं लागली ॥ पृथ्वी कंपायमान जाहली ॥ पुढें कैसी कथा वर्तली ॥ ते सांगेल मधुकर ॥२३॥

इति श्रीकथाकल्पतरू ॥ द्दादशस्तबक मनोहरू ॥ द्रौण्यस्त्रप्रेरणप्रकारू ॥ तृतीयाऽध्यायीं कथियेला ॥१२४॥

॥ इति श्रीकथाकल्पतरौ द्दादशस्तबके तृतीयोऽध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP