दास म्हणे संतीं । ऐकावी कथा पावन अति ।
पुसे भावे गंगावती । निरंजना सांप्रदाय ॥१॥
जी निजवल्लभा प्राणेश्वरा । भुक्तिमुक्तीच्या दातारा ।
माझा संदेह परिहारा । विनती गुरुवरा परिसावी ॥२॥
हे दत्तात्रय सांप्रदाय वल्ली । अविच्छिन्न प्रकोटोनि वाढली ।
भूमंडळीं विस्तारली । साधुजन मंदपावलंबें ॥३॥
जीचें फळ अमृतसार । सेवितां घेड अजरामर ।
ऐसें असतां सिद्धेश्वर । सांप्रदाय स्वीकार किमर्थ ॥४॥
काय येथें नोहती पूर्णता । कीं अन्योपदेश घेयिजे नाथा ।
मंत्रविद्या महादेवता । वासुदेव दाता मोक्षाचा ॥५॥
ऐसें असतां आपण । सिद्धेश्वर सांप्रदायी म्हणोन ।
लोकीं रुढवावया काय कारण । हेंही विंदाण वदावें ॥६॥
न पुसतां समाधान । नोहे न तुटे संशयबंधन ।
यास्तव कृपा उत्तरदानें । असूं प्राशनें निववावें ॥७॥
आशा जिंतोनि सवेंपरीं । राहटि करितां संसारीं ।
जीवन्मुक्त निर्धारीं । संसारीं लिप्त तो नोहे ॥८॥
म्हणोनि जीवन्मुक्त नरीं । नैराश्य वसावें संसारीं ।
परम मोक्ष पावे सुंदरी । ईश्वरत्व वरी तो एक ॥९॥
एवं निरंजन योगी स्वप्रियेसि । शांतिबोध परम उपदेशी ।
तदुपरि राहिले स्वस्थ मौनेसीं । मानसी सद्गुरुसि चिंतित ॥१०॥
पुन्हा तयासि गंगावती । विनयें आचार झाली पुसती ।
ते सदाचार पद्धती । कथीन पुढिल्या उल्हासीं ॥११॥
इतिश्री निरंजनदासविरचित । सांप्रदायपरिमळ महाग्रंथ ।
येथे षटपद साधुसंत । रमतां तृप्ति घडेल ॥१२॥