प्रल्हाद म्हणाला, - हे मित्रहो, ज्ञानी पुरुषानें ह्या मनुष्यजन्मामध्येंच व त्यांतूनहि अगदीं कौमारावस्थेमध्येंच भागवतधर्माचें आचरण करावें; सकामधर्माचे आचरण करुं नये. कारण, हा मनुष्यजन्म जरी दुर्लभ असून पुरुषार्थप्रद आहे, तरी तो अशाश्वत आहे ॥१॥
मनुष्यजन्मामध्ये विष्णूला शरण जावें हेंच पुरुषाला योग्य आहे. कारण, हा विष्णुच सर्व भूतांचा आत्मा, ईश्वर, प्रिय आणि हितकारी आहे ॥२॥
हे दैत्यहो, जसें प्राण्यांना आयास न करितां पूर्वकर्मानेंच दुःख प्राप्त होतें, त्याप्रमाणें देहाच्या योगानें इंद्रियासंबंधी सुखहि सर्व योनीमध्यें दैवयोगानेंच प्राप्त होतें ॥३॥
म्हणून त्याच्याकरितां प्रयत्न करुं नये. तसा प्रयत्न केल्यानें केवळ आयुष्याचा व्यय मात्र होतो. शिवाय मुकुंदाच्या चरणकमलाची सेवा करणारा पुरुष जसें परमानन्दरुप क्षेम पावतो, तसें क्षेम विषयसुखार्थ प्रयत्न करणारा पुरुष पावत नाही ॥४॥
ह्यास्तव संसारामध्यें सांपडलेल्या विवेकी पुरुषानें जोंपर्यंत सर्वांगानी परिपूर्ण असलेल्या आपल्या नाश झाला नाहीं, तोपर्यंत होईल तितका लवकर आत्मकल्याणाचा प्रयत्न करावा ॥५॥
अहो, पुरुषांचें आयुष्य आधीं मुळी शंभर वर्षे; त्यांतील अर्धे आयुष्य अज्ञानांत इंद्रियनिग्रह न केल्यामुळें व्यर्थ जातें. कारण, तो पुरुष, विषयरुपी अज्ञानामध्यें निमग्न होऊन घोरत पडतो ॥६॥
तसेंच बाळपणी अज्ञान स्थितीत असल्यामुळें दहा वर्षे, कौमारावस्थेमध्यें खेळत असल्यामुळें दहा वर्ष, मिळून वीस वर्षे आणि वृद्धावस्थेमध्यें जरेनें शरीर ग्रस्त होऊन अशक्त झाल्याळें वीस वर्षे असें आणखी आयुष्य फुकटच जातें ॥७॥
बाकीचें आयुष्य प्रबळ मोहानें व दुःखांनी चोहोंकडून परिपूर्ण अशा कामाच्या योगाने गृहामध्यें आसक्त झालेल्या त्या प्रमत्त पुरुषाच्या बाबतीत व्यर्थच जातें ॥८॥
तात्पर्य, हे दैत्यहो, इंद्रियदमन न केलेला असा पुरुष, एकदां संसारांत पडला म्हणजे तो स्नेहरुप दृढपाशांनी बद्ध होतो; आणि मग त्याला स्वतः ची सुटका करणें अशक्य होतें ! ॥९॥
जें द्रव्य, चोर, सेवक आणि वाणी आपले अतिप्रिय प्राण खर्चून सुद्धां मिळवूं पहातात, त्या प्राणांपेक्षाहि प्रिय असलेल्या द्रव्याची इच्छा कोणता पुरुष बरें सोडून देईल ? ॥१०॥
जसा कोश करणारा कीटक आपणाला हितकारक असें घर निर्माण करीत असतां, शेवटी आपणांस त्यांतून बाहेर पडण्यासहि मार्ग ठेवीत नाहीं, त्याप्रमाणें विषयांची इच्छा तृप्त न झाल्यामुळें लोभानें स्वतः च्या बंधनास कारण होणारी कर्मे करणारा जो पुरुष, स्त्रीपुत्रांवर अनुरक्तचित होऊन, त्यांच्या स्नेहपाशानें बद्ध होतो, तो दयायुक्त अशा प्रिय भार्येचा एकांतस्थळी घडलेला प्रसंग, तिच्याबरोबर झालेली मनोहर भाषणें, मित्रांची संगती, मधुर शब्द उच्चारणारी मुलें, सासरी असलेल्या त्या मनोहर कन्या, भ्राते, भगिनी, वृद्धावस्थेमुळें दीन झालेले मातापितर, सुंदर आणि विपुल साहित्यांनी भरलेलीं घरें, कुलपरंपरेनें आलेल्या वृत्ति, पशुसमुदाय आणि भृत्यगण, ह्यांचे स्मरण करणारा त्यांचा त्याग करण्यास कसा बरें समर्थ होईल ? मित्रहो, जो शिस्त्र आणि जिव्हा ह्यापासून होणारें सुखच अधिक मानितो, व ज्याला अत्यंत मोह प्राप्त झाला आहे, तो कसा बरें विरक्त होईल ॥११॥॥१२॥॥१३॥
हे असुरबालकहो, संसारी पुरुष प्रमत्त होऊन कुटुंभाच्या पोषणार्थ आपल्या आयुष्याचा क्षय होत आहे व आपण पुरुषार्थाला मुकत आहों, हें जाणत नाहीं व सर्वकाळी आणि सर्वठिकाणी तापत्रयानें दुःख पावत असूनहि कुटुंबामध्येंच रममाण होत असतो; त्याला त्या कुटुंबामध्यें दुःख आहे असें वाटतच नाहीं ॥१४॥
अहो, फार काय, परंतु ज्याचें चित्त द्रव्याच्या ठिकाणीं संलग्न झालेलें असतें, अशा त्या परवित्त हरण करणार्या कुटुम्बी पुरुषाला परलोकी नरकरुप व इहलोकीं राजदंडादिरुप दुःख भोगावें लागतें, हें जाणत असूनहि, तो जितेन्द्रिय नसल्यामुळें व द्रव्यामिलाषाची त्याची शांति झाली नसल्यामुळें तो परवित्त हरण करतोच ॥१५॥
हे दानवहो, ह्याप्रमाणें केवळ कुटुंबपोषण करणारा पुरुष, विद्वान् असला तरी, आत्मज्ञान मिळविण्याला समर्थ होतो असें नाही. अत्यंत मूढ मनुष्याप्रमाणें तोसुद्धां अज्ञानांत पडतो. कारण, ‘ हे माझें व हे दुसर्याचें ’ असा भिन्न भाव त्याच्या ठिकाणी उत्पन्न झालेला असतो ॥१६॥
हे दैत्यपुत्रहो, ज्याचा नेत्रकटाक्षामध्यें कामेच्छा आहे, व ज्यांचा संबंध घडल्यानें शृंखलेप्रमाणें बंधास कारण, अशी पुत्रपौत्रादि संतति प्राप्त होते, त्या स्त्रियांचा, त्यांच्या बरोबर क्रीडा करण्याकरिता ठेवलेला जणूं वानरच, असा कोणताहि विषयलंपट पुरुष ज्याअर्थी कोणत्याहि ठिकाणीं व कोणत्याहि काळीं आपली स्वतः ची सुटका करुन घेण्यास समर्थ होत नाहीं, त्याअर्थी तुम्ही विषयाच्याच ठिकाणीं आसक्त असणार्या दैत्यांचा संग सोडून द्या व आदिदेव जो नारायण त्याला सत्त्वर शरण जा. कारण, सर्वसंगपरित्याग केलेले विवेकी पुरुष मोक्ष म्हणून त्याचाच स्वीकार करितात ॥१७॥॥१८॥
हे दैत्यपुत्रहो, भगवान् अच्युत हा भूतमात्रांचा आत्मा असून सर्व ब्रह्मांड व्यापून असल्यामुळे त्याला प्रसन्न करुन घेण्यास पुरुषाला फारसा प्रयास पडत नाही ॥१९॥
वृक्षपाषाणादिकांपासून तो ब्रह्मदेवापर्यंत लहानथोर जीवमात्रांमध्यें, पंचमहा भूतांपासून झालेल्या अचेतन अशा घटपटादि पदार्थांमध्ये, आकाशादि पंचमहाभूतांपासून झालेल्या अचेतन अशा घटपटादि पदार्थांमध्यें, आकाशादि पंचहाभूतांमध्ये व सत्त्वादिगुणांमध्ये, मायेमध्यें व गुणांचे विकार अशा महतत्त्वादिकांमध्येंहि ब्रह्मस्वरुप, सर्वांतर्यामी, अर्चित्य, ऐश्वर्यांनी युक्त व अपक्षयादि विकारानें रहित, असा एकच ईश्वर भासत आहे ॥२०॥२१॥
हे मित्रहो, केवळ अनुभवात्मक आनंदस्वरुपी असा तो ईश्वर, स्वतः भेदरहित व निर्देश करण्यास अशक्य असूनहि, अन्तर्यामीं द्रष्ट्याच्या स्वरुपानें व्यापक व भोग्य अशा देहादि स्वरुपानें व्याप्य म्हणून जाणिला जातो. तथापि त्यानें गुणमय सृष्टि उत्पन्न करणार्या मायेच्या योगानें आपले ऐश्वर्य आच्छादित करुन टाकिलें आहे; म्हणून तो सर्वत्र असतांहि त्याचे सर्वज्ञत्वादि गुण सर्व ठिकाणी उपलब्ध होत नाहींत ॥२२॥२३॥
यास्तव तुम्ही असुरस्वभावाचा त्याग करुन सर्व भूतांविषयी दया आणि मैत्री धारण करा. कारण तिच्या योगानें अधोक्षज भगवान् संतुष्ट होतो ॥२४॥
तो आदिपुरुष अनंत भगवान् संतुष्ट झाला असतां काय बरें दुर्लभ आहे ? आणि मग गुणांचा परिणाम करणारें जें दैव, ज्याच्या योगें ह्या लोकी आपोआप सिद्ध होणारे जे धर्मादि पुरुषार्थ, ते आचरण करुन तरी वास्तविक काय लाभ ? तसेंच भगवच्चरणाच्या सान्निध्यांत राहून त्याच्या माहात्म्याचें गायन करुन त्यांतील सार सेवन करणार्या आम्हांला मोक्षाची इच्छा करुन तरी काय करावयाचें आहे ? ॥२५॥
हे असुरहो, धर्म, अर्थ व काम, म्हणून जो तीन प्रकारचा पुरुषार्थ सांगितला आहे, व ज्याकरितां आत्मविद्या, कर्मविद्या, दंडनीति, तर्कशास्त्र इत्यादि नानाप्रकारचीं जीं उपजीविकासाधनें दाखविली आहेत, तीं सर्व वेदामध्यें सांगितली आहेत; परंतु अंतर्यामी परमपुरुष भगवंतास स्वात्मनिवेदन करणें, हेंच एक सत्य असें मी मानितों ॥२६॥
हे दैत्यपुत्रहो, निर्मल व दुर्लभ असें हें ज्ञान ऋषीचा नरसखा जो नारायण, त्यानें नारदाला सांगितलें होते. ज्यांनी सर्वसंगपरित्याग केला आहे, ज्यांस भगवद्भक्तीच्या चरणकमलांच्या रजः कर्णाचे स्त्रान घडलें आहे, अशा एकनिष्ठ भक्तांनाच तें ज्ञान अवश्य प्राप्त होते. उत्तम पुरुषांनाच होते असे नाहीं ॥२७॥
मी हें सानुभव ज्ञान व शुद्ध असा भागवतधर्म, अशीं दोन्हीं भगवंताचें नित्य दर्शन घेणार्या नारदापासून श्रवण केलीं आहेत ॥२८॥
दैत्यपुत्र म्हणाले, - हे प्रल्हादा, ह्या गुरुपुत्रांवांचून तुला व आम्हांला दुसरा गुरु मुळींच माहीत नाही. आपण अगदी लहान होतों तेव्हांपासून हेच आपले गुरु आहेत ॥२९॥
अंतः पुरामध्यें असलेल्या बालकाला तर नार, दासारख्या महात्म्याची भेट होणें दुर्घट आहे. यास्तव हे प्रियमित्रा प्रल्हादा, याविषयीं तुझ्या वचनावर आमचा विश्वास बसण्यासारखी जर कांही गोष्ट असेल तर ती सांगून तूं आमचा संशय दूर कर ॥३०॥
सहावा अध्याय समाप्त ॥६॥