नारद म्हणाला, - हे धर्मराजा, ह्याप्रमाणें दूर उभें राहून स्तुति करीत असलेले ब्रह्मरुद्रप्रभृति सर्व देवादिक, ज्याला क्रोधानेंझ आवेश चढला आहे, व म्हणून ज्याच्याजवळ जाणें अत्यंत कठीण झालें आहे, अशा त्या नृसिंहाजवळ जाण्यास समर्थ झाले नाहींत ॥१॥
फार काय, परंतु प्रत्यक्ष लक्ष्मीला देवांनी कोपशान्त्यर्थ त्याच्याकडे पाठविलें असतां, तीहि, पूर्वी कधींहि न पाहिलेलें व न ऐकिलेलें असें तें भगवंताचें अत्यंत अद्भुत नृसिंहरुप अवलोकन करुन भयभीत झाली व त्यामुळें त्याजवळ जाऊं शकली नाही ॥२॥
तेव्हां ब्रह्मदेवानें आपल्याजवळ उभा असलेल्या प्रल्हादाला प्रभूचा क्रोध शांत करण्याकरितां पाठविलें. ब्रह्य्मदेव म्हणाला, बा प्रल्हादा, तूं प्रभू जवळ जा, आणि आपल्या पित्यावर क्रुद्ध झालेल्या प्रभूला शांत कर ॥३॥
हे राजा, तेव्हां ‘ ठिक आहे ’ असें म्हणून तो महाभगवद्भक्त बालक प्रल्हाद हळूहळू भगवंताजवळ गेला, व हात जोडून त्यानें त्याला साष्टांग नमस्कार केला ॥४॥
त्या वेळी आपल्या पायां पडत असलेल्या त्या बालकाला पाहून तो प्रभु कृपेनें सद्गदित झाला, व त्याला उठवून, कालरुप सर्पापासून ज्यांची बुद्धि गलित झाली आहे अशा शरणागतांना अभयदान देणारा आपला हस्त त्यानें त्याच्या मस्तकावर ठेविला ॥५॥
नृसिंहाचा करस्पर्श होतांच प्रल्हादाचें वासनारुप सर्व पाप नष्ट झालें, व तत्क्षणीच त्याला भगवंताच्या स्वरुपाचें यथार्थ ज्ञानहि झालें. परमानंदामुळें त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले त्याचें हदय प्रेमानें आर्द्र झालें, त्याच्या नेत्रांतून आनंदाश्रूचे लोट वाहूं लागले, आणि त्यानें आपल्या हदयामध्यें भगवंताचे चरणकमळ धारण केलें ॥६॥
नंतर शांतचित असा तो प्रल्हाद भगवंताच्या ठिकाणी आपलें हदय व दृष्टि लावून एकाग्रअंतः करणपूर्वक प्रेमानें सद्गदित झालेल्या शब्दांनी श्रीहरीचे स्तवन करुं लागला ॥७॥
प्रल्हाद म्हणाला, - सत्त्वगुणाच्याठिकाणी एकग्रबुद्धि असलेले ब्रह्मादिक देवगण, तित्य भगवचिंतन करणारे ऋषि आणि ज्ञानसंपन्न असे सनकादिक सिद्ध बहुत काळपर्यंत आराधन करीत असून हा वेळपर्यंतहि आपल्या प्रवाहांनी व धनरुपहि गुणांनी ज्याला संतुष्ट करुं शकले नाहींत, तो श्रीहरि असुरयोनींत जन्मलेल्या मजवर कसा संतुष्ट करुं शकले नाहींत, तो श्रीहरि असुरयोनीत जन्मलेल्या मजवर कसा संतुष्ट होईल ? ॥८॥
वित्त, सत्कुला मध्ये जन्म, सौंदर्य, तप, पांडित्य, इंद्रियसौष्ठव, कांति, प्रताप, शरीरशक्ति, उद्योग, बुद्धि आणि अष्टांगयोग, हे बाराहि गुण, लोकांमध्ये व शास्त्रांमध्यें जरी श्रेष्ठ म्हणून प्रसिद्ध आहेत तथापि ते परमपुरुष भगवंताला संतुष्ट करण्यास समर्थ होत नाहींत, असें मी मानितों. कारण, केवळ भक्तीच्याच योगानें भगवान् गजेंद्रावर संतुष्ट झाला होता ॥९॥
या बारा गुणांनी युक्त परंतु पद्मनाभ भगवंताच्या चरणकमलापासून विमुख अशा ब्राह्मणापेक्षा, ज्यानें मन, कर्म, द्रव्य आणि प्राण हे त्या पद्मनामाच्याठिकाणीं अर्पण केले आहेत त्या चांडाळाला सुद्धा मी श्रेष्ठ मानितो. कारण, तो चांडाळ हरिभक्तीमुळें आपलें सर्व कुळ पवित्र करितो; पण अतिगर्विष्ठ ब्राह्मणाला तसें करितां येत नाही ॥१०॥
हा ईश्वर आत्मलाभानेंच पूर्णकाम झाल्यामुळें आपल्याकरितां क्षुद्रजनांपासून पूजेची इच्छा करीत नाहीं; परंतु तो कृपाळू असल्यामुळें भक्ताकरितांच तिची इच्छा करितो. कारण आपल्या मुखावर असलेली शोभा जशी आरशांतील प्रतिबिबाला प्राप्त होते, त्याप्रमाणे ज्या धनादिकांच्या योगानें भक्त भगवंताचें पूजन करितो, तें सर्वहि त्या भक्ताला स्वतः लाच प्राप्त होतें ॥११॥
सारांश, भगवान ज्याअर्थी केवळ भक्तीच्याच योगें संतुष्ट होतो, त्याअर्थी मी जरी नीच आहे, तथापि आतां निः शंकपणें यथामति ईश्वराचें महात्म्य वर्णन करीत आहे. तेव्हां, त्या माहात्म्याच्या गुणवर्णनानें संसारांत पडलेला पुरुषहि जर शुद्ध होतो तर मी कां होणार नाही ? ॥१२॥
हे ईश्वरा, तुला भीत असलेले हे सर्वहि ब्रह्माहि देव, आह्मां असुरांप्रमाणें वैरभावानें तुझी भक्ति करणारे नसून, सत्त्वमूर्ति अशा तुझ्या भगवंताच्या आज्ञेमध्यें श्रद्धापूर्वक वागणारे भक्त आहेत. तूं आपल्या मनोहर अवतारांच्या योगानें करीत असलेल्या नानाप्रकारच्या लीला, ह्या विश्वाच्या कल्याणाकरितां, ऐश्वर्यप्राप्तीकरितां आणि आत्मानंदाच्या लाभाकरितांच असतात, त्यांना भय उत्पन्न करण्याकरितां नसतात ॥१३॥
यास्तव हे भगवन्, आतां क्रोध आवरा. हा असुर तर आतां मरण पावला आहे. दुसर्यास उपद्रव करणार्या विंचू, साप इत्यादिक प्राण्यांच्या वधानें, साधूलाहि आनंदच होईल. सर्व लोक आतां सुखी झाला असून, तुझ्या क्रोधाचा उपशम होण्याची आतां वाट पहात आहेत. हे नृसिंहा, भयनिवृत्तीकरितां सर्व लोक ह्या नृसिंहस्वरुपांचे स्मरण करितील ॥१४॥
हे अजिता, विक्राळ मुख व जिव्हा, सूर्यासारखे नेत्र, चढविलेल्या भुंवया व तीक्ष्ण दाढा, यांमुळें अति भयंकर दिसणारें तुझें मुख, आंतडयांच्या माळा घातलेला कंठ, रक्तानें भरलेलें मानेवरील केंस, शंकूसारखे उभे टंवकारलेले कान, दिग्गजांनाहि भयभीत करणारा शब्द आणि शत्रूंना विदारण करणारी नखें, असें हे तुझें भयंकर रुप आहे; पण या रुपाला मी मुळीच भीत नाही ॥१५॥
परंतु हे दीनवत्सला, दुःसह आणि उग्र असें जें संसारचक्रांतील दुःख त्याला मात्र मी भिऊन गेलों आहे. ह्याठिकाणी पातकी लोकांमध्ये मी कर्मांनी बद्ध होऊन पडलों आहें. तेव्हां हे प्रिय परमात्म्या, मजवर तूं प्रसन्न होऊन संसारदुःखनिवर्तक अशा आपल्या आश्रयभूत चरणकमळाजवळ मला केव्हां बरें बोलावून नेशील ? ॥१६॥
नानाप्रकारच्या योनींमध्यें दुःख पावत असलेल्या या जीवाला तुझी सेवा करण्याचें ज्ञान कांहींच नाहीं. यास्तव तूंच त्या ज्ञानाचा मला उपदेश कर. हे विभो, प्रिय वस्तुंपासून वियोग आणि अप्रिय वस्तुंशी संयोग, ह्यांच्यामुळें उत्पन्न होणार्या शोकाग्नीनें सर्व योनीमध्यें मी पोळून गेलों आहे. दुःखाच्या निवृत्तीचा उपाय म्हणून जो करावा तोहि दुःखमयच होतो. देहादिकांच्या अभिमानानें मी मोहित झालों आहे. यास्तव हे प्रभो, तुझी सेवा करण्याचा उपाय तूं मला कयन कर ॥१७॥
हे नृसिंहा, तूं अनुग्रह केल्यामुळें, तुझ्या दासाच्या ठिकाणीं प्रवृत्त झालेला, तुझ्या चरणद्वयाचा आश्रय करणारा, सत्पुरुषांच्या समागम करणारा, विषयां पासून मुक्त होऊन, तुझा प्रिय, मित्र व श्रेष्ठ अशा देवतारुप ब्रह्मदेवानें गायन केलेल्या, तुझ्या लीलांच्या कथा मी वर्णन करुं लागलों, म्हणजे सर्व संसारदुःखे अनायासानें तरुन जाईन ॥१८॥
हे नृसिंहा, दुःखांनी संतप्त झालेल्या जनास दुःखनिवृत्तीचा उपाय म्हणून जो या लोकीं सांगितलेला आहे, हे विभो, तूं उपेक्षा केलेल्या लोकांना तो क्षण मात्रच होतो, कायमचा होत नाही. उदाहरण, मातापितर हे बालकाचे रक्षक या लोकी जरी आहेत, तथापि ते कायमचे नव्हेत. कारण, ते रक्षण करीत असतांहि बालकांना दुःख होत असलेले दृष्टोत्पतीस येते. तसेंच औषध रोग्याचें रक्षक म्हणावे तर तेहि नाही. कारण, औषध दिलें असतांहि मृत्यु येतो असें आपल्या अनुभवास येतें. त्याप्रमाणे नौका ही समुद्रामध्यें बुडत असलेल्या प्राण्यांचे रक्षण करणारी आहे असे म्हणावें तर तीहि नाहीं. कारण, कधी कधी नौकेसह लोक समुद्रामध्यें बुडतात, असें आपल्या दृष्टीस पडतें. यास्तव खरा रक्षक असा एक तूंच आहेस ॥१९॥
हे भगवन्, सत्त्वादि स्वभावयुक्त असा प्राचीन ब्रह्मादिक मुख्य कर्ता, अथवा त्यानें प्रेरणा केलेला असा अर्वाचीन पित्रादिक कर्ता, जेथें, ज्या निमित्तास्तव, ज्या काळीं, ज्या साधनानें, ज्याच्यापासून, ज्याकरितां, ज्याकारणानें जें उत्पन्न करितो, अथवा ज्याचें रुपांतर करितो, असें हें सर्व जग तुझेंच स्वरुप आहे ॥२०॥
हे सर्वशक्तिमान् जन्मादिविकारशून्य परमेश्वरा, ज्याच्या अवलोकनरुप अनुग्रहानें प्रेरित झालेल्या काळाच्या योगानें, जिच्यांतील सत्त्वादि गुणांचा क्षोभ झाला आहे अशी माया, अविद्येच्या द्वारानें जीवाच्या भोगाकरितां सोळा विकारांनीं आणि अनंत कर्मवासनांनी युक्त अशाप्रकारे वेदोक्तकर्मप्रधान असें हें लिंगशरीर उत्पन्न करित्ये. अशा कर्मबंधनानें बद्ध झालेला पुरुष, मनः प्रधान अशी तुझी अशी तुझी भक्ति केल्यावाचून या संसारचक्रांतून कसा बरें मुक्त होईल ? ॥२१॥
हे समर्था ईश्वरा, तूं आपल्य चैतन्यशक्तीच्या योगानें निरंतर बुद्धीचे गुण जिंकिले आहेस. तूं मायेचा नियंता असून सर्व कार्यांच्या व साधनांच्या शक्ति तूंच आपल्या स्वाधीन ठेवितोस. मायेनें सोळा विकारात्मक संसारचक्रामध्यें सांपडलेला असा मीं, पिळून निघणार्या उंसाप्रमाणें अत्यंत पीडित झालों आहें. तरी मज शरणागताला आपल्या समीप ओढून घे ॥२२॥
हे प्रभो, संसारी मनुष्य स्वर्गलोकांत जें प्राप्त व्हावें म्हणून इच्छा करितो, तें सर्व लोकपालांचे आयुष्य, संपत्ति व आधिपत्यरुप अधिकार अतितुच्छ आहेत, असें मी पाहिलें आहे. कारण जे लोकपाल माझ्या पित्याच्या नुसत्या कोपयुक्त हास्याने व फिरविलेल्या भुंवयांच्या चालनानें विध्वंस पावत होते, असा जो माझा पिता तो तूं मारुन टाकिलास ॥२३॥
सारांश, जीवांचे हे भोग, आयुष्य, संपत्ति आणि वैभव, ह्यांचे परिणाम जाणत असल्यामुळें, ब्रह्मदेवाच्या भोगांपर्यंत इंद्रियांनी उपभोग घेण्यास योग्य असलेल्या कोणत्याहि विषयांची इच्छा मी करीत नाही. कारण, त्या सर्वहि आणिमादि संपत्ति तुज कालरुप परमेश्वराच्या महापराकमानें उद्धस्त झाल्या आहेत. यास्तव मला तूं आपल्या सेवकांजवळ घेऊन पोंचीव ॥२४॥
कानाला मात्र गोड लागणार्या, परंतु मृगजळाप्रमाणें मिथ्या असलेल्या सर्व विषयादि वासना आणि सर्व रोगांचें उद्भवस्थान असें शरीर, हीं सर्व नश्वर आहेत असें जाणत असतांहि, त्यापासून विरक्त न होतां, त्या दुः साध्य मानून विषयलालसेनें सर्व प्राणीमात्र मधाप्रमाणें त्या कामरुप अग्नीचीच शांति करुं पहातात ! ॥२५॥
हे ईश्वरा, ज्यामध्यें तमोगुण अधिक आहे व जें रजोगुणानेंच उत्पन्न झालें आहे, अशा असुरकुळामध्यें उत्पन्न झालेला मी कोणीकडे ? आणि तुझी कृपा कोणीकडे ? पण ती कृपा तूं मजवर केली आहेस; आणि ब्रह्मदेव, रुद्र व लक्ष्मी ह्यांचाहि मस्तकावर कधीं ठेविला नाहीं असा तुझा तो कमळाप्रमाणें सर्व संताप दूर करणार देव श्रेष्ठ आहेत, व हा असुर नीच आहे, ही उत्कृष्टनिकृष्ट भावनारुप बुद्धि एकाद्या प्राकृत मनुष्यासारखी तुझ्याठिकाणी नाहीं. कारण, तूं जगाचा आत्मा व हितकर्ता आहेस. हे परमेश्वरा, सेवेच्या योगानेंच तुझा प्रसाद होतो; परंतु जसा कल्पवृक्ष सेवकाच्याच इच्छेनुसार फळ देतो, पण तो स्वतः विषम मुळींच नसतो, त्याप्रमाणें सेवातारतम्यानें तुझ्या प्रसादापासून धर्मादिकांची प्राप्ति होत्ये; म्हणून उत्कृष्टत्त्व व निकृष्टत्व हें कांहीं तुझ्या प्रसादाला कारण नाहीं. ॥२७॥
संसाररुपी सर्पयुक्त कूपामध्यें पडलेल्या विषयेच्छु लोकांच्या मागून त्यांच्या सहवासानें त्या संसारकूपांत पडलों असतां, देवा, तुझा आतां जसा हा प्रसाद झाला, तसाच पूर्वी देवर्षि नारदानें मला आपला असें म्हणून माझ्यावर अनुग्रह केला. त्या तुझ्या सेवकांच्या सेवेच्या अनुग्रहाचा मीं कसा बरें त्याग करीन ? ॥२८॥
हे अनंता, पुत्रवधासारखें अयोग्य कर्म करण्याच्या इच्छेनें, जेव्हां माझा पिता हातात खङ्ग घेऊन मला मारावयास उभा राहिला, आणि - ‘ तुला मान्य असा ईश्वर माझ्याहून जर निराळा आहे तर तो आतां तुझें रक्षण करो ’ - असें म्हणाला, त्यासमयी तूं प्रगट होऊन, पित्याचा वध करुन माझें रक्षण करो ’ - असें म्हणाला, त्यासमयी तूं प्रगट होऊन, पित्याचा वध करुन माझें रक्षण केलेंस. हें तुझें कृत्य, तुझा भक्त जो नारद त्यांचें वाक्य खरें करण्याकरितांच होतें ॥२९॥
हे भगवन्, हें सर्व जग, तूंच एक आहेस. कारण, ह्याच्या आरंभी, शेवटी आणि मध्येंहि तूंच प्रत्ययास येतोस. हे जगदात्म्या, आपल्या मायेनें हें गुणपरिणामात्मक जग उत्पन्न करुन त्याच्यामध्यें प्रविष्ट झालेला तूं त्या गुणांच्या योगाने, उत्पन्न करणारा, रक्षण करणारा व मारणारा अशा अनेक रुपानी युक्त असल्यासारख्या भासतोस ॥३०॥
हे ईश्वरा, हें कार्यकारणात्मक जग तूंच आहेस, तुझ्याहून निराळें असें कांहीं नाहीं. तूंच ह्या जगाच्या आदीं, अंतीं व मध्ये असून त्यापासून निराळा आहेस; म्हणून ‘ हा आपला व हा दुसर्याचा ’ अशी जी ही बुद्धि ती केवळ व्यर्थ माया आहे. कार्यरुप वृक्ष ज्याप्रमाणें कारणरुपानें बीजात्मक असतो, तसेंच बीजहि पृथ्वीरुप असून, ती पृथ्वी पुनः आपल्या सूक्ष्मरुपानें बीजांत असते, त्याप्रमाणेंच माती आदिकरुन ज्या पदार्थापासून घटादि पदार्थांची उत्पत्ति होते, व प्रकाश, लय व स्थिति ही त्यांस प्राप्त होतात, पण घटादिक पदार्थ मृत्तिकारुपच असतात. तद्वत् हें सर्व कार्यकारणात्मक जग परमकारण असें तुझेंच स्वरुप आहे ॥३१॥
हे भगवन्, तूं प्रलयकाळच्या उदकामध्यें आपल्याच योगानें आपल्याच ठिकाणीं या जगांचा उपसंहार करुन आत्मसुखाचा अनुभव घेत कर्मरहित होऊन शयन करितोस, पण स्वरुपानुसंधानरुप योगांनें डोळे मिटून व स्वरुपप्रकाशानें निद्रा जिंकून, जाग्रदादिक अवस्थात्रयाहून निराळ्या अशा आपल्या तुरीय स्वरुपांत तूं राहतोस. परंतु तमआदिकरुन गुणांनी तूं केव्हांही बद्ध होत नाहींस ॥३२॥
तू स्वतःच्या कालशक्तीनें प्रकृतीचे सत्त्वादि धर्म प्रेरित केले असून उदकामध्यें शेषशय्येवर शयन करितोस. हें जग तुझेंच स्वरुप आहे व याच्यामध्यें विसर्जन होऊं लागलें, तेव्हां वटबीजापासून उत्पन्न होणार्या महावटवृक्षाप्रमाणें तुझ्याठिकाणीं लीन असलेले हें ब्रह्मांडरुप महाकमळ तुझ्या नाभी पासून प्रल्योदकामध्यें उत्पन्न झालें ॥३३॥
हे ईश्वरा, त्या कमळापासून उत्पन्न झालेल्या सूक्ष्मदृष्ट्यां ब्रह्मदेवालाहि त्या कमळावांचून इतर कांहीच दिसेनासें झालें; तेव्हा स्वतःच्या ठिकाणीं बीजभूत असलेल्या अशा तुला तो बाहेर शोधूं लागला, व उदकामध्यें प्रवेश करुन त्यानें पुष्कळ काळपर्यंत तुझा शोध केला; पण त्याला तुझी प्राप्ति झाली नाही. याचें कारण उघड आहे. अहो, अंकुर उत्पन्न झाला असतां त्याला व्यापून असलेले करणरुप बीज त्याहून निराळें असें कसें बरें मिळेल ॥३४॥
हे ईश्वरा, त्या ब्रह्मदेवानें शंभर वर्षेपर्यंत उदकामध्यें शोध करण्याचें त्यानें सोडून दिलें; आणि नाभिकमलाचा आश्रय करुन दीर्घ काळ तप केलें. नंतर तपानें अंतः करण शुद्ध झाल्यावर, जसा भूमीमध्यें सूक्ष्मरुपानें गंध व्याप्त असतो, त्याप्रमाणें भूतें, इद्रियें आणि मन ह्यांनी बनलेल्या आपल्या देहांत अतिसूक्ष्मरुपाने व्याप्त असलेला जो तूं, त्या तुला त्यानें अवलोकन केलें ॥३५॥
त्या वेळी अपरिमित मुखें, पाय, मस्तकें, हात, मांडया, नाक, कर्ण, नेत्र, भूषणें आणि आयुधें ह्यांनी समृद्ध, व चतुर्दशलोकविस्तरात्मक रचनेनें युक्त आणि मायामय अशा विरा ट्पुरुषरुपानें स्थित असलेल्या तुला पाहून त्या ब्रह्मदेवाला आनंद झाला ॥३६॥
त्या वेळी हयग्रीवमूर्ति धारण करुन तूं त्या वेदद्रोही व अतिप्रबल अशा रजस्तमोरुप मधुकैटमनामक दैत्यांचा वध केलास, व ब्रह्मदेवाला वेदसमूह आणून दिलास. म्हणून सत्त्वगुण हीच तुझी अत्यंत प्रिय मूर्ति आहे असें मानितात ॥३७॥
हे महापुरुषा, ह्याप्रमाणें तूं मनुष्यांमध्यें रामादिक, तिर्यग्योनींमध्यें वराहादिक, ऋषींमध्यें परशुरामादिक, देवांमध्यें वामनादिक व जलचरांमध्यें मत्स्यकूर्मादिक अवतार धारण करुन लोकांचे पालन करितोस, व जगाला प्रतिकूळ असतील त्यांचा वध करितोस; आणि निरनिराळ्या युगामध्यें चालू असलेल्या धर्माचें रक्षण करितोस. परंतु कलियुगामध्यें तूं अवतार धारण करुन तें पालनादिक काय करीत नाहींस, म्हणून तीनच युगांमध्यें प्रगट होणारा तूं ‘ त्रियुग ’ ह्या नांवानें प्रसिद्ध आहेस ॥३८॥
हे वैकुंठनाथा, पातकांनी दूषित, बहिर्मुख, दुर्वर, कामातुर व हर्ष, शोक, भय ह्यांनी दुःखित झालेलें हें माझें मन, तुझ्या कथांत रममाण होत नाहीं; अशा स्थितींत हे प्रभो, मी दीनानें तुझ्या स्वरुपाचा विचार कसा करावा ? ॥३९॥
हे अच्युता, ज्याप्रमाणें अनेक भार्याच्या पतीला त्याच्या स्त्रिया सवतीमत्सरानें जशा आपल्याकडे ओढितात त्याप्रमाणें कधींहि तृप्त न होणारी अशी ही जिव्हा मला मधुरादि रसांकडे आकर्षण करित्ये, शिरुन कामिनीकडे ओढून नेतें, त्वचा चंदनादि पदार्थाकडे ओढित्ये, क्षुधेनें तप्त झालेलें उदर आहाराकडे नेतें, श्रवणेंद्रिक गायनाकडे घेऊन जातें, घ्राणेंद्रिय सुगंधाकडे नेतें, आणि चंचल दृष्टि रुपाकडे वळवित्ये. अशाप्रकारें हीं कर्मेद्रियें आपआपल्या विषयांकडे मला ओढून नेतात ॥४०॥
हे नित्यमुक्त ईश्वरा, आपल्या कर्मानें संसाररुप वैतरणीनदीमध्यें पडलेल्या, परस्परांच्या संसर्गानें मरण, जन्म व विषयसेवन ह्यांपासून अत्यंत भयभीत झालेल्या, आणि स्वजनांच्या देहांविषयी मैत्री व इतरांच्या देहांविषयी वैर धारण करणार्या अशा ह्या मूढ जनसमुदायाला पाहून ‘ अरेरे, ह्यांना फार दुःख होत आहे ? ’ असें म्हणून तूं त्यांवर दया कर, आणि ह्या वैतरणीनदींतून त्यांना बाहेर काढून त्यांचें रक्षण कर ॥४१॥
हे जगद्गुरो, ह्या विश्वाची उत्पत्ति, स्थिति व लय, ह्यांचें कारण तूंच आहेस. ह्या जनांच्या उद्धार करण्याला तुला प्रयास तो काय पडणार आहे ? मूढ जनांवर तुज महात्म्याचा अनुग्रह होणें अवश्य आहे. दुःखितांना साह्य करणार्या हे दीनबंधो, तुझी सेवा करणार्या एकटया भक्तजनांचाच उद्धार करुन काय उपयोग ? ॥४२॥
हे सर्वोत्तमा, मला स्वतःला, दुस्तर अशा ह्या संसाररुप वैतरणीनदीची भीति मुळींच वाटत नाही; कारण, तुझ्या चरित्राच्या गानरुप महामृतामध्यें माझें अंतः करण अगदी तल्लीन होऊन गेलें आहे; परंतु त्या महामृतापासून ज्यांचे चित्त पराङ्मुख झालें आहे व इंद्रियनिमित्त मायिक विषयसुखाकरितां ज्यांनी कुटुंबपोषणाचा भार अंगावर घेतला आहे अशा मूढ जनांचेंच मला फार वाईट वाटते ॥४३॥
हे देवा, प्रायशः स्वतः लाच मुक्ति प्राप्त होण्याविषयेची इच्छा करणारे मुनि, एकांतस्थळी मौन धारण करुन ध्यानादिक कर्मे करीत असतात; पण ह्या दीन जनांना सोडून आपण एकटें मुक्त व्हावें अशी इच्छा मी करीत नाही. हे परमेश्वरा, अनेक योनीमध्यें भ्रमण पावत असणार्या ह्या मूढ जनांचा उद्धार करणारा तुजवाचून दुसरा कोणीहि मला दिसत नाहीं ॥४४॥
हे परमात्म्या, मैथुनादिकांच्या योगें गुहस्थाश्रमी पुरुषांना होणारें जें सुख, तें अतितुच्छ असून, जसें हातांनी खाजविलेल्या खरजेपासून प्रथम किंचित् सुख वाटतें, परंतु मागाहून अधिकाच दुःख होतें; तसें हे गृहस्थाश्रमांसंबंधी सुखहि उत्तरोत्तर अधिकच दुःखकारक आहे. परंतु शरीरांतील कामदेवना अनिवार असल्यामुळें कामुक जन खरजेप्रमाणें नानाप्रकारचीं दुःखे भोगीत असूनहि गृहसंबंधी सुख आतां पुरें असें न मानता कंडूप्रमाणें कामवासनेंतच रममाण होतो. ॥४५॥
हे अंतर्यामी परमात्म्या, जप आणि समाधि, हे जे मोक्षाला साधनभूत म्हणून प्रसिद्ध असे दह धर्म आहेत, ते बहुतकरुन अजितेंद्रिय लोकांना केवळ जीवनाचे उपायच होताता; पण दांभिकांना तर ते निवार्हाची साधनें होसील कीं नाही हा संय आहे ॥४६॥
हे प्रभो, कस्तुतः तूं रुपरहित आहेस. बीजांकुरांप्रमाणें कार्यकारणात्मक अशी जी तुझी दोन रुपें वेदानें प्रकाशित केली आहेत, यांखरेजी तुझें ज्ञापक चिन्ह दुसरें कांहीच नाहीं. जसे अग्निक्षोत्री काष्ठात असलेप्या अग्नीला मंथनाने प्राप्त करुन घेतात
त्याप्रमाणें इंद्रियनिग्रह करणारे योगी कार्यकारणांमध्ये व्यापकरुपानें असणार्या तुला भक्तियोगानें प्रत्यक्ष अवलोकन करितात; दुसर्या उपायांनी तुझं तुझें स्वरुपज्ञान होत नाही ॥४७॥
हे सर्वव्यापी परमेश्वरा, वायु, अग्नि, पृथ्वी, आकाश, जल, शब्दादि विषय, प्राण, इंद्रियें, मन, चित्त, अहंकार व स्थूलसूक्ष्मात्मक असें हें सर्व ज गत तूंच तुझ्याहून भिन्न नाही. ॥४८॥
हे उरुगाय भगवन् सत्त्वादि गुण, गुणाभिमानी देव, देव व मनुष्यें यांसह महदादि तत्त्वें, तसेंच मन, बुद्धि इत्यादिकांचे अभिमानी देव, हे सर्व आदि व अंत ह्यांनी युक्त असल्यामुळें तुला जाणत नाहींत. ह्यास्तव विद्वान् लोक अध्ययनादि व्यापारापासून अलग राहतात; ॥४९॥
पण, हे अतिपूज्य परमात्म्या, प्रणिपात, स्तुति, सर्वकर्मसमर्पण, उपासना, तुझ्या चरणांचें स्मरण व तुझ्या कथेचें श्रवण, अशा सहा प्रकारच्या सेवेवांचून, पुरुषाला परमहंसाना प्राप्त कथेचें श्रवण, अशा सहा प्रकारच्या सेवेवांचून, पुरुषाला परमहंसांना प्राप्त होण्यास योग अशी भक्ति कशी प्राप्त होईल ? ॥५०॥
नारद म्हणाला, - हे धर्मराजा, याप्रमाणें भक्त प्रल्हादानें भक्तिपूर्वक निर्गुण परमात्म्याच्या गुणांचें वर्णन केलें असतां तो परमात्मा प्रसन्न झाला, आणि कोप आंवरुन त्या नम्र झालेल्या प्रल्हादाशीं बोलूं लागला ॥५१॥
श्रीभगवान् म्हणाले, - हे असुरश्रेष्ठा प्रल्हादा, तुझें कल्याण असो. मी तुजवर प्रसन्न झालों आहे. यास्तव हे कल्याणा, तूं इष्ट वर माग. कारण, मी पुरुषांच्या मनकामना पूर्ण करणारा आहें ॥५२॥
हे आयुष्मन् प्रल्हादा, मला प्रसन्न न करणार्या पुरुषास माझें दर्शन होणें खरोखर दुर्लभ आहे; परंतु ज्याला माझें दर्शन होतें तो प्राणी शोकभयापासून मुक्त होतो. ॥५३॥
ह्याकरितां सदाचारसंपन्न, महाभाग्यवान् आणि आपलें कल्याण व्हावें अशी इच्छा करणारे विवेकी पुरुष, सर्व मनोरथ पूर्ण करणार्या मज परमेश्वराला परम भक्तीनें संतुष्ट करितात ॥५४॥
हे धर्मराजा, याप्रमाणें प्राण्यांना लोभ उत्पन्न करणार्या वरांच्या योगानें, भगवंतानें लोभ दाखविला असतांहि भगवंताविषयींच्या एकांत भक्तीमुळें, त्यां असुरश्रेष्ठ प्रल्हादानें, त्या वरांची इच्छा मुळींच केली नाही ॥५५॥
अध्याय नववा समाप्त ॥९॥