नृसिंहाख्यान - अध्याय ८ वा

' नृसिंहाख्यान 'चा पाठ केल्याने श्रीनृसिंहपुराण वाचल्याचे पुण्य मिळते, तसेच कीर्तनकारही या आख्यानावर कीर्तन करतात.


नारद म्हणाला, - हे धर्मराजा, याप्रमाणें प्रल्हादाचें भाषण श्रवण केल्यावर तें निर्दोष आहे असें जाणून, गुरुच्या शिकवणीचा त्याग करुन, सर्व दैत्यपुत्रांनी त्याचा स्वीकार केला ॥१॥

तेव्हां त्यांची बुद्धि अंतर्निष्ठ झाली असें पाहून शंडामर्काना भय वाटलें, आणि त्यानें तें सर्व वृत्त राजाला सत्वर जाऊन निवेदन केलें ॥२॥

दुःसह आणि अप्रिय असें पुत्राचें दुवर्तन श्रवण करुन, हिरण्यकशिपूचें शरीर कोपाच्या आवेशानें कापूं लागलें, आणि पुत्राचा वध करावा असें त्यानें मनांत ठरविले ॥३॥

मग विनयामुळें नम्र झालेला व इंद्रियाचें दमन केलेला असा तो प्रल्हाद, हात जोडून आपल्या अग्रभागीं उभा आहे असें पाहून, जो तिरस्कार करण्यासहि अयोग्य, अशा त्या पुत्राची कठोर शब्दांनी निंदा करुन, स्वभावतःच क्रूर असा तो हिरण्यकशिपू, पायानें ताडण केलेल्या सर्पाप्रमाणे फूत्कार टाकींत, सक्रोध व वक्र हे दृष्टीनें त्याच्याकडे पाहात प्रल्हादाला म्हणाला ॥४॥॥५॥

‘ हे उद्धटा ’ हे मंदबुद्धे, हे कुलांत दुही उत्पन्न करणार्‍या अधमा, अरे माझ्या आज्ञेंचें उल्लंघन करणार्‍या उद्धट अशा तुला मी आज यमसदनास पोंचवितो ॥६॥

हे मूर्खां, जो क्रुद्ध झाला असता लोकपालांसह तिन्ही लोक कंपित होतात, त्या माझ्या आज्ञेचें तूं निर्भय पुरुषाप्रमाणें कोणाच्या बळाचा आश्रय करुन उल्लंघन करीत आहेस ? ॥७॥

प्रल्हाद म्हणाला, - हे राजा, ब्रह्मदेवप्रभृति लहानथोर असे जे स्थावरजंगमात्मक सर्व प्राणी, ज्यानें आपल्या स्वाधीन करुन ठेविले आहत, तो भगवान् केवळ माझेंच बळ आहे असें नाही. तर तुझें व इतरहि सर्व बलिष्ठ लोकांचे तोच बळ आहे ॥८॥

हे राजा, तो परमेश्वर भगवान् विष्णुच कालरुपी आहे. तोच इंद्रियशक्ति, मनः शक्ति, धैर्य, शरीरशक्ति आणि इंद्रियें ह्यांचा आधार आहे. तोच हा गुणत्रयाचा नियंता परमेश्वर आपल्या शक्तींना योगानें ह्या जगाची उत्पत्ति, स्थिति व संहार करितो ॥९॥

तूं आपल्या ह्या शत्रुमित्रादि कल्पनारुप आसुरी स्वभावाचा त्याग करुन मनाची वृत्ति सर्वत्र सारखी ठेव. कारण, न जिंकलेल्या व कुमार्गांमध्यें प्रवृत्त होणार्‍या मनावांचून, शत्रु असे दुसरे कोणीच नाहींत. मनाची वृत्ति सारखी राखणें हेंच भगवान् अनंताचे उत्कृष्ट पूजन आहे ॥१०॥

हे दैत्याधिपते, तुझ्यासारखे किती तरी मंदबुद्धि पुरुष, प्रथम सर्वस्व हरण करणार्‍या इंद्रियरुप षड्रिपूंना न जिंकिंता, आपण दशदिशा जिंकिल्या आहेत असें मानितात; परंतु वास्तविक पाहूं गेलें असतं जो मनोनिग्रह करुन ज्ञानी झाला आहे, आणि ज्याची सर्व प्राण्यांविषयीं समदृष्टि आहे, त्या साधूंना मात्र देहाभिमानानें कल्पिलेले कामादि मानसिक शत्रु नसतात. अर्थात् त्यांना बाहेरचे इतर शत्रु नसतात हें सांगावयास नकोच ॥११॥

हिरण्यकशिपु म्हणाला, - हे मंदबुद्धे, ज्याअर्थी तूं अतिशय बडबड करीत आहेस, त्याअर्थी खरोखर तुला मरणाचीच इच्छा झालेली दिसते; कारण, जे मरणोन्मुख झालेले असतात, तेच अशाप्रकारें अनन्वित बरळत असतात ॥१२॥

हे मंदभाग्या, माझ्याहून दुसरा असा तूं जगाचा नियंता म्हणून सांगितलास, तो कोठें आहे ? तो सर्वठिकाणीं जर आहे, तर मग ह्या खांबामध्यें कां दिसत नाही ? ॥१३॥

तेव्हां व्यर्थ बडबड करणारें तुझें शिर मी आता धडापासून वेगळें करितो. तो तुझा आवडता हरि, जर तुझें रक्षण करणारा आहे, तर त्यास आतां येऊंदे ॥१४॥

ह्याप्रमाणें रागाच्या आवेशांत कठोर शब्दांनी आपल्या महाभगवद्भक्त पुत्राला वारंवार पिडा देणारा तो अतिबलाढय महादैत्य, हातामध्यें खङ्ग घेऊन सिंहासनावरुन उडी टाकिता झाला, व आपल्या मुष्टीनें त्यानें स्तंभावर ताडण केलें ॥१५॥

हे राजा, तोंच त्या खांबामध्ये अतिभयंकर असा ध्वनि उत्पन्न झाला, व त्याच्यायोगानें ब्रह्मांडकटाह फुटलाच की काय, असें सर्वांस भासले. तो ध्वनि, देव आपल्या स्थानी बसले होते तेथेंहि जाऊन पोंचला. तो ध्वनी ऐकून आपल्या स्थानांचा नाश होतो कीं काय, असें ब्रह्मादिक देवांनाहि भय वाटलें ॥१६॥

पुत्रवधाची इच्छा धरुन, त्यासाठी आपल्या बलानें प्रयत्न करणारा तो हिरण्यकशिपु, ज्याच्या योगानें दैत्यसेनाधिपति अत्यंत भयभीत झाले होते असा तो अपूर्व व अद्भुत नाद ऐकून, तो कशापासून निघाला तें जाणण्यासाठी तो इकडेतिकडे पाहूं लागला; पण तो नाद कोठून निघाला, हें त्याच्या दृष्टीस पडलें नाही ॥१७॥

इतक्यामध्यें सर्व भूतमात्रामध्यें असलेली आपली व्याप्ति खरी करण्याकरितां व आपल्या भक्तांनी केलेलें भाषण सव्य करण्याकरितां, मनुष्याकार नव्हे व मृगाकारहि नव्हे, असें अत्यंत अदभुत रुप धारण करणारा भगवान् श्रीहरि सभेमधील त्या स्तंभांत प्रगट झाला ॥१८॥

ह्याप्रमाणें अदभुत नाद करणार्‍या प्राण्याचा, तो दैत्य चोहोंकडे दृष्टी फिरवून जों शोध करीत आहे, तोंच स्तंभांतून बाहेर निघणारे तें मनुष्याचें व सिंहाचें मिश्ररुप त्याच्या दृष्टीस पडलें. तें पाहून ‘ हा मृगहि नव्हे व नरहि नव्हे, तर हा कोण विचित्र प्राणी आहे ? ’ असा तो विचार करुं लागला ॥१९॥

तो मनाशीं विचार करीत आहे, इतक्यांत त्याच्यापुढें नृसिंहरुपी भगवान् दत्त म्हणून उभा राहिला. त्याचें रुप फारच भयानक होतें. त्याचे डोळे तापलेल्या सोन्याप्रमाणें लाल असून त्याच्या मानेवरील आयाळाचे केंस विजेप्रमाणें तळपत होते; व त्यामुळे त्यांचें मुख फारच विक्राळ व विशाल दिसत होतें ॥२०॥

त्याच्या दाढा भयंकर होत्या. जिव्हा तरवारीसारखी चंचल व वस्तर्‍याच्या धारे प्रमाणे तीक्ष्ण होती. चढविलेल्या भुंवयांमुळें त्याचे मुख उग्र दिसत होतें व कान शंकूप्रमाणें ताठ उभारलेले होते. त्याचें तोंड व नाकपुडया हीं पर्वताच्या गुहेप्रमाणें विस्तृत असून जबडा पसरल्यामुळें तीं भयंकर दिसत होती. त्याचे मस्तक स्वर्गाला स्पर्श करीत होतें. त्याची मान आंखूड व स्थूळ होती. त्याचें वक्षः स्थळ विशाळ असून उदर कृश होतें. चंद्रकिरणाप्रमाणे गौरवर्ण असे केंस त्याच्या सर्व अंगावर विखुरले होते. त्याचीं नखें हींच जणूं काय त्याची आयुधें होती. त्याच्या जवळ जाणें तर अशक्यच होतें. स्वतः च्या चक्रादि व इतरांच्या वज्रादि आयुधांच्या योगानें ज्याने सर्व दैत्यदानवांना पळवून लाविलें होतें. अशा त्या स्वरुपाला पाहून हिरण्यकशिपु म्हणाला; मायावी श्रीहरीनें माझ्या मृत्यूच्या उपायार्थाच हें रुप घेतलेले दिसतें; पण असें हें रुप माझें काय करणार ? असें म्हणून, त्यानें हातामध्यें गदा घेतली, व गर्जना करीत तो दैत्यश्रेष्ठ नृसिंहाच्या सन्मुख वेगानें धांवला. परंतु अग्नीमध्ये पडलेल पतंग जसा दिसेनासा होतो, त्याप्रमाणें नृसिंहाच्या तेजापुढें तो दैत्य निस्तेज झाला ॥२१॥॥२२॥॥२३॥॥२४॥

अहो, ज्या हरीने सृष्टीच्या आरंभीं आपल्या तेजाच्या योगानें प्रलयकालाच्या अंधः काराचा सुद्धां नाश केला होता, त्या सत्त्वप्रकाशरुपी श्रीहरीच्या ठिकाणी त्या तमोगुणी असुराचें अदर्शन झालें हें कांही आश्चर्य नव्हे. त्या महादैत्यानें भगवंताच्या सन्मुख येऊन, क्रोधपूर्वक अतिवेगाने फिरविलेल्या आपल्या गदेनें नृसिंहाला प्रहार केला ॥२५॥

तेव्हां जसा गरुड मोठ्या सर्पाला पकडतो, त्याप्रमाणे आपल्यावर प्रहार करणार्‍या त्या हिरण्यकशिपूला नृसिंहानें त्यांच्या गदेसह हाती धरिलें, परंतु क्रीडा करणार्‍या गरुडाच्या हातून जसा सर्प गळून पडतो त्याप्रमाणे त्या नृसिंहाच्या हातांतून तो असुरहि सुटून गेला ॥२६॥

हे भरतकुलोत्पन्ना धर्मराजा, त्या हिरण्यकशिपूनें ज्यांची स्थानें हरण केल्यामुळें ज भीतीनें मेघांच्या आड दडून राहिले होते, अशा त्या सर्व लोकपालांना व देवांना, नृसिंहाच्या हातांतून दैत्य सुटला असें पाहतांच, अत्यंत वाईट वाटलें कारण, युद्धामध्यें नेहमी बेफिकीर असणारा तो महादैत्य नृसिंहाच्या हातांतून सुटल्याबरोबर, आपल्या बलानें नृसिंह भयभीत झाला आहे असें मानिता झाला, आणि हातांत ढाल व तलवार घेऊन मोठ्या वेगानें पुनरपि तो त्या नृसिंहावर चालून गेला ॥२७॥

हे राजा, पण शेवटीं, ससाण्याप्रमाणे ज्याचा वेग आहे व जो ढालतलवारीचे कुशलतेनें हात करीत असल्यामुळें ज्याच्यावर प्रहार करण्यास मुळी अवकाशच सांपडत नाही, अशा त्या हिरण्यकशिपूला, महावेगवान नृसिंहानें, तीव्र व भयंकर असें हास्य करुन, सर्प जसा उंदराला पकडतो, त्याप्रमाणें पकडिलें. त्या वेळी श्रीहरिच्या हास्यध्वनीनें व तेजानें त्या हिरण्यकशिपूचें डोळे मिटूनच गेले ॥२८॥

ज्या हिरण्यकशिपूच्या त्वचेला पूर्वी इन्द्राचें वज्रहि दुखवूं शकलें नव्हतें, असा तो महादैत्य, भयभीत होऊन नरसिंहाच्या हातून सुटण्याची धडपड करुं लागला, पण गरुड जसा अतितीव्रविषधारी सर्पाचेंहि विदारण करितो, त्याप्रमाणे नृसिंहानें द्वारामध्येंच संध्याकाळचे समयीं त्या दैत्याला आपल्या मांडीवर उताणें पाडून नखांनीं त्याचें हदय विदारण केले ॥२९॥

नंतर ज्याचे नेत्र क्रोधाने लाल झाल्यामुळे ज्याकडे अवलोकन करणेंहि कठीण झाले आहे, जो आपल्या जिभेनें आपले विशाल ओंठ चाटीत आहे, ज्याच्या मानेवरील केंस व मुख ही रक्तबिंदूंनीं लिप्त झाल्यामुळें लाल झाली आहेत, ज्यानें त्या दैत्याच्या आंतडयाच्या माळा आपल्या कंठामध्यें धारण केल्या आहेत, जो हत्तीच्या वधानें शोभणार्‍या सिंहाप्रमाणें भासत आहे; आणि जो अनेक बाहूंनी युक्त आहे, अशा त्या नृसिंहरुपी श्रीहरीनें नखाप्रांनी त्या हिरण्यकशिपूचे हदयकमळ विदारण केल्यानंतर त्याला मांडीवरुन खाली टाकून दिलें. नंतर ज्यांनी आयुधें उचलली आहेत अशा त्याच्या सेवकांना व त्याच्या मागून येणार्‍या त्याच्या पक्षपाती हजारो दैत्यांना, नखरुप शस्त्रांनी व पायांच्या टांचांनींच मारुन टाकिलें ॥३०॥॥३१॥

हे राजा, त्या वेळीं त्या नृसिंहाच्या मानेवरील केसांमुळें कंपित झालेले मेघ विसरुन गेले; आदित्यादि ग्रह त्याच्या दृष्टीने निस्तेज झाले, त्याच्या श्वासानें ताडित झालेले सागर क्षोभ पावले, व त्याच्या गर्जनेनें भ्यालेले दिग्गज उच्चस्वरानें आक्रोश करुं लागले ॥३२॥

त्याच्या मानेवरील केसांच्या फटकार्‍यानें उडालेल्या विमानांतील देव स्थानभ्रष्ट झाले, त्याच्या पायांच्या भारानें पीडित झालेली पृथ्वी दबून गेली, त्याच्या वेगानें पर्वत ढासळून पडले आणि त्याच्या तेजानें आकाश व दिशा निस्तेज झाल्या ॥३३॥

नंतर ज्याचें उग्र तेज सर्वत्र फांकले आहे, ज्याला कोणीच प्रतिस्पर्धी उरला नाही, ज्याचें स्वरुप अतिभयंकर आहे, असा तो प्रभु नृसिंह, त्या सभेमध्यें राजसिंहासनावर बसला असतां, त्याचा स्तव करण्याकरितां त्याच्याजवळ जाण्याचें धैर्य कोणासही होईना ॥३४॥

असो. मस्तकांतील शूळव्यथेप्रमाणें त्रैलोक्यास दुःसह अशा त्या आदिदैत्य हिरण्यकशिपूचा युद्धामध्यें श्रीहरीनें वध केला असें पाहून, अतिहर्षामुळें ज्यांची मुखें विकसित झाली आहेत अशा देवांगना त्या नृसिंहावर पुष्पांचा वर्षाव करुं लागल्या ॥३५॥

त्या नृसिंहाला पहाण्याकरितां देवांच्या विमानांनी आकाशमंडळ भरुन गेलें, नगारे व नौबतीच्या ध्वनीनें दशदिशा दुमदुमुन गेल्या, अप्सरा नृत्य करुं लागल्या आणि गंवर्वश्रेष्ठ गाय करुं लागले ॥३६॥

हे धर्मराजा, नंतर ब्रह्मदेव, इंद्र, शिव इत्यादि देव, ऋषि, पितर, सिद्ध, विद्याधर, श्रेष्ठ नाग, मनु, प्रजापति, गंधर्व, अप्सरा, चारण, यक्ष, किंपुरुष, वेताळ, सिद्ध, किंनर आणि सुनंद व कुमद इत्यादि विष्णूचे सर्व पार्षद तेथें आले व नृसिंहाच्या संनिध हात जोडून उभे राहिले, आणि सिंहासनावर बसलेल्या त्या प्रखर तेजधारी नृसिंहाची विविधप्रकारानें स्तुति करुं लागले ॥३७॥॥३८॥॥३९॥

ब्रह्मदेव म्हणाला, - हे परमेश्वरा, ज्याच्या शक्ति अनंत आहेत, ज्याचें पराक्रम विचित्र आहेत, ज्याचीं कर्मे श्रवणमात्रेंकरुनच अंतः करणाला शुद्ध करणारीं आहेत, जो आपल्या सहज लीलेनें सत्त्वादिक गुणांच्या योगे जगाची उत्पत्ति, स्थिति व संहार करितो, असे असूनहि ज्याच्या स्वरुपाच्या कधीहिं नाश होत नाहीं, त्या अनंतस्वरुपी तुज भगवंताला प्रसन्न करुन घेण्याकरितां मी नम्र झालो आहे ॥४०॥

रुद्र म्हणाला, - हे भक्तवत्सला, सहस्त्र युगांचा अंत हाच तुझा वास्तविक कोपकाळ होय; पण आतां तर हा क्षुद्र असुर तूं मारिला आहेस, यास्तव विनाकारण क्रोध न धरितां, तुला शरण आलेला हा दैत्याचा पुत्र जो भंक्तं प्रल्हाद त्याचें तूं रक्षण कर ॥४१॥

इंद्र म्हणाला, - हे परमेश्वरा, यज्ञामध्यें अंतर्यामिरुपानें तूंच भोक्ता असल्यामुळें, दैत्यापासून आमचें रक्षण करुन हे प्रभो तूं स्वतः चे हविर्भाग परत घेतले आहेस. तुझें गृहरुप जें आमचें हदयकमळ तें ह्या दैत्याच्या भयानें व्यापून गेलें होतें; परंतु तें भय दूर करुन तूं तें विकसित केलें आहेस. हे स्वामिन् , तुझी शुश्रूषा करणार्‍या भक्तजनांना, काळानें गिळून टाकलेले असें हें त्रैलोक्याचें ऐश्वर्य काय करावयाचें आहे ? त्यांना मुक्तिसुद्धां जर महत्वाची वाटत नाही, तर स्वर्गादिक इतर ऐश्वर्याची काय किंमत ? ॥४२॥

ऋषि म्हणाले, - हे आदिपुरुषा, आपल्या स्वरुपांत पूर्वी लीन असलेलें हे विश्व, तूं ज्या तपाच्या योगानें उत्पन्न केलें आहेस, तें आपलें प्रभावरुन सर्वोत्कृष्ट तप, तूं आम्हां ऋषींना उपदेशिलें होतें. तें तप ह्या दैत्यानें लोपवून टाकिलें असतां, हे शरणागतपालका, भक्तांच्या रक्षणार्थ तूं हें नृसिंहस्वरुप धारण करुन, पुनरपि ‘ तप करा ’ अशी आम्हांस आज्ञा दिली आहेस; त्या तुज भगवंताला आमचा नमस्कार असो ॥४३॥

पितर म्हणाले, - हे देवा, आम्हांला पुत्रांनीं श्रद्धापूर्वक दिलेली पिंडदानें जो आपणच बलात्कारानें भक्षण करीत असे, आणि तीर्थस्नान करतेवेळीं दिलेलें तिलोदकहि जो पीत असे, त्या दैत्याच्या उदराची त्वचा तूं नखांनी विदारण करुन त्यांतून ते पिंडादिक बाहेर काढिले आहेस; त्या तुज सर्वधर्मरक्षक नृसिंहाला आमचा नमस्कार असो ॥४४॥

सिद्ध म्हणाले, - हे नृसिंहा, योग व तप यांच्या बलानें ज्या दुष्टानें आमची अप्रणिमादि सिद्धिरुप योगासिद्ध गति हरण केली होती, त्या अनेकप्रकारच्या दर्पानें युक्त असलेल्या दैत्याचें तूं आपल्या नखांनी विदारण करुन आमचे संकट दूर केलेंस, त्या तुला आम्ही नमस्कार करितों ॥४५॥

विद्याधर म्हणाले, - नानाप्रकारच्या धारणेनें प्राप्त झालेल्या आमच्या गुप्त होण्याच्या विद्येला, देहशक्ति व पराभवसामर्थ्य ह्यांच्या योगानें गर्विष्ठ झालेल्या ज्या मूर्खानें प्रतिबंध केला होता, त्या दैत्याचा ज्यानें युद्धामध्यें पशूप्रमाणें वध केला आहे, त्या हे नृसिंहरुपधारी प्रभो, तुला आम्ही नम्र आहों ॥४६॥

नाग म्हणाले, - हे परमेश्वरा, ज्या पाण्यानें आमच्या फणांतील रत्ने व आमच्या स्त्रिया हरण केल्या होत्या, त्याच्या वक्षः स्थलाचें विदारण करुन त्या स्त्रियांना तूं आनंद दिला आहेस अशा तुला नमस्कार असो ॥४७॥

मनु म्हणाले, - हे देवा, आम्ही तुझ्या आज्ञेप्रमाणें वागणारे मनु आहों. आजपर्यंत दैत्य हिरण्यकशिपूनें आमच्या वर्णाश्रमसंबंधीं सर्व धर्ममर्यांदा मोडून टाकिल्या होत्या. त्या दुष्टाचा तूं वध करुन आम्हांस संकटमुक्त केलेंस. यास्तव हे प्रभो, आतां तुझी कोणती सेवा करावी, त्याविषयीं आम्ही दासांना आज्ञा करा ॥४८॥

प्रजापति म्हणाले, हे परमेश्वरा, तूं उत्पन्न केलेले आम्हीं प्रजापति आहों. ज्या दैत्योंन प्रतिबंध केल्यामुळें प्रजा उत्पन्न करण्याचें आमएं कार्य बंद पाडलें होतें; त्याच्या वक्षः स्थळाचें तूं विदारण केल्यामुळें तो नष्ट झाला आहे; आतां आम्ही पुन्हा प्रजा उत्पन्न करुं शकूं हे सत्त्वमूर्ते, तुझा हा अवतार जगाचें कल्याण करणारा आहे ॥४९॥

गंधर्व म्हणाले, - हे प्रभो, तुझ्या अग्रभागीं नृत्य करणार्‍या व नृत्यामध्यें गायन करणार्‍या आम्हांला, शौर्य आणि शक्ति ह्यांच्या बलावर ज्या दैत्यानें आम्हांस आजपर्यंत आपल्या आधीन करुन ठेवलें होतें, तो हा दैत्य आज तुझ्या हातून मरण पावला आहे; कारण, कुमार्गानें प्रवृत्त झालेल्या पुरुषाचें कल्याण कधींहि होत नाहीं ॥५०॥

चारण म्हणाले, - हे हरे, साधूंच्या अंतः करणामध्यें भय उत्पन्न करीत असलेल्या ह्या असुराला तूं मारुन टाकिल्यामुळें, तुझ्या संसारनिवर्तक चरणकमळांचा आश्रय करुन राहिलेले आम्ही निर्भय झालों आहोंत ॥५१॥

यक्ष म्हणाले, - हे नरहरे, मनोहर कर्मांच्या योगानें तुझ्या सेवकांमध्यें श्रेष्ठ झालेले जे आम्हीं, त्या आम्हांला ह्या दितिपुत्र हिरण्यकशिपूनें पालखीला वाहरणारे भोई केलें होते; परंतु हे प्रभो, तूं लोकाचें दुःख जाणणारा आहेस. तूं हा अवतार घेऊन आज त्या दैत्यास पंचत्वास पोंचविलें आहेस ॥५२॥

किंपुरुष म्हणाले, - हे देवा, आम्हीं अतितुच्छ प्राणी आहों, व तूं तर अद्भुतप्रभाववान्, सर्वनियंता पुरुषोत्तम आहेस. जेव्हां भगवद्भक्तांनी ह्या दैत्याचा तिरस्कार केला, तेव्हांच वस्तुतः हा दुर्जन नष्ट झाला होता ॥५३॥

वैतलिक म्हणाले, - हे भगवन, सभा व यज्ञ ह्यांमध्ये तुझ्या निर्मळ यशांचे गायन करुन आम्ही पूर्वी मोठमोठे मान मिळविले; परंतु या वैर्‍यानें ते सर्व अगदी बंद करुन टाकिले होते. तेव्हां रोगासारखा असा हा घातकी दुर्जन दौत्य तूं मारुन टाकिलास ही फार चांगली गोष्ट झाली ॥५४॥

किंन्नर म्हणाले; - हे ईश्वरा, आम्ही किन्नरगण तुझे अनुयायी असून ह्या दितिपुत्र हिरण्यकशिपूनें आम्हांला वेठीला लाविलें होतें. हे हरे, तो पापी दैत्य तूं मारुन टाकिला आहेस. हे नाथा, हे नरसिंहा, तूं आम्हां सेवकांचा आतां उत्कर्ष कर ॥५५॥

विष्णुपार्षद म्हणाले, - आम्हां भक्तजनांना आश्रय देणार्‍या हे भगवंता, सर्व लोकांना मंगलकारक असें हे तुझे अद्भुत नृसिंहरुप आम्ही आज पाहिलें. हे ईश्वरा, हा हिरण्यकशिपु मूळचा तुझा दासच असून ब्राह्मणांचा शाप झाल्यामुळें दैत्य झाला होता; तेव्हां त्याचा वध त्याच्या अनुग्रहासाठींच तुझ्याकडून झाला आहे असें आम्ही समजतों ॥५६॥

आठवा अध्याय समाप्त ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP