|
न. मृत्यु ; प्राण जाणें . ( ल . ) हानि ; तोटा ; नुकसान . सोन्याचे नाण्यास कोठेंहि मरण नाहीं . न्यूनता नाहीं असें बेधडक सांगतांना योजतात . उदा० या व्यापारांत शंभर रुपयास मरण नाहीं ( निखालस मिळतील ). मोठा धोका ; संकट . जिवावरची गोष्ट ; प्राणाशीं गांठ ; प्राणसंकट . त्या मार्गानें जाऊं नको , तेथें मोठें मरण आहे . अत्यंत अप्रिय , कटाळवाणी गोष्ट . लोकाजवळ कर्ज मागणें हें मला मोठें मरण आहे . [ सं . ] ( वाप्र . ) ०जाणणें समजणें कळणें कळूं लागणें - संकटाची जाणीव होणें . कोणाच्या घरीं मरणाची वाजंत्रीं वाजणें मरणाची वाजंत्रीं वाजणें - कोणत्याहि संकटाला तोंड देणें ; मरण्यास तयार असणें . मरणाच्या दारीं बसणें पंथास लागणें टेकणें - आसन्नमरण होणें ; आतां मरतो कीं मग मरतो अशा स्थितींत असणें . मरणादारीं कीं तोरणादारीं जावें इ० शुभप्रसंगीं किंवा अशुभ प्रसंगीं हजर रहावें . मरणानें जिंकलेला जिंकला - वि . मरावयास टेंकलेला ; मरणद्वारीं असलेला . मरणामाथां माथेस येणें पावणें - मरायला लागल्याप्रमाणें होणें ; पूर्णपणें थकून जाणें . हा पांच कोस जमीन चालला म्हणजे मरणामाथां येतो . मरणाला रात्र आडवी करणें - मरण , एखादा कठिण प्रसंग कांहीं तरी युक्ति योजून लांबणीवर ढकलणें . मरणीं घालणें - मरुं घालणें . ऐसा कळलाव्या नारदमुनी । मरणीं घातल्या कृष्णकामिनी । - जै ७१ . १११ . मरणीं मरणें - एकाद्यासाठीं सेवेस तत्पर असणें . आजचें मरण उद्यावर लोटणें , मरण उद्यावर लोटणें - सध्याचा कठिण प्रसंग लांबणीवर टाकणें . आपल्या मरणानें मरणें , मरणानें मरणें - नैसर्गिक रीतीनें मरणें . ( स्वतःच्या दुष्कर्माबद्दल शिक्षा म्हणून ) स्वतःवर संकट ओढून घेणें . उद्याचें मरण आज आणणें , मरण आज आणणें - कालांतरानें गुदरणारा अनिष्ट प्रसंग आतांच ओढवून घेणें . खितपणीचें मरण - न . खितपत पडून राहिल्यानंतर प्राप्त होणारें मरण . ज्या अंगावरी केलें शयन । तेथून अंग हलवूं नेणे । खितपणीचें आलें मरण । निंदकजन बोलति । सामाशब्द - ०कळा स्त्री. आजार , काळजी इ० मुळें चेहर्यादर येतो तो फिकटपणा ; निस्तेजपणा ; प्रेतकळा . ०तरण न. मरणें आणि जगणें ; मृत्यु आणि जीवन . मरणतरण ईश्वराचे स्वाधीन . ०दशा स्त्री. कठिण प्रसंग ; जिवावरचें संकट . ०पंथ पु. मृत्यूचा मार्ग . ( क्रि० टेंकणें ; लागणें . ) ०प्राय न. मरणासारखें संकट . कोणी मागितलेली वस्तु नाहीं म्हणावयास मला मरणप्राय होतें . - वि . मरणाइतकें दुःसह , कठिण . ०मूळ न. मरणास बोलावणें . मज न्यावया आला उतावीळ । तत्काळ झाला मरणमूळ । - कथा १ . ६ . ९१ . अत्यंत त्रासाचें , कष्टाचें काम ; जिवावरची गोष्ट ; जीवघेणा प्रसंग . ०सोंग सोव - नपु . मरणाचें केलेलें ढोंग , बहाणा . ( क्रि० घेणें ; आणणें ) मरणा - वि . ( राजा . ) अगदीं मरावयास टेकलेला ; अत्यंत अशक्त ; मरतुकडा . मरणेच्छा - स्त्री . मरणाची इच्छा . मरणोन्मुख - वि . आसन्नमरण ; मरणाच्या पंथास लागलेला . मरणें - अक्रि . मरण पावणें ; वारणें . शुष्क होणें ; वाळणें ; कोळपणें ; कोमेजणें ( झाड , रोप इ० ). ( ल . ) ( दिलेलें कर्ज , व्यापारांत घातलेलें भांडवल इ० ) बुडणें ; नुकसान पावणें ; किफायतशीर न होणें . ( मुलांच्या खेळांतील गडी , सोंगटी इ० ) निरुपयोगी , बाद होणें ; खेळांतून निघणें . दोन गडी मेले . थंडीने कडकून जाणें ; नाश पावणें . ( पार , सोनें इ० चा ) गुणधर्म नाहींसा होणें ; भस्मदशा पावणें . संवेदनाशून्य होणें ; बधिर , मद्दड होणें . नित्य मार खाल्ला असतां पाठीचें रक्त मरतें . आटून जाणें ; नाहींसें होणें ( पाणी , रक्त , रस , ओलावा इ० ). बरें होणें ; नाहींसें होणें . ( खरुज , नायटा , इ० ). ( खड्ड्यांत ) सांठून रहाणें ; न वहाणें ( पाणी ). कंटाळवाणा होणें ; फुकट जाणें ; निरुपयोगी होणें ( वेळ ). मोडणें ; जाणें ; नाहींशी होणें ( तहान , भूक , वासना इ० - वेळेवर तृप्त न झाल्यामुळें ). पाहण्याविषयीं त्याची दृष्टि मेली . उडणें ; नष्ट होणें ; लुप्त होणें ( आशा प्रीति , इच्छा , मनोवृत्ति इ० ). ताजेपणा , सत्त्वांश नाहींसा होणें ; बेचव होणें ( पाणी इ० ). दुखणाईत होणें ; आजारानें खितपत पडणें . हा तीन वर्षे मरतो आहे . पराकाष्ठेचा तोटा , नुकसान सोसणें . त्या साखरेच्या व्यापारांत हा हजार रुपयाला मेला . अत्यंत कष्ट सोसणें ; जिवापाड काम करणें ; कामानें बेजार होणें . तुम्ही सारे बसतां आणि म्यां एकट्यानें मरावें हें ठीक नाहीं . अतिशय उत्सुक , उत्कंठित होणें ; उतावीळ होणें . एवढा मरतोस कां ? उद्या तुझें काम होईल . खालीं बसणें ; कमी होणें ( धूळ . ) दृष्टि मरणें , नजर मरणें - एखादी वस्तु नित्य पाहण्यांत आल्यानें तिजविषयीं औत्सुक्य कमी होणें ; उदासीनता येणें . मरण्याजिण्यास उपयोगी पडणें , मरण्याजिण्यास कामास पडणें - ऐन अडचणीच्या प्रसंगीं उपयोगी येणें . मरतां मरतां वांचणें - भयंकर दुखण्यांतून , प्राणसंकटांतून वांचणें . मरतां मरतां हातपाय झाडणें - शेवटचा जोराचा प्रयत्न करुन पाहणें . मरमरुन जाणें , पडणें - अतिशय आसक्त , उत्कंठित , उत्सुक होणें ; वेडा होणें . मरस मरे - क्रिवि . अत्यंत श्रमानें ; कष्टानें . मरीं मरणें - जिवाची पर्वा न करतां कष्ट करणें . मरुं घालणें - मरणार म्हणून टाकून देणें ; मरणाच्या दारीं असणें , ठेवणें . तरींच मरुं घातला कुमर । हा तयावरी अपटावा । मरुं घातलेला - वि . मरणार अशा समजुतीनें सोडून दिलेला . मरुन जिणें - पुनर्जन्म होणें ; मरतां मरतां वाचणें . गोविंदामृतदृष्टिवृष्टि करितां आतां मरुनी जितों । मरुन पडणें - अतिशय मोठे घोस , झुबके येणें ( झाडावर फळांचे ) आंबे यंदा मरुन पडले आहेत . मरुं मरुं करणें - लवकरच प्राण जाईल असा रंग दिसणें . मरोमरोसें करणें , मरेमरेसें करणें - सतावणें ; गांजणें ; अत्यंत त्रास देणें . मेला जसा - वि . अति शरमिंदा ; लज्जित ; मेल्यासारखा . मेल्याचा पाड जाणें , होणें - हलका लेखिलें जाणें ; मान्यता कमी होणें . गोंधळणें ; गर्भगळित होणें .
|