वि. तीक्ष्ण ; तिखट ; चलाख . [ सं . तेजस ; फा . तेझ ]
न. - प्रकाश ; कांति ; लकाकी ; पाणी ; झकझकी .
- उष्णता ; कडक सूर्यकिरण . तोय तेज धूमु । ययां वायूसी संगमु । - ज्ञा १८ . ३०८ .
- वैभव ; शोभा ; उत्कर्ष .
- गुण ; उपयुक्तता ; सत्त्व ; प्रताप ( औषध इ० चा ); जोम ; उत्साह ; गांभीर्य ( भाषण इ० चे ).
- वीर्य ; रेत . देइन तुज निजकन्या , तव तेजाते परा न सोसील । - मोअश्व ३ . १५ .
- तिखटपणा ; तीक्ष्णता ; झणझणीतपणा .
- पराक्रम ; सामर्थ्य . भावितमःप्रशमी न क्षमही होऊनि तेज देहिं सके । - मोसभा ५ . १९ . [ सं . तेजस ] सामाशब्द -
तेजगी - स्त्री . चकाकी ; टवटवी ; झांक , पाणीदारपणा .
तेजतत्व - न . १ तेजाचे अधिष्ठान ; तेजस्वीपणाचे मूळ ; नेत्र , सूर्य वगैरेच्या ठिकाणी राहणारे आद्यतत्व . २ ज्ञान ; ज्ञानेंद्रिय . जे तेजतत्त्वाची आदी । - ज्ञा १३ . ८८ .
तेजःपुंज - वि . सूर्य , रत्न , विद्वान , मान्यमान्यतेचा पुरुष यांना ही संज्ञा लावतात .
तेजवान , तेजवंत , तेजोमय , तेजस्वी - वि . १ शोभायमान ; कांतिमान ; उजळ ; सतेज ; उज्वल . २ ( ल . ) प्रभाववान ; प्रतापी ; प्रतिष्ठित ; प्रसिद्ध ; सन्माननीय ; बाणेदार .
तेजस - वि . तेजस्वी ; प्रकाशवान . पै कमलायतडोळसा । सूर्यकोटि तेजसा । - ज्ञा ११ . ६९ .
तेजःसंकर्ष - देश - पु . ( शाप . )( सर्व प्रकाश एकत्र जमण्याचे स्थान ). सूक्ष्मदर्शक भिंगांतून निघणारे किरण ज्या ठिकाणी केंद्रीभूत होतात तो बिंदु .
तेजस्कर - वि . तेजस्वी ; चकाकित ; सतेज ;
तेजाकार - पु . सूर्य . कां उदय न कीजे तेजाकारे । तंव गगनचि होऊनि असे आंधारे । - ज्ञा ११ . ६९३ .
तेजस्वी मासा - पु . चकचकीत व शोभायमान असे एकावर एक चढलेले खवले अंगावर असणारा एक जातीचा मासा .
तेजाळ - वि . ( काव्य . ) १ उज्ज्वल ; सतेज ; चकचकीत ; तेजस्वी . तोच पारा परम चपळ । न धरवे कोणा तेजाळ । २ उमदा ; भव्य ; छानदार ; शोभिवंत .
तेजित - वि . १ झिलई , उजळा दिलेला . २ धार लावलेला .
तेजोभंग - पु . १ अपमान ; अवमान ; अपमानपूर्वक अथवा तिरस्कारपूर्वक वागविणे ; होणारा अपमान अथवा फजिती . २ तेजाचा , पराक्रमाचा नाश ; वीर्यहानि . सरकारी शाळांतून मिळत असलेले शिक्षण भावी पिढीचा तेजोभंग व निरुत्साह करण्याकरितां मुद्दाम वेड्यावाकड्या रीतीने दिले जात आहे . - टि ३ . १३३ .
तेजोमय - वि . प्रकाशमय ; तेजस्वी ; पाणीदार ; भव्य .
तेजोवध - पु . तेजोभंग ; पाणउतारा .
तेजोवृद्धि - स्त्री . प्रकाश , कांति , शोभा , मोठेपणा , यश इ० कांची वाढ .
तेजोहानि - स्त्री . १ प्रकाशाची न्यूनता ; कमतरता ; पराक्रमाची वाढ खुंटणे ; वीर्यनाश . २ अपमान ; अवमान ; प्रतिष्ठा , नावलौकिक , कीर्ति यांची हानि .
तेजोर्हांस - पु . तेजोयुक्त भाग दिसतो तो ; केंद्रीभूत होण्यापूर्वी तेजाची विरलावस्था ; पटल ; भूर . ( इं . ) नेब्युला .
तेजोवहमज्जातंतू - पुअव . तेजाचे ज्ञान करुन देणारे किंवा तेजाचे वहन करणारे ज्ञानतंतु .