१ उमा चतुर्थी :
ज्येष्ठ शु. चतुर्थीला उमा चतुर्थी असे नाव आहे. हे स्त्रियांनी करावयाचे व्रत होय.
'ज्येष्ठ शुक्लचतुर्थ्या तु जाता पूर्वभवा सती ।
तस्मात् सा तत्र संपूज्या स्त्रीभिः सौभाग्यवृद्धये ॥'
ज्येष्ठ शु. चतुर्थीला उमेचा जन्म झाला. म्हणून त्या दिवशी सौभाग्यवृद्धिसाठी तिची पूजा करावी.
या व्रतात उमेची कुंदपुष्पांनी पूजा करतात. उपवासही करतात. पुरुषांनीही हे व्रत करायला हरकत नाही, असे कृत्यरत्नात सांगितले आहे. बंगालमध्ये उपवर मुली उत्तम नवरा मिळावा म्हणून हे व्रत करतात.
२ विनायकी :
या चतुर्थीला 'ज्येष्ठराज चतुर्थी ' असे नाव आहे. या दिवशी प्रद्युम्नरुपी गणेशाची पूजा करुन ब्राह्मणांना फळेमुळे दान केल्याने मनुष्य स्वर्गलोकास पात्र होतो. या चतुर्थीला 'सतीव्रता ' नावाचे श्रेष्ठ व्रत असते. या व्रताचे विधिवत् पालन केल्याने स्त्रिया गजमुखजननी पार्वती-लोकाला जाऊन तिच्याप्रमाणे आनंद प्राप्त करतात.