१ गंगापूजन :
ज्येष्ठ शु. दशमी दिवशी गंगेकाठी कुठेही, अशक्य असल्यास जवळपासच्या जलाशयात अगर घरीच थंड पाण्याने स्नान करावे व सुवर्णपात्रात शुभ्र वस्त्रे नेसवलेली , शोभिवंत अभयमुद्रांकित, वरदहस्तयुक्त श्रीगंगेची प्रशान्त मूर्ती रेखाटावी अगर प्रत्यक्ष मूर्ती ठेवून तिच्या समोरच बसावे. नंतर
'नमः शिवायै' नारयण्यै दशहरायै गंगायै नमः '
पासून आवाहनादी षोडशोपचार पूजा करुन 'नमः' च्या जागी 'स्वाहा' म्हणून हवन करावे.
'ॐ नमो भगवति ऐं र्ही श्रीं (वाक्-काम-मायामयि) हिलि हिलि मिलि मिलि गंगे मां पावय पावय स्वाहा ।'
या मंत्राने पाच पुष्पांजली अर्पण करुन श्रीगंगेला भूमीवर आणले त्या भगीरथाचे आणि ती जेथून आली त्या हिमालयाचे नाम-मंत्राने पूजन करावे व १० फळे, १० दिवे व १० शेर गोडे तेल यांचे 'गंगायै नमः' म्हणून दान करावे. त्याचबरोबर तूपमिश्रित सातूच्या पिठात गूळ घालून त्याच्या गोळ्या कराव्यात व त्या पाण्यात सोडाव्यात . शक्यता असेल तर सोन्याचे कासव, मासा व बेडूक आदी जलचर यांचे पूजन करून पाण्यात सोडावेत. याशिवाय तेल, जवस, गहू प्रत्येकी दहा शेर ब्राह्मणाला दान द्यावेत. परदारा, परद्रव्य यापासून दूर राहावे. ज्येष्ठ शु. प्रतिपदेपासून दशमीपर्यन्त एकोत्तरवृद्धी (रोज १ वाढवून) दशहरास्तोत्राचे पठन करावे, म्हणजे सर्व पापे नष्ट होतात व दुर्लभ संपत्ती प्राप्त होते.
२ दशहराव्रत :
ज्येष्ठ शु. दशमी दिवशी हस्त नक्षत्रावर श्रीगंगेचा जन्म (गंगावतरण ) झाला, म्हणून या दिवशी गंगेचे स्नान करुन (नदी-स्नान) अन्नवस्त्रदान, जप-तप, उपासना व उपवास करावा. त्यामुळे १० प्रकारची पापे (३ कायिक, ४ वाचिक, ३ मानसिक) नष्ट होतात. जर या दिवशी ज्येष्ठ, शुक्ल, दशमी, बुध, हस्तनक्षत्र, व्यातिपात गर, आनंद, वृषभस्थ रवी आणि कन्येचा चंद्र असेल तर हा महफलदायी अपूर्व योग मानला गेला आहे. या दिवशी अधिक योग एकत्र येत असल्याने पूर्वा व परा तिथी यांचा विचार गौण मानून ज्या दिवशी योगाधिक्य असेल तो दिवस निवडावा आणि स्नान, दान, जप, तप, व्रत करुन उपवास करावा जर ज्येष्ठ अधिक मास असेल, तर या गोष्टी अधिकात अधिक फलप्रद ठरतात. दशाश्वमेधांत १० वेळा स्नान करुन शिवलिंगाची दशगुणी (संख्या) गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य व फळांनी पूजा करावी व रात्री जागरण करावे म्हणजे अनंत फल मिळते.