अहंकार आणि चिदात्मा यादोहोंचें एकीकरण करुन अविवेकानें हें मला असावें हें मला असावें अशा ज्या इच्छा होतात त्यांचस काम असें म्हणतात ॥६१॥
अहंकाराचा संग चिदात्म्याला न लावतां अहंकारास पृथक पाहिलें असतां कोटी वस्तुंची जरी इच्छा झाली तरी ग्रंथभेद झाल्यामुळें त्या बांधक होते नाहींत ॥६२॥
अध्यास मेल्यावर इच्छा मुळींच होऊं नयेत. परतु त्या होतात त्यास कारण प्रारब्ध होय. याला उदाहरण दुसरेम नको. तुम्हीं आपणाकडे पहा म्हणजे झालें. इतकें जाणुन बुजुन तुमच्या पुर्व जन्मीच्या पातकामुळे तुमची खाती होत नाहीं हेंच याला प्रमाण ॥६३॥
वाऋक्शादिकांचा जन्मनाश झाला असतां त्यामुळें जसें मला कांहींच होत नाही, त्याप्रमाणें देहामध्यें असणारे झाला असतां त्यामुळे जसें मला कांहींच होत नाहीं. त्याप्रमाणें देहामध्यें असणारे रोगादिक व अहंकारामध्यें असणारे इच्छादिक यांहींकरुन मी जो चिद्रुपात्मा त्याला काय होणार आहे ? असा ज्ञान्याचा अनुभव असतो. ॥६४॥
ग्रंथिभेदाच्या पूर्वी देखील अशीच माझी स्थिति होती असें जर कोणी म्हणेल तर हें मात्र विसरुं नये. कारण अशा प्रकारच्या समजुतीलाच आम्हीं ग्रंथभेद म्हणतों आणि तो तर तुझ्या ठायीं झालाच. म्हणुन तु कृतार्थ आहेस ॥६५॥
हें मुढाला समजत नाहीं. म्हणुन हेंन समजणेंच ग्रंथि दुसरा नाहीं. अज्ञानी आणि ज्ञानी यां मध्यें भेद म्हणुन इतका कीं पहिल्यामध्यें तो ग्रंथि असतो आणि दुसर्यामधे तो असत नाहीं ॥६६॥
ज्याप्रमाणें व्रात्य आणि श्रोत्रिय यादोघांमध्यें भेद इतकाच कीं एकाला वेदाध्ययन आहे आणि दुसर्याला नाही; परंतु एरव्हीं आहारविहरादिकांमध्यें दोघेही सारखेच; त्याप्रमाणें ज्ञानी आणि अज्ञानी यांची गोष्ट आहे प्रवृत्ति असो किंवा निवृत्ति असो उभयातांच्या देह, इंद्रिय , मन बुद्धि इत्यादिकांमध्यें मुळींच अंतर नाहीं ॥६७-६८॥
प्राप्त झालेल्या दुःखाचा द्वेष न करणे आणी अप्राप्त वस्तुची इच्छा न करणें व उदासीनाप्रमाणे असणें हें जें स्थितप्रज्ञाचें लक्षण गीतेंत सांगितलें आहे त्यालाच ग्रंथिभेद म्हणतात ॥६९॥
औदासिन्य हें विधिपर आहे असें म्हणतां येत नाहीं; कारण तसें मानल्यास "वत" हा शब्द व्यर्थ होईल. आतां कोणी म्हणेल ज्ञान झाल्यावर देहादिक कर्में करण्यास असमर्थ होतात, तर अशा लक्षणास ज्ञान म्हणण्यापेक्षा रोगच म्हणावें हें बरें ॥२७०॥
तत्त्वबोध हा क्षयरोग आहे आसें म्हणणारे जे बुद्धिवान त्यांच्या शहाणपणाची कमाल झाली. त्यांना असाध्य काय ? ॥७१॥
आतां कोणी म्हणेल कीं, भरतादिक साधुक्रिया न करितां केवळ जडाप्रमाणें रहात असत असें पुराणांत सांगितलेलेम आढळतें म्हनुन अक्रिय असणें हेंच ज्ञान्यांचे लक्षण. परंतु ही शंका घेणारास पुढील श्रुति अवगत असती तर अशी शंका त्याणें घेतलीच नसती "जक्षन क्रीडन रतिं विंदन " अशी श्रुति आहे तिंचे तात्पर्य ज्ञान्यानें आहारविहारादि क्रीडा जरी केल्या तरी त्या बाधक होत नाहींत ह्मा श्रुतिप्रमाणापुढें पुराणोक्तीची मातब्बरी किती ? ॥७२॥
पुराणांत जें सांगितलें त्यांचें तरी ताप्तर्य असें कीं भरतादिक साधु जें एकांती अक्रिय होऊन बसले ते केवळ लोकसंगाच्या भीतीस्तव. ते म्हणुन आहारादि अवश्य क्रिया टाकुन काष्ठापाषाणाप्रमाणें उगीच बसले असें नाहीं ॥७३॥
कारण जगात लोक संसगीनें फार दुःख होतें निःसंग मनुष्यास सुख होतें याकरितां सुखाची इच्छा करणारानें लोक संसर्ग सोडुन दिला पाहिजे ॥७४॥
शास्त्राचें हृदय न जाणतां मूढ लोक पाहिजे तसें बहकतात त्यांच्या मतांशी आम्हास काय करावयांचें आहे ? आमचा जो सिद्धांत तो आम्हीं येथें सांगतों म्हणजे झालें: - ॥७५॥
वैराग्य ज्ञान आणि उपरति हीं तीनही परस्परांत सहयभुत आहेत. ती बहुतकरुन एकत्र मिळुन असतात; परंतु केव्हा केव्हां ह्मांचा वियोगही होतो ॥७६॥
यांपैकीं प्रत्येकाचे हेतु स्वरुप आणि कार्ये निरनिराळीं आहेत म्हणुन शास्त्रार्थाचा चांगला विचार करुन बुद्धींत त्यांचा संकर होऊ देऊं नये ॥७७॥
विषयाविषयीं जी दोष दृष्टी तीच वैराग्याला हेतु म्हणजे कारण होय. त्याविषयीं जी त्यागबुद्धि तें त्यांचे स्वरुप आणी पुनः त्याच्या भोगाविषयीं जी अप्रवृत्ति तें त्यांचेंकार्य म्हणजे फळ होय. ॥७८॥
त्याचप्रमाणें ज्ञानालाही हीं तीन आहेत श्रवण मनन आणि निदिध्यास हींतिन्हीं मुळून ज्ञानास हेतु आहेत. तत्त्व मिथ्या विवेचन हें ज्ञनाचें स्वरुप आणि एकादा ग्रंथिभेद झाल्यावर पुनः तिचा उदय न होणें हेंच त्यांचें कार्य ॥७९॥
तशींच यमानियमादिक जी योगाची साधनें तीं उपरसीचें हेतु चित्ताचानिरोध म्हणजे कोड्णें हे तिचें स्वरुप आणि व्यवहाराचा लोप हें तिंचे कार्य. ह्माप्रमाणे पृथक पृथक जाणावें ॥२८०॥
या तिहींमध्यें तत्वज्ञान हें मुख्य समजावें कारण त्यापासुन प्रत्यक्ष मोक्षप्राप्ती होते आणि इतर दोन म्हणजे वैराग्य आनी उपरति हीं केवळ तत्त्वज्ञानास साहाय्य करितात; म्हणुन त्यांस प्राधान्य देतां येत नाही. ॥८१॥
कोना पुरुषाचेठायीं हीं तीनहीं पुर्णपणे असतील तर तें मोठ्या तपांचें फळ समजलें पाहिजे केव्हा केव्हा कित्येकांमध्यें ह्मापैकीं एका गोष्टीची उणीव असते त्याला पुर्व जन्मींचे पातकच कारण ॥८२॥
वैराग्य आणि उपरति हीं दोन साधनें ज्या पुरुषाचेठायीं पुर्णपणें आहेत परंतु ज्ञानाची मात्र उणीव आहे अशा पुरुषाला मोक्षप्राप्ति होत नाही. त्याला तपोबलाने पुण्यलोकांची प्राप्ति मात्र होते ॥८३॥
आतां याच्या उलट ज्या पुरुषाचिठायीं तत्त्वज्ञान मात्र पुर्ण आहे परंतु दसर्या दोन साधनांची उणीव आहे याला मोक्ष प्राप्ति खचित आहे. जीवन्मुक्ति सुख मात्र मिळत नाहीं. ॥८४॥
आतां तिहींची पुर्णता सांगतों ब्रह्मालोकही तुच्छ वाटावा म्हणजे वैराग्याची कमाल झाली. अज्ञातकाळीं मी देह ही बुद्धि जशी दृढ असते, तशीच मी ब्रह्मा ही बुद्धि दृढ व्हावी म्हणजे ज्ञानाची पुर्णता झाली ॥८५॥
आणि निद्रे इतकी विस्मृति झाली म्हणजे उपरमाजी सीमा झाली. या दिग्दर्शनावरुन बाकींचे तारतम्य समजावें ॥८६॥
प्रारब्ध कर्मे नानाप्रकारचीं असल्यामुळे तत्त्वज्ञान्याची आचरणेंही निरनिराळीं दृष्टींस पडतात म्हणून शास्त्रार्थ चांगला न जाणतां पंडितानीं व्यर्थ भ्रमांत पडुंनये ॥८७॥
आपापल्या कर्मानुसारें करुन ज्ञान्याचें वर्तन निराळें असलें तरी त्या सर्वामध्यें असणारें आत्मज्ञान एकच आहे. म्हणुन सर्वांस मुक्तीही सारखीच मिळते ॥८८॥
आपल्या स्वरुपाचेठायीं पटावर चित्र काढल्याप्रमाणें हें जगद्रुप चित्रमायेंनें काढलें आहे, त्याची उपेक्षा करुन बाकी राहिलेलें चैतन्य पहावें ॥८९॥
आतां या प्रकर्णाची फलश्रुति सांगुन हा विषय आटपती. जो मनुष्य या चित्रदीपांचें नित्य अनुसंधान करील त्यास हें जगच्चित्र दिसत असुनही पहिल्याप्रमाणें तो भ्रमांत पडणार नाही ॥२९०॥
॥श्रीशंकरार्पणमस्तु ॥
चित्रदीप समाप्त ।