फेब्रुवारी १६ - नाम

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे.


ज्या स्थितीत परमात्मा ठेवतो त्यात आनंद मानावा प्रपंचातल्या दु:खाबद्दल वाईट वाटून घेऊ नये. आपण जगात वागताना सर्व ‘ माझे, माझे, ’ म्हणतो, पण प्रत्यक्ष आपल्या वाटणीला किती येते याचा कधी आपण विचार करतो का? मिळण्याची आणि मिळविण्याची हाव वाढल्यामुळेच आपल्याला खरे दु:ख होते. ही हाव नाहीशी व्हायला भगवंताच्या स्मरणात राहणे हा एकच उपाय आहे. मी भगवंताचा आहे ही जाणीव ठेवून वागावे. भगवंताकडे चित्त गुंतवून ठेवणे हाच खरा धर्म मानावा. जगाला फसवू नये आणि जगाकडून फसले जाऊ नये.

नामात जो राहिला तो सत्संगतीत राहिला. व्यवसाय आणि हौस याप्रमाणे आपण संगत धरतो. मनाची आणि नामाची संगत जोडून द्यावी. मालकाच्या बरोबर असलेला कुत्रा ज्याप्रमाणे धीट होऊन दुसर्‍यावर भुंकतो, त्याप्रमाणे आपण भगवंताच्या आधाराने राहावे; भुंकू मात्र नये, नेहमी लीनता ठेवावी. ‘ मी ’ साधन करतो हे विसरुन जावे; त्याबद्दल अभिमान धरणे म्हणजे साधनाला कमीपणाच आणणे आहे. आपल्या कामात लक्ष ठेवून सर्वांशी प्रेमाने वागावे. स्त्री दीराचा किंवा सासू-सासर्‍यांचा मान ठेवते, ते नवर्‍याला खूश करण्याकरिता; तसे, भगवंताला ज्या रीतीने समाधान होईल, त्याप्रमाणे आपण वागावे. डॉक्टरला जर आपण ‘ त्या काळ्या बाटलीतले औषध मला का देत नाही? ’ असे म्हटले तर तो ज्याप्रमाणे ‘ तुला तो रोग नाही ’ असे उत्तर देतो त्याप्रमाणे संत ज्याची त्याची वृत्ती ओळखून मार्ग सांगत असतात. याकरिताच संतांची संगत धरुन, ते ‘ सांगतील ’ तसे वागावे; ते ‘ वागतात ’ तसे नाही वागू. आपल्या पतंगाची दोरी आपण संतांच्या हातात द्यावी आणि खुशाल निश्चिंत रहावे. आपण गुरुने सांगितलेले साधन करीत जावे, म्हणजे साधनात पुढे वाट दाखवायला तो उभाच असतो. जिथे दोन वाटा फुटतात तिथे एक पंढरपूरची आणि एक गोंदवल्याची पाटी असते, तसे साधनात राहून, जिथे त्या दोन वाटा फुटतात, तिथपर्यंत या म्हणजे तिथे गुरु उभाच आहे. पण उगीच काही न करता ‘ पुढे काय आहे? ’ हे विचारण्याने काय होणार?

संतांनाच वेदांचा खरा अर्थ कळला. त्यांचे केवढे उपकार सांगावेत, की त्यांनी तो अर्थ आपल्याला सांगितला. म्हणून आपण वेद वाचण्याचे कारण नाही; आपण फक्त संत आपल्याला सांगतील त्याप्रमाणे वागावे. त्यात आपलेच घुसडू नये. आपले काम खात्रीने झालेच पाहिजे. पाणी गोठून बर्फ बनते, बर्फाच्या आत-बाहेर जसे पाणीच असते, तसे जो आत-बाहेर भगवंताच्या प्रेमाने ओथंबलेला असतो त्याला संत म्हणतात. असे संत फक्त नामस्मरणानेच जोडता येतात.

N/A

References : N/A
Last Updated : April 27, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP